तरूणांनो ! सर्वगुण संपन्न व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:29 PM2019-04-30T14:29:07+5:302019-04-30T14:30:19+5:30

संत ज्ञानेश्वर यांचे पासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत सर्वच संतांनी देशातील युवकांना त्यांच्या साहित्यातून एक दैदीप्यमान संदेश दिला आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj massage for youth | तरूणांनो ! सर्वगुण संपन्न व्हा

तरूणांनो ! सर्वगुण संपन्न व्हा

googlenewsNext

महाराष्ट्राला संतांची तेजस्वी व सात्विक विचारांची महान परंपरा लाभली आहे.संत ज्ञानेश्वर यांचे पासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत सर्वच संतांनी देशातील युवकांना त्यांच्या साहित्यातून एक दैदीप्यमान संदेश दिला आहे. युवकांनी बलवान व्हावे, नितिमान व बुद्धीमान व्हावे व जीवन देशसेवेकरिता लावावे असा आग्रह संतांनी त्यांच्या साहित्यातून व विचारातून मांडला आहे.
संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगितेतून तरुणांना एक प्रखर क्रांतिकारक संदेश दिला आहे. तरुणांनी आपक्या गावाला समृद्ध करण्यासाठी झटावे असा आशावाद ते मांडतात. गावाच्या विकासातून देशसेवेकरिता तरुण तयार व्हावा असा विचार त्यांनी तरुणांना दिला आहे.
नुसते नको उच्च शिक्षण।
हे तर गेले मागील युगी लापोन।।
आता व्हावा कष्टीक बलवान।
सुपुत्र भारताचा।।
युवकांनी तपोबलाने आत्मकल्याणातून स्वत:चा विकास साधावा. सोबतच गावं व देश सेवेकरिता पुढे यावे.
गावा गावाशी जागवा।
भेदभाव हा समूळ मिटवा।।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा।
दास तुकड्या म्हणे।।
राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगितेतून युवकांना आपल्या जीवनाविषयी जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. बालपणी विद्यार्जन करून शरीर कमवावे.
आई, वडील गुरू यांच्या सेवेसोबतच ग्रामसेवा, देशसेवा याना आपल्या जीवनाचे ध्येय मानावे असे ते सांगतात. लहान वयापासूनच मुलांना योग्य शिक्षण व संस्कार जर दिले तर त्यांच्या मधूनच उद्याच्या संपन्न भारताची पिढी निर्माण होईल.
या कोवळ्या कळ्यामाजी। लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी।।
विकसता प्रगटतील।शेकडो महापुरुष समाजी।।
भारताचा मुख्य आधारही युवकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कष्टकरी जनतेच्या सेवेकरिता भारताच्या सुपुत्राने पुढे यावे. त्याने देश हा देव असे माझा ही भावना जागृत ठेवावी नाहीतर सामान्य माणसांच्या जीवावर इतर माणसे चैन करतील असे ते सांगतात.
कष्ट करोनि महाल बांधसी ।
परी झोपडीही नसे नेटकीशी।
स्वातं त्र्या करिता उडी घेशी।
परी मजा भोगती इतरची।।
राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही प्रत्येक युवकांसाठी एक आदर्श जीवन प्रणाली आहे. त्या दिव्य ग्रंथाच्या आचरणाने प्रत्येक युवक आपल्या जीवनाचा, गावाचा व देशाचा शिल्पकार होऊ शकतो.
तुकडोजी महाराजांक्सच्या जीवन कालखंडामध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाला जागृत करणे व राष्ट्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी तरुणांना क्रांतीकारी आवाहन केले होते. तरुणांनी बळ, शौर्य, धैर्य या मूल्यांना आपल्या जीवनाचा मुख्य आधार मानून त्यांना समाजाच्या देशाच्या उत्थानासाठी वापरावे असा आवाज त्यानी युवकांना दिला.
झाड झडूले शास्त्र बनेगे ।
भक्त बनेगी सेना
पत्थर सारे बॉम्ब बनेगे ।
नाव लगेगी किनारे।।
आशा प्रकारे त्यांनी देशातील प्रत्येक चेतन व अचेतन वस्तूला स्वातंत्र्य संग्रामात योगदान देण्यासाठी आवाहन केले होते. युवक भारताच्या भविष्याला आकार देण्यासाठी सक्षम आहेत त्यांनी आपल्या सामथ्यार्चा उपयोग करावा.
युवकांनी जीवन जगतांना एक तरी कला गुण अंगी बाणवून आपले जीवन स्वाभिमानाने जगावे यासाठी युवकांनी फक्त शिक्षण घेऊन उपयोग नाही तर विहिरी, नदी, तलाव यामध्ये पोहणे ही कला अवगत करावी. स्वचरिताथार्साठी कोणत्याही व्यवसाय नोकरीला लहान व मोठा न मानता तो व्यवसाय नोकरी निष्ठेने करावा. जीवन आनंदाने जगत येण्यासाठी एक तरी कला अंगी असावी असं आवाहन ते करतात.
मुलात एक तरी असावा गुण।
ज्यामुळे त्यात पोट भरेल निपुण।।
युवकांनी देश भावनेला देव भावना मानण्याची गरज आज निर्माण झाली आहे. युवकांनी फक्त स्वत:पुरतेच जीवन न जगता स्वत:चे जीवन हे राष्ट्रभावनेतून जगावे. राष्ट्रसंतांची लहर की बरखा, आदेश रचना यातील पद रचना ही जनजागृतीसाठी खूप प्रभावी आहेत. महाराजांचे विचार युवकांना जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी आहेत.
जीवनाच्या गरजा संपूर्ण। निवार्हाचे एक साधन
याचा असावा अंतर्भाव। एक तो शिक्षणी।।
युवकांनी निर्व्यसनी होण्याचे आवाहन ते करतात. व्यसन करणारे युवक जीवनात काहीच मिळवू शकत नाहीं. स्वत:च्या जीवनाला घडविण्यासाठी आपले जीवन खर्ची घालावे व्यर्थ कुठेही न फिरता आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून त्या ध्येयासाठी प्राणपणाने प्रयत्न करावेत. आपल्या गावाच्या विकासासाठी वेळ खर्ची घालावा.स्वत:च्या जीवनाला आकार देण्यासाठी आपल्या शक्तीस्थळांना ओळखून त्यांना विकसित करावे वआपल्या मयार्दा, उणीवा याना कमी करून जीवन उन्नत करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
युवकांसाठी राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेममध्ये एक आदर्श आचारसंहिताच सांगितली आहे. ज्याद्वारे प्रत्येक युवक आपल्या आयुष्याची उद्दिष्टे प्राप्त करून आपले आत्मकल्याण साधू शकतो. देशसेवा हा सर्वात मोठा धर्म युवकांचा आहे तो त्यांनी प्राणपणाने जपावा व भारताला समथ्यशाली बनवावे असे आवाहन राष्ट्रसंत करतात.
- डॉ.हरिदास आखरे

Web Title: Rashtrasant Tukdoji Maharaj massage for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.