रावण वध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:27 AM2019-10-10T00:27:18+5:302019-10-10T00:27:37+5:30

पुष्पवृष्टी हो, रामरथावर, दिशा स्वच्छ झाल्या, रावणवध झाला, जय तो रामाचा झाला।

Ravana slaughter | रावण वध

रावण वध

Next

- शैलजा शेवडे

आदित्य हृदय स्तोत्र म्हणूनी, मनोभावे सूर्यास प्रार्थूनी,
इंद्राच्या रथी सज्ज होऊनी, रावणवधिण्या राम निघाले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले ।
बलाढ्य, पण दुर्बुद्धी रावण, देवांनाही अजिंक्य रावण,
वधावयाला त्याला मग, राम सिद्ध झाले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले ।
शस्त्रअस्त्री, दोघे तुल्यबळ, दोघेही ते युद्धनिपुण,
एकमेकां वधिण्या इच्छुक, रणांगणी ठाकले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले ।
शरवृष्टीने पृथ्वी हाले, सप्तसागर क्षुब्ध झाले,
बाणांनी आकाश व्यापले, सूर्यतेज निस्तेज भासले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले।
बाणाने रामाच्या एका, रावण मस्तक तुटून गेले,
दुसरे मस्तक तत्क्षणी आले, शंभर वेळा असेच झाले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले।
करुनी देत स्मरण रामा, इंद्रसारथी हळूच बोले,
प्रभो वापरा, पैतामह अस्त्र, रावण मरण आज पातले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले।
ब्रह्मास्त्र प्रत्यंचेवरी, राम अभिमंत्रित करी,
पृथ्वी थरथरली, राक्षसहृदयी भय भरून गेले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले।
आकर्ण धनुष्य ओढून, राम सोडितो बाण,
आदळे रावण वक्षस्थळी, हृदय फोडुनी टाकले,
युद्ध सुरू झाले, अलौकिक युद्ध सुरू झाले।
रावणाचा घेऊनी प्राण, अस्त्र शिरे रामभात्यात,
मुखातून रक्त ओकत, मृत रावण भूमीवर कोसळे,
युद्ध ते वेगळे, अलौकिक युद्धच ते वेगळे।
रावणवध झाला, रामाने, रावण वध केला,
विजयोन्मादे गर्जती वानर, आनंद फार झाला.
नभी दुंदुभी वाजू लागती, दिव्यगंधे वायू वाहती,
पुष्पवृष्टी हो, रामरथावर, दिशा स्वच्छ झाल्या,
रावणवध झाला, जय तो रामाचा झाला।

Web Title: Ravana slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.