नात्यांचे रेशीम बंध उलगडताना.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 09:06 PM2020-04-18T21:06:12+5:302020-04-18T21:07:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पण का होईना माणसे माणसांमध्ये रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे
माणूस अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत धडपडत असतो. आयुष्य सुखाने जगता यावे तो बऱ्याच गोष्टींशी समझोता करत असतो. कधी आवडी निवडी तर कधी नाती... पण आयुष्य चैनेत जगण्याची स्वप्न उराशी बाळगून घड्याळाशी काट्याची टक्कर देताना तो कुटुंबाली वेळ देण्यास पण काचकुच करतो. मग रक्ताच्या नात्यात देखील समन्वयाचा अभाव जाणवू लागतो. संवादाची जागा वाद घेण्यास सुरुवात करतो. अशावेळी तुम्हांला वेळीच धोक्याचा इशारा समजून घेणे गरजेचे असतात. नाहीतर आयुष्यातला आनंदाचा रंग ऊडून जायला काहीवेळ लागत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पण का होईना माणसे माणसांमध्ये रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक वर्षांपासून तुटलेला संवादाचा पूल यामुळे जोडला जात आहे. रक्ताच्या नात्यांमधील गोडवा पुन्हा वाढीस लागला आहे. विशेषत: गावाकडे अशाप्रकारची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. पाच - दहा वर्षांपासून शिक्षण, नोकरी निमित्ताने पुण्या मुबंईत जाणाऱ्या व्यक्तीला घरातल्या माणसांकडून मायेची ऊब मिळाली आहे.
कोरोनामुळे सध्या सर्वच शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. यामुळे बाहेर गावावरून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या मुलामुलींना पुन्हा गावाकडचा रस्ता धरावा लागला आहे. अशात काहीजण आई वडिलांसोबत भांडण करून शहरात आपले नशीब आजमवण्यासाठी आले होते. पाच सहा वर्षांपासून गावाकडे जाणे झाले नाही. घरच्यांबरोबर अबोला कायम होता. मात्र अचानक लॉकडाऊन झाले आणि समोर गंभीर परिस्थिती उभी राहिली. दोन वेळच्या जेवणाचे हाल होऊ लागले. अशावेळी अनेकांनी पुन्हा आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे कित्येक वर्षांनंतर वडील आणि मुलाचा संवाद घडला. अशा घटना दिसून आल्या आहेत. याबाबत अनेकांनी आपले अनुभव व्यक्त केले आहेत.
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि कंपनीत काम करणाऱ्यांना घरच्यांनी बोलवून घेतले. ते घरी पोहोचले आहेत. भाव-भाव, वडील मुलगा यांचे पटत नव्हते. मात्र, या संसर्गाच्या भीतीमुळे नात्यातील वाद मिटवून एकत्र आले आहेत. एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. भाऊच नाही तर भावकीतील लोक संपर्कात आले आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात नातेवाईकजवळ आले असून, दररोज फोन, व्हिडिओ कॉल करून खुशाली जाणून घेत आहेत. काही लोक लॉकडाऊनमुळे गावी पोहोचू शकले नाही. ते शहरात असल्याने विशेष करून त्यांची काळजी गावाकडील लोक करत आहेत. गरज असेल तेव्हाच घरातून बाहेर निघा. अन्यथा घरातच राहा. घरातून बाहेर पडला तर काळजी घ्या. सोशल डिस्टेन्स पाळण्याचे आवाहन गावातील लोकांकडून करण्यात आहे. शहरात दोन हजारहून अधिक विद्यार्थी अडकले असून. त्यांचीही कुटुंबियांकडून काळजी घेण्यात येत आहे.