सद्गुरुंच्या चरणावर अनुसंधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:58 PM2020-02-01T12:58:22+5:302020-02-01T12:58:32+5:30
आपले लक्ष पायांकडे असले की, अहंकार आपल्या जवळ येत नाही. मन, बुध्दी आणि चित्त सद्गुरू चरणी असेल तर आपल्या अंत:करणात अहंकार येणारच नाही. आपल्या सद्गुरूंचे पादुका पूजन करावे, हे भारतीय संस्कृती सांगते. पंढरपूरला पांडुरंगाच्या पायावर डोके टेकवण्यात धन्यता मानली जाते. देवाचे, अन्य थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेण्याचीही परंपरा आपण सर्वजण श्रध्देने जतन करतो आहोतच.
रामनाथ अय्यर, संघटक, अखिल भारतीय कीर्तनकुल अहमदनगर : आपले लक्ष पायांकडे असले की, अहंकार आपल्या जवळ येत नाही. मन, बुध्दी आणि चित्त सद्गुरू चरणी असेल तर आपल्या अंत:करणात अहंकार येणारच नाही. आपल्या सद्गुरूंचे पादुका पूजन करावे, हे भारतीय संस्कृती सांगते. पंढरपूरला पांडुरंगाच्या पायावर डोके टेकवण्यात धन्यता मानली जाते. देवाचे, अन्य थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेण्याचीही परंपरा आपण सर्वजण श्रध्देने जतन करतो आहोतच. अहंकाराचा वारा कसाही अन् कधीही येऊ शकतो. अहंकारासोबत दंभ येतो. दंभाने अज्ञान येते. सद्गुरूंच्या पादुकांवर आपले अनुसंधान असेल तर अहंकार दूर रहातो. अंगी नम्रता येते. भगवान श्रीकृष्णांच्या पायाशी बसलेल्या अजुर्नाचे भलेच झाले. लक्ष्मणाचे लक्ष सतत प्रभु श्रीराम व सितामाईंच्या चरणाकडेच असायचे. आपण आयुष्यभर आपल्या आवडीप्रमाणे जीवन जगत आलो. देवाची आवड लक्षात घेऊन आपण जीवन जगले का? असा प्रश्न आपण स्वत:लाच विचारला पाहिजे. आपल्या मर्जीप्रमाणे परमार्थ न करता जीवनाच्या मुक्तीकडे घेऊन जाणारा परमार्थ केला पाहिजे. आई-वडिलांना आपल्या मर्जीप्रमाणे नव्हे तर त्यांच्या मर्जीप्रमाणे सांभाळावे. भगवंताने आपल्याला जन्माला घातले ही श्रध्दा कायम अंतर्मनात असली पाहिजे. गर्भवती माता जे अन्न ग्रहण करते ते अन्न तिच्या पोटातील बाळाला नाळेव्दारे मिळणे, ही मनुष्याची नव्हे तर परमेश्वराची रचना आहे. बाळाचा जन्म झाल्यावर नाळ तुटली की लगेच मातेला पान्हा फुटणे ही मानवाची नव्हे तर परमेश्वराचीच व्यवस्था आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यावर देव कोठे आहे? हे विचारण्याची वेळ येत नाही. मनात संशय, चिंता, अहंकार नसावा. श्रीमंत होता आले नाही तरी चालेल मात्र चांगले व्हावे. सुसंस्कारी जीवन असावे. परमेश्वराचे आवडते झाल्यावर आपली वाटचाल शाश्वत सुखाकडे होते. -