कैदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:42 AM2018-01-09T03:42:50+5:302018-01-09T03:42:59+5:30
सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते.
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय
(भा.पो.से.)
सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते. कारागृहात गेल्यानंतर त्यास कैदी किंवा बंदी म्हटले जाते. कैदेतून बाहेर आल्यानंतर काही लोकांमध्ये सुधारणा घडून येते तर काही लोक पुन्हा अपराध करतात व पुन्हा कैदी बनून कारागृहात दाखल होतात. कैद्यांचेसुद्धा अनेक प्रकार असतात. काही कैद्यांचे अपराध छोटे तर काही कैद्यांचे अपराध गंभीर असतात. कारागृहात गेल्यानंतर जर एखाद्या कैद्याची वागणूक चांगली नसेल तर कारागृह नियमानुसार त्यास तेथेही शिक्षा दिली जाते व आवश्यकतेनुसार त्यास अतिसुरक्षा विभागात बंद करून विभक्त कोठडीत ठेवले जाते. कारागृह ही अशी जागा आहे, जेथून कोणतीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बाहेर पडू शकत नाही. एकतर न्यायालय त्याची सुटका करते किंवा त्याची शिक्षा संपल्यानंतर ती व्यक्ती बाहेर येते.
या जगात राहणारे अनेक लोक कारागृहातील कैद्यांसारखे जीवन जगत असतात. विशुद्ध चेतनेच्या स्तरातून स्वतंत्र असूनसुद्धा आपण आपल्या मनोविकारात कैद असतो. शास्त्रात याच मनोविकारांना षड्दोषांच्या रूपात वर्णित केलेले आहे. हे षड्दोष म्हणजेच काम, क्र ोध,लोभ, मोह, मद व मत्सर. कामाच्या अधिकतेमुळे व्यक्ती ही कामाच्या अधीन होते व ती व्यक्ती आपले स्वातंत्र्य गमावून बसते. अशाचप्रकारे क्र ोध, मोह, मद व मत्सर आपल्याला वेगळा विचार करू देत नाही व आपण भावनेच्या आहारी जाऊन कैदी जीवन जगायला लागतो.
हे दोष व विकार इतके मजबूत असतात की त्याच्या प्रभावातून मुक्त होणे मानवासाठी अत्यंत कठीण असते. गुरू किंवा संत हे न्यायालयासारखे आहेत, जे आपल्याला या विकारांच्या कैदेतून मुक्त करतात. यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान सर्वोत्तम आहे. गुरू अनेक प्रकारच्या विधीचा वापर करून लोकांना मनोविकारातून मुक्त करतात. भारतीय अध्यात्मशास्त्रात या विधींना ज्ञान, भक्ती किंवा कर्म या नावाने ओळखले जाते. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार व स्वभाव वेगवेगळे असतात. गुरूसुद्धा अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे मार्ग दाखवून मुक्त करतो. मुक्ती हा शब्दच भारतीय अध्यात्म शास्त्रात एक महत्त्वाचा शब्द आहे. या मनोविकाराच्या अनुचित प्रभावातून पूर्णपणे मुक्त होणे म्हणजेच त्या परमतत्त्वाला प्राप्त करणे होय.