गुणसंपत्ती हेच खरे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:10 PM2018-12-05T12:10:15+5:302018-12-05T12:10:25+5:30

ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही.

 Quality is the true glory | गुणसंपत्ती हेच खरे वैभव

गुणसंपत्ती हेच खरे वैभव

Next

सर्वसामान्य लोक घरदार, जमीन, सुखसाधने आणि द्रव्य यालाच ऐश्वर्य समजतात; परंतु ऐश्वर्य मोजायचे असेल तर ज्ञान आणि कर्तृत्वात मोजायला हवे. कारण ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे समाज जीवनात प्रत्ययास येतात.
भगवंताने गुणांनाच महत्त्व दिले आहे. त्यासंबंधीचे एक उदाहरण दृष्टीसमोर येते. बलरामाची वत्सला नावाची मुलगी होती. ती दुर्योधन पुत्र लक्ष्मणास देण्याचे बलरामांनी ठरविले. कारण लक्ष्मण हा ऐश्वर्यशाली घरातील होता; परंतु ती वत्सला मुलगी अर्जुन पुत्र अभिमन्यू यास देण्याचे गोपालकृष्णांनी बलरामास सुचविले. बलराम म्हणाले, कृष्णा अभिमन्यू हा वनवासी आहे. त्याच्याजवळ वैभव नाही. काय उपयोग? परंतु कृष्णाने बलरामाची समजूत घालून वत्सला अभिमन्यूला दिली. कारण तो गुणाने श्रीमंत होता. गीतेनेसुद्धा गुणांनाच श्रीमंती संबोधिले आहे. जीवनामध्ये ज्ञान ही खरी संपत्ती आहे. कारण ज्ञानातून वैभव निर्माण होऊ शकते. वैभवातून ज्ञान निर्माण होण्याची काही खात्री नसते. हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच विद्यार्थी जीवनात गुणांचे भांडवल जमा करता आले पाहिजे. गुण संपत्तीनेच आपले जीवन समृद्ध होते आणि दुर्गुणामुळे जीवनाचे सूत्र पूर्णत: विस्कटून जाते.
श्रीमद्भगवद्गीतेत संपत्तीचे दोन प्रकार सांगितले आहेत १) दैवी संपत्ती २) आसुरी संपत्ती. १६ व्या अध्यायात दैवी संपत्तीचे २६ गुण आहेत. दैवी संपत्तीचा पहिला गुण निर्भयता असून, शेवटचा गुण नम्रता आहे. दैवी संपत्तीला भरती आली तर जीवनाची दिवाळी होते. ओहोटी लागली तर जीवनाचे दिवाळे वाजते. दैवी संपत्तीमुळे प्रकृती संस्कृत होते. दैवी संपत्ती मिळविण्यासाठी रवींद्रनाथ म्हणतात आपण संपूर्ण शरणागती (प्रभूचरणी) स्वीकारली पाहिजे.
आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक सुखानंदाचा नाश करणारे ६ दुर्गण आहेत.
दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध : पारुष्यमेवच
अज्ञानं चाभि जातस्य पार्थ संपदमासुरीम अ १६/४ (गीता)
ह्यालाच आसुरी संपत्ती म्हटले आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरता, अज्ञानामुळे माणसाची दुर्गती होते. ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरण
तथा तिहिंची दुही जाण । साही दोष हे ।।
जीवनात दैवी गुण मिळविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याकरिता शुद्ध स्वरूपी ज्ञान आणि दैवी संपत्तीवर श्रद्धाभाव जपला पाहिजे. भारतीय संस्कृतीने शुद्ध ज्ञानावर अधिष्ठित अनेक श्रद्धा सामाजिक मनात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. गीताशास्त्राच्या मते चांगले कर्म करीत राहावे.
एका छोट्या मुलाने ८५ वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला आंब्याचे झाड लावताना पाहिले. तो म्हणाला, ‘आजोबा! ह्या झाडाचे आंबे तुम्हाला खायला मिळणार नाही कारण तुमचे वयोमान खूप झाले. तेव्हा आजोबांनी उत्तर दिले, बाळ ज्या आंब्याची फळे मी खाल्ली ते झाड मी थोडेच लावले होते. कोणीतरी पूर्वजांनी लावले. त्यांचे हे सत्कर्म. आपल्या जीवनातील मोठी कामे याच विशाल दृष्टीतून होत असतात. फळाची अपेक्षा न करता श्रेष्ठ कर्म आपल्या जीवनात पूर्ण होतीलच असे नाही; पण सत्कर्म गुण जोपासला पाहिजे. कर्मापेक्षा कर्माकडे पाहण्याची आंतरिक दृष्टी महत्त्वाची. आपल्या सर्वच कर्मांनी ईश्वराची पूजा करावी. जीवनातील प्रत्येक काम ईश्वरार्पण भावनेने करावे. कर्म कोणत्या भावनेने करीत आहो, याला महत्त्व आहे. जेथे-जेथे श्रेष्ठता आहे, गुणांचा उत्कर्ष आहे, शील कर्माचे सौंदर्य आहे, तेथे-तेथे भगवंताचे अधिक तेज प्रगट झाले आहे.

- ज्ञानेश्वर मिरगे
(शेगाव)


 

Web Title:  Quality is the true glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.