शिथिल व्हा आणि सहज राहा; समर्पण ही ताकद! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 07:08 PM2018-10-29T19:08:29+5:302018-10-29T19:08:52+5:30

‘समर्पण’ या शब्दाचे दोन पैलू आहेत. एक आहे ‘समर्पण’ शब्दाचा पौर्वात्य पैलू तर दुसरा पाश्चात्य दृष्टिकोनातून येणारा. एक प्रकार आहे तो पराभूत झाल्याने केलेले समर्पण. गुलाम स्वत:ला समर्पित करतात.

Relax and stay comfortable; Dedication is the power! | शिथिल व्हा आणि सहज राहा; समर्पण ही ताकद! 

शिथिल व्हा आणि सहज राहा; समर्पण ही ताकद! 

Next

- श्री श्री रविशंकर

‘समर्पण’ या शब्दाचे दोन पैलू आहेत. एक आहे ‘समर्पण’ शब्दाचा पौर्वात्य पैलू तर दुसरा पाश्चात्य दृष्टिकोनातून येणारा. एक प्रकार आहे तो पराभूत झाल्याने केलेले समर्पण. गुलाम स्वत:ला समर्पित करतात. ते हृदयातून केलेले समर्पण नसते, तर ते केवळ आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक दुबळेपणामुळे केलेले असते. त्यांना दुबळेपणामुळे वश केले जाते. आता आध्यात्मिक दृष्टीने याचा पूर्णपणे वेगळाच अर्थ आहे. तुम्ही नकारात्मक भावना आणि नकारात्मक गुणांनी त्रस्त होत असता आणि त्याला तसेच बाळगणे ही अजून मोठी पीडा असते. ती नकारात्मकता सोडून देणे, जी अजून सहणे, हाताळणे अशक्य आहे, तिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून ‘समर्पण’ असे म्हटले जाते. हे पूर्णत: वेगळे आणि पाश्चात्य प्रकारच्या पराभव अर्थाच्या  समर्पणाच्या अगदी विरु द्ध आहे. हा समर्पणाचा प्रकार म्हणजे त्याला जिंकून घेणे आहे. तुम्ही नकारात्मकता सोडून देऊन, त्याला दूर सारून त्यावर, स्वत:वर, आपल्या मनावर मात केली आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्टीने समर्पण म्हणजे ताकत व सामर्थ्य होय, गुलामगिरी नव्हे. यामुळेच जेव्हा तुम्ही वैष्णव मंदिरात जाता, तेव्हा ते  शरणागती म्हणतात, ज्याचा अर्थ आहे भगवंताला समर्पण. जेव्हा तुम्ही अशी शरणागती करता, तेव्हा तुमच्या डोक्यावर एक चांदीचा मुकुट ठेवला जातो. या मागचा आध्यात्मिक भाव असा आहे की, जर तुम्ही आपली नकारात्मकता समर्पित केलीत, तर तुम्ही एखाद्या राजासारखे सामर्थ्यशाली बनता. कन्नडमध्ये एक म्हण आहे, शरणा शरणार्थी. म्हणजे जो शरण गेला आहे, त्याला मी शरण जातो. इथे संतांना शरण गेलेले म्हणजेच ‘समर्पित’ असे म्हटले आहे आणि संत हे सर्वात सामर्थ्यवान आणि आदरणीय असतात. कारण त्यांनी आपली नकारात्मकता पूर्णपणे अर्पण करून, ते दिव्यतेला शरण गेलेले असतात. जेव्हा नकारात्मकता सोडून दिली जाते, तेव्हा आपण पूर्णपणे सकारात्मक असतो आणि हेच संतत्व आहे. जेव्हा तुम्ही आपल्या नकारात्मक गुणांचे आणि तुम्हाला नको असलेल्या सर्व गोष्टींचे समर्पण करता, तेव्हा तुम्ही शक्तिशाली बनता. तसेही, सर्व काही त्या विशाल चेतनेच्या, ब्रह्मांडाच्या अधीन आहे, हे लक्षात असावे. अर्थात, समर्पण करण्यासाठी फार धडपड करू नका. नाहीतर विचार करत बसाल, अरेरे, मी तर शंभर टक्के समर्पण करू शकत नाही किंवा व्वा, मी शंभर टक्के समर्पण करू शकतो. हे सारे मनाचे खेळ आहेत. हे सारे सोडा. शिथिल व्हा आणि सहज राहा.

Web Title: Relax and stay comfortable; Dedication is the power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.