सात्त्विक संगीत मनाला शांती देते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 07:36 AM2019-08-26T07:36:08+5:302019-08-26T07:41:05+5:30
शक्ती अद्भुत ते अंगी।।’ गायनामध्ये खूप शक्ती आहे. माणसाच्या मनातील विचार बदलण्याची शक्ती गायनात आहे.
चारही वेदांमध्ये ‘सामवेद’ ही भगवंताची विभूती आहे, असे गीतेमधील दहाव्या अध्यायात म्हटले आहे. सामवेदात गायनाचे प्रकार सांगितले आहेत. गायन हे मनावर विशेष परिणाम घडवते. गायनाने माणसाच्या मनावर अधिक परिणाम होतो. मनावर तत्काळ परिणाम घडवायचा असेल तर संगीताचा फायदा होतो. उदा. दुभत्या गायींना संगीत ऐकवले तर गायी अधिक दूध देतात, शेतावर गायन लावले तर शेतामध्ये धान्य अधिक पिकते, असे गायनाचे महत्त्व गुरुजनांच्या मुखातून ऐकले आहे. रोगी लोकांच्या दवाखान्यात जर गायनाच्या सी.डी. लावल्या तर त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटते. उत्तम संगीत रोग्याला ऐकवले तर त्यास चांगले आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते. गायनाचा परिणाम शेती, बागायती, झाडे यावरही होतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘गायनाचे रंगी।
शक्ती अद्भुत ते अंगी।।’ गायनामध्ये खूप शक्ती आहे. माणसाच्या मनातील विचार बदलण्याची शक्ती गायनात आहे. भडकलेल्या मनाला गायनामुळे शांती प्राप्त होते; परंतु ते संगीत सात्त्विक असावे. सात्त्विक संगीत मनाला शांती देते. कारण काही गाण्यांमध्ये उच्च-नीच तानांची सरमिसळ झाली की ते कर्कश वाटतात. कोणते संगीत ऐकावे यावरही बरेच काही अवलंबून असते. वेदामध्ये सामवेदात गायनाचे महत्त्व विशद केले आहे. सामगायनामध्ये वरच्या स्वरावरून खालच्या स्वराचे आलाप घेतले जातात. संगीतामध्ये गानप्रकारामध्ये आलापीद्वारे काव्याच्या भावाचे दिग्दर्शन व तालामध्ये कलेचे दिग्दर्शन होत असते. गायनामध्ये दत्त-उदात्त-अनुदात्त आदींचा विचार केला जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, दत्त उदात्त अनुदाता । प्रचुररहित पांडुरंग।।’ संगीतात कोणताही अभंग, मंत्र, स्तोत्रे गात असतात. त्या स्वराचा उंच-मध्यम-लय-गती याचा विचार केला जातो. त्याचाही परिणाम मनावर होत असतो. त्यामुळे गायन करताना शुद्ध व सात्त्विक स्वरुपाचे गायन करावे तेच गायन मनाला स्थिर करू शकते. सात्त्विक संगीतात टाळ-मृदंग-वीणा मोडतात, तर राजतिक संगीतात खंजरी-डफडी आदी आणि तायसिक संगीतात ढोलकी-नाल वगैरे येतात. सात्त्विक संगीत उत्छृंखल मनाला शांत करण्याचे काम करीत असते. मानसिक आरोग्यासाठी सात्त्विक संगीत ऐकावे. शुद्ध स्वरुपाचे गायन मनात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जास्पंदने निर्माण करते. मनाला नवचेतना मिळते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)