जग विष्णुमय असल्याचे ज्ञान झाले तोच खरा भक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 07:02 PM2019-03-12T19:02:47+5:302019-03-12T19:03:38+5:30
सर्व प्राणीमात्रात भगवंत आणि भगवंतांमध्येच सर्व प्राणीमात्रांना जो बघतो तोच खरा भागवत.
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी
श्रीमद् भागवतात वसुदेवाने देवर्षी नारदांना विश्व कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारला, त्यावेळी नारदांनी वसुदेवाला राजा जनक व नऊ योगेश्वरांचा संवाद सांगितला. राजा जनकाने एकदा योगेश्वरांना विचारले महाराज, मनुष्यामध्ये भागवत कोणाला म्हणावे? भगवत् भक्तांचा धर्म कोणता? भगवत् भक्त माणसांशी कसा वागतो? कसा बोलतो? त्याचा स्वभाव कसा असतो? आणि तो कोणत्या लक्षणांमुळे भगवंताला प्रिय होतो..? राजा जनकाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना हरी नावाचे योगेंद्र राजाला म्हणाले, राजा... सर्व प्राणीमात्रात भगवंत आणि भगवंतांमध्येच सर्व प्राणीमात्रांना जो बघतो तोच खरा भागवत. दृश्य प्रपंचात ब्रह्म आणि ब्रह्मा, जो दृश्य प्रपंचाला बघतो ना तोच खरा भागवत भक्त. ज्याला हे जग विष्णुमय असल्याचे ज्ञान झाले तोच खरा भक्त समजावा.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील विष्णू भक्ताचे असाधारण धर्मरूप लक्षण सांगताना असेच सांगितले आहे. आप-पर भावरहित आचरण असणं हा खरा भागवत धर्म आहे. योगेश्वरांनी भागवत धर्माचे रहस्य सांगताना भक्ताचे १) प्राकृत भक्त २) मध्यम भक्त ३) उत्तम भक्त असे तीन प्रकारे वर्णन केले आहे. प्राकृत भक्ताचे वर्णन करताना महर्षी व्यास म्हणाले, जो फक्त मूर्तीची पूजा करतो, भगवत भक्तांची शुश्रूषा करीत नाही, माझीच भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, माझाच देव, माझाच धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, असे जो मानतो तो प्राकृत भक्त समजावा. या भक्ताला स्वत:च्या देवाबद्दल, धर्माबद्दल, खूप मोठा अभिनिवेश असतो. इतर देवाबद्दल, धर्माबद्दल त्याच्या मनात असहिष्णुता असते, असा भक्त प्राकृत भक्त समजावा. बहुतांशी अशा प्रकारचे भक्त आज विपुल प्रमाणात आपल्याला दिसतात. आज माणसं तासनतास देवाची पुजा करतात, पारायणं करतात, व्रतवैकल्यं करतात, वारी करतात, पण चालत्या बोलत्या जिवंत माणसांचा तिरस्कार करतात. ज्याला जिवंत माणसावर प्रेम करता येत नाही, तो न दिसणाऱ्या देवावर कसा प्रेम करणार? धर्मबाह्य आचरण देवाला तरी आवडेल का ?
मध्यम भक्तांचे लक्षण सांगताना शास्त्रकार म्हणतात हा भक्त भगवंताची दास्य भक्ती करतो. या भक्ताच्या अंत:करणात भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम असते. इश्वर भक्तांबद्दल मैत्रीपूर्ण भाव असतो पण मध्यम भक्तांची भक्ती उदात्त असली तरी व्यापक नाही. कारण अशा भक्तांची भक्ती ही आत्मोद्धाराच्या साधनेनेच चाललेली असते. समाज कल्याणाची किंवा समाज उद्धाराची तळमळ त्यात नसते. ब्रह्मज्ञान मिळवून स्वत:चा उद्धार करतो पण इतर जिवांचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून भंडपण आहे असे नाथ महाराजांनी खडसावून सांगितले आहे. वैयिक्तक मोक्षामागे लागलेले योगी, संत महात्मे यांच्यात हाच फार मोठा फरक आहे. जगाला ब्रह्मरूप समजून जगातीलप्राणीमात्रांकडे ब्रह्मभावाने बघणे, हाच खरा भागवत धर्म आहे.इश्वर सर्वत्र भरलेला आहे, या अद्वैत भूमिकेतून भक्तीची साधना झाली तरच आत्मोद्धार आणि विश्वोद्धार होईल म्हणूनच सर्व भूतमात्रांमध्ये इश्वर भाव ठेवून जो भक्ती करतो तोच उत्तम भक्त होय.
उत्तम भक्तांचे लक्षण सांगताना, श्रीमद् भागवतकार म्हणतात, उत्तम भक्ताच्या चित्ताला राग, द्वेष, इर्षा, मोह, हर्ष, विषाद इत्यादी विकार कधीच शिवत नाहीत. त्याचे चित्त फक्त श्रीहरीच्याच ठिकाणी स्थिर असते, त्यामुळे कामविकार निर्माण होत नाही. काम नाही म्हणून त्यापासून निर्माण होणारे कर्म नाही. कारण कर्माला कारण असणारे अज्ञानाचे बीजच नष्ट झालेले असते. तो कर्म करून देखील अकर्मीच राहतो. भक्ती साधनेतूनच सर्व भूतमात्रात एक परमेश्वर भरलेला असल्याची प्रचिती त्याला आलेली असते.
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. भ्रमणध्वनी : 9421344960 )