रामभक्त हनुमान शक्ती आणि भक्तीचा अपूर्व संगम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:34 AM2019-04-19T05:34:01+5:302019-04-19T05:34:35+5:30
हनुमान, हनुमंत, मारुती, कपिश्रेष्ठ, महारुद्र, आंजनेय, प्रभंजन, रामदूत अशी अनेक नावे धारण करणाऱ्या रामभक्त हनुमानाला नमस्कार.
- शैलजा शेवडे
हनुमान, हनुमंत, मारुती, कपिश्रेष्ठ, महारुद्र, आंजनेय, प्रभंजन, रामदूत अशी अनेक नावे धारण करणाऱ्या रामभक्त हनुमानाला नमस्कार. शक्ती आणि भक्तीचा अपूर्व संगम. रुद्राचा अवतार असा मारुती. रामायणातील सुंदर कांड म्हणजे महाबली हनुमानाच्या अतुल सामर्थ्याची आणि अद्भुत सामर्थ्याची दिव्य गाथा आहे. रामरक्षेत त्याची जितेंद्रिय, बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मज वानरयुथमुख्यं अशी नावे आहेत. समर्थ रामदासांनी मारुतीची आरती लिहिली. मारु ती स्तोत्र लिहिले, मारुती नमस्कार लिहिले. रामायणात रामभक्त हनुमानाचे अत्यंत सुंदर वर्णन आहे, सीतेला रावणाने समुद्रापार लंकेतील वनामध्ये बंदिस्त करून ठेवले आहे, हे अंगदाच्या नेतृत्वाखाली गेलेल्या वानरसेनेला कळले. आता शंभर योजने समुद्र उल्लंघून जाण्याचा आणि परत येण्याचा प्रश्न होता. नल, नील, जांबुवान प्रत्येकाने आपापल्या बळाचा उच्चार केला, पण कोणीच समर्थ नव्हता. दूर एकीकडे बसलेल्या हनुमानाला जांबुवानाने गाठले. त्याला त्याच्या प्रचंड सामर्थ्याचे स्मरण ‘हे समस्त वानरकुलात सर्वश्रेष्ठ, सर्वशास्त्रविशारद हनुमाना, तू गप्प का बसला आहेस. तू सुग्रीवाला तुल्यबळ आहे, इतकंच नाही, तर तेज आणि रामलक्ष्मणाच्या बरोबरीत आहेस असं मला वाटतं,’ या शब्दांत करून दिलं. आपल्या सामर्थ्याचे स्मरण होताच हनुमानाने अतिप्रचंड रूप धारण केले आणि त्या महापराक्रमी, विचारी वानरश्रेष्ठाने मन स्वस्थ ठेवून लंकेचे स्मरण केले. महेंद्र पर्वतावरून आकाशात झेप घेतलेला वायुपुत्र मध्ये कोठेही न थांबता शंभर योजने समुद्र उल्लंघून लंकेच्या किनाºयावर पोचला. सीतेपाशी रामाचा दूत बनून पोचला. तो महावीर हनुमान आमच्या मनात अखंड रामभक्ती निर्माण करो. आम्हाला सामर्थ्यशाली करो.