नामस्मरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:49 AM2018-11-05T04:49:45+5:302018-11-05T04:50:06+5:30

बहुनां जन्ममामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। वासुदेव सर्वभिती स महात्मा सुदुर्लभ : ।। मनुष्यजन्म लाभल्यामुळे आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो, हे ज्ञान प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे.

 Remembrance | नामस्मरण

नामस्मरण

googlenewsNext

- वामन देशपांडे 
बहुनां जन्ममामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते।
वासुदेव सर्वभिती स महात्मा सुदुर्लभ : ।।
मनुष्यजन्म लाभल्यामुळे आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो, हे ज्ञान प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या प्रदीर्घ प्रवासानंतर जिवाला ही भाग्यशाली योनी प्राप्त होते. हे भान त्यासाठी प्रथम यावे लागते. भगवंताने हा श्रेष्ठ नरजन्म, जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाºया चक्रातून सुटण्यासाठी दिला आहे, परंतु माणूस आसक्तीमुळे देहाला कुरवाळीत बसतो आणि आत्मतत्त्व जाणून घेण्याचे विसरून जातो. वास्तविक पाहता, भगवंताच्या अंत:करणात मानवी योनीचे कल्याण व्हावे, म्हणून तर त्याने हा मनुष्य जन्म दिलेला असतो. ज्ञानपातळी ही भक्तीने पूर्ण भारल्याशिवाय सर्वत्र एक परमात्माच गच्च भरून दशांगुळे उरला आहे, हे भान माणसाला येतच नाही. सर्वत्र एक परमात्माच गच्च भरलेला आहे, हे ज्ञान फक्त मनुष्य योनीलाच ज्ञात होते. या संदर्भात भगवंतांनी एक महत्त्वाचा विचार दिला होता की,
अन्तकालेच मामेव स्मरन्मुक्ता कलेवरम।
य: प्रयाति स मदभावं याति नास्त्यत्र संशय ।।
पार्था अंतसमयी जो केवळ माझेच नाव घेत, आपला शेवटचा श्वास नामातच चिंब भिजवतो, हे मर्त्य शरीर कायमचे सोडताना, माझ्या ब्रह्मांडव्यी भव्य स्वरूपाला नामस्मरणाच्या बाहूने गाढ आलिंगन देण्याचा प्रयत्न करतो, त्या माझ्या प्राणप्रिय भक्ताला माझ्या दिव्य बाहूने गाढ अलिंगन देत, माझ्या स्वरूपात विलीन करतो. तो परमभक्त माझ्या भव्य स्वरूपाला प्राप्त होतो, तो क्षण त्या जिवाचा मुक्तीचा क्षण होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आयुष्यभर त्या माझ्या परमभक्ताने केवळ माझे नाम आपल्या हृदयगाभाºयात अखंडपणे घुमवत ठेवलेले असते.
पार्था, अंतसमयी माझे नाम ओठावर येण्यासाठी त्या त्या जिवाला माझे स्वरूपज्ञान प्राप्त होणे अतिशय आवश्यक आहे. दु:खमुक्त आयुष्य जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण.... पार्था, असे हे भाग्यवान परमभक्तच फक्त जाणतात की, मानवी आयुष्यात फक्त भगवंतालाच शरण जावे. भक्ताला हे तेव्हा कळते, जेव्हा तो नामामृताची गोडी अखंडपणे सेवन करीत असतो. थोडक्यात सांगायचे झाले, तर अखंड नामस्मरणात प्रत्येक श्वास घेणारे परमभक्त असे महात्मे खूप दुर्मीळ असतात, दुर्लभच असतात.

Web Title:  Remembrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.