स्मरण देवाचे करावे. ....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:42 PM2019-12-05T12:42:55+5:302019-12-05T12:57:06+5:30
आठवण ही स्मृतीशी निगडीत आहे. त्या स्मरणाला वाणीने शब्द रूप देऊन उच्चारण केले तर नामस्मरण घडते.
- हभप भरतबुवा रामदासी ( बीड )
ईश्वराच्या प्राप्तीसाठी अध्यात्म शास्त्रात अनेक मार्ग सांगितले आहेत. त्या पैकी नामस्मरण हा सर्वात सोपा मार्ग शास्त्राने सांगितला आहे. नाम हे ईश्वरीय दिव्य शक्तिलाच दिलेले नाव आहे. नामस्मरण म्हणजे ईश्वराचे स्मरण. स्मरण म्हणजे आठवण. आठवण ही स्मृतीशी निगडीत आहे. त्या स्मरणाला वाणीने शब्द रूप देऊन उच्चारण केले तर नामस्मरण घडते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात;
नाम स्मरे निरंतर! तें जाणावे पुण्य शरीर! महादोषांचे गिरीवर !रामनामे नासती !!
जप योगाचे महत्त्व सगळ्याच संतांनी सांगितलेले आहे. ईश्वराचे नाम नित्य घेण्याने नाम, आणी नामी यांचे तादात्म्य होते. त्यामुळे जन्म जन्मांतरीचे पाप नष्ट होते. परमेश्वर हा नामस्वरूप आहे. मात्र हे नामस्मरण नितांत श्रद्धेने, समर्पण वृत्तीने, उत्कट प्रेम भावाने व निरागस वृत्तीने घेण्याची गरज आहे. माऊली हरिपाठात वर्णन करतात;
हरि उच्चारणी अनंत पाप राशी! जातील लयासी क्षणमात्रे!!
नाम हे भगवंताच्या रूपाचे निर्देशक आहे नाम स्मरण करता करता एक वेळ अशी यावी की त्याचेच रूप डोळ्यापुढे उभे राहावे. तरच ते खर्या अर्थाने स्मरण. संत एकनाथ महाराज म्हणतात;
नाम घेता हे वैखरी! चित्त धावे विषयावरी! कैसे होते हे स्मरण! स्मरणामाजी विस्मरण! नाम रूपा नाही मेळ! अवघा वाचेचा गोंधळ!!
असे होता कामा नये. वाचेने नाम व मनाने स्मरण चालले पाहिजे. असे झाले तरच फलसिद्धी घडेल. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात;
नाम उच्चारिता कंठी! पुढे उभा जगजेठी !ऐसे धरोनिया ध्यान! मनी करावे चिंतन!!
नामधारकाने सतत नामीचेच अनुसंधान ठेवावे. याच साधनेला जप असे म्हणतात. भगवान पतंजली जपाची व्याख्या करतांना म्हणतात;
तत् जपः तद् अर्थ भावनम् !
अर्थ म्हणजे इंद्रिये भावनेसह केलेले स्मरण म्हणजे जप. ? असा जप केला तरच फल सिद्धी प्राप्त होते. तंत्र शास्त्रात भगवान शंकर पार्वतीला सांगतात;
जपात सिद्धिर्जपात सिद्धिर्जपात सिद्धिर्वरानने. .!
आशा जपानचे सिद्धि प्राप्त होते. अशा साधन मार्गालाच नामस्मरण असे म्हणतात.
नवविधा भक्ती मध्ये देखील नामस्मरणाला अग्रस्थान दिलेले आहे. नामस्मरण ही भगवंताची अत्युच्च उपासना आहे. संत तुकाराम महाराज नामस्मरणाची महती सांगतांना म्हणतात;
नाम संकीर्तन साधन हे सोपे! जळतील पापें जन्मांतरीची! !
(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 83 29 87 84 67 )