मनुष्याने सत्शील, स्नेहल बनावे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 07:51 AM2020-01-27T07:51:39+5:302020-01-27T07:55:24+5:30
उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते.
मनुष्य हा सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठ आहे. सर्व प्राणी-वनस्पती या सर्वांचे अवलोकन मनुष्य करतो, सृष्टीचे सौंदर्य न्हाळतो, त्याची गुणात्मकता तपासतो. अनुभव घेणे, त्या सृष्टीचा अनुभव कथन करणे ही सर्व कार्य मनुष्य करतो. कारण मनुष्य नसता तर या सृष्टीचे रहस्य कोणी जाणले नसते. मनुष्याने नेहमी चांगले जीवन व्यतीत करावे. उंच शिखरावर जाणे, कर्तृत्ववान बनणे, जीवनाचा आनंद घेणे ही कृती मनुष्य करतो. सर्वोच्च प्राणी म्हणून मनुष्याची गणना केली जाते. उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते. उत्साहवर्धक ‘मन’ जीवन जगताना चेतना प्राप्त करुन देते. ‘चेतना’ ही मनाची प्रसन्नता आहे. मनाची प्रसन्नता वाढू लागली की, घबराहट संपते. जीवनात सफलता प्राप्त होते. विशाल बुद्धीचा अनुभव करता येतो. बुद्धीच्या जोरावरच जीवनात काहीतरी क्रांती घडू शकते. मनुष्य जीवनात सुखरूपी अमृत, दु:खरूपी विष पचवता आले पाहिजे. निंदारूपी विष पचवले की सुखाच्या अनुभूतीची वाट सापडते. कारण संतांनी सांगितले आहे, निंदा आणि स्तुती ही तर मानवी मनाचे भाव आहेत.
निंदा मानणे न मानणे यात सुख-दु:ख अवलंबून आहे. जो प्राणी विकारयुक्त आहे, कुव्यसनात आहे, अडकलेला आहे, विषयभोगातच सर्वरूप सुख आहे याची कल्पना तो करतो. सुख असो दु:ख, ह्या दोन्ही बाजू मानवी मनावर अवलंबून आहेत. मनुष्यप्राणी या दोन्ही बाजूंना कसा समजून घेतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. माणूस योग्य पदाला पोहोचला की तो जगाला उपदेश करण्याचा अधिकारी बनतो. उपदेश त्याचाच लागू होतो. जो सत्शील आहे. ज्याचे आचरण आणि वाणी एकमताने चालते. तोच या जगाला उपदेश करु शकतो. त्याचाच उपदेश जगाला मान्य होतो. त्याच्या उपदेशानुसारच लोक आचरण करतात. मनुष्याने स्नेहल बनावे. मनुष्याचे जीवन अमृतमय आहे. फक्त शुद्ध आचरणाने वागले तर...
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)