ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी चित्त शुद्ध करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:03 AM2020-03-02T05:03:38+5:302020-03-02T05:03:50+5:30
ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी तुकोबाराय भावभरित वृत्ती आणि चित्ताची शुद्धता याला खूप प्राधान्य देतात.
- इंद्रजीत देशमुख
ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी तुकोबाराय भावभरित वृत्ती आणि चित्ताची शुद्धता याला खूप प्राधान्य देतात. वास्तविक, चित्त शुद्ध व्हावं यासाठीच साधना करायची असते. ज्याप्रमाणे आपण देहाच्या स्वच्छतेसाठी साबण वापरत असतो, त्याप्रमाणेच चित्ताच्या शुद्धतेसाठी वेगवेगळी साधने वापरून साधना करायची असते. चित्त शुद्ध करणे हीसुद्धा एक प्रक्रिया आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. पारमार्थिक प्रवास करणाऱ्या साधकाच्या जीवनात एकदा चित्त शुद्ध झालं की मग तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे -
‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।
व्याघ्र ही न खाती सर्प तया।।’,
अशी आमची अवस्था होऊ शकते. मुळात आम्हाला जगातील वैगुण्य दिसण्याचं कारण हेच आहे की, आमच्या चित्तात मालिन्य आहे. ज्या वेळी आम्ही आमचं चित्त शुद्ध करू त्या वेळी आमच्या चित्तातील शुद्धीच्या अधिष्ठानामुळे आम्हाला सगळं जगच शुद्ध दिसेल. कुणाच्याच बाबतीतील उणेपणा किंवा अपुरेपणा आम्हाला जाणवणार नाही. एखाद्यामध्ये दोष असले तरी आपण त्याच्यातील चांगलेच पाहू. अगदी कबीर महाराज म्हणतात त्याप्रमाणे -
‘बुरा जो मै देखने चला
तो मुझसे बुरा न कोय।।’
या जगात वाईट शोधण्यासाठी वाईट दृष्टी धारण केली की आम्हाला सगळं वाईटच दिसेल आणि चांगलं शोधण्यासाठी चांगली दृष्टी धारण केली की सगळं चांगलंच दिसेल. जो जसे पाहिल, तसे त्याला दिसेल हे ठरलेले आहे. तसं पाहिलं तर आमचा भवताल जसाच्या तसा आहे. फरक आमच्या दृष्टीच्या धारणेत पडतो आणि परिणाम आमच्या जगाबद्दलच्या स्वीकृतीवर होतो. म्हणूनच शुद्ध चित्ताच्या अधिष्ठानाखाली आपली दृष्टी स्वच्छ करूया आणि अवघे स्वच्छ जग पाहूया एवढीच अपेक्षा.