योग्य मार्गदर्शक लाभला की प्राप्त होते देवपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:42 PM2019-08-10T14:42:32+5:302019-08-10T14:43:27+5:30
खरंच देव होता येते का? देवपण इतके सोपे आहे का?
- हभप भरतबुवा रामदासी (बीड )
देवपणाच्या प्रगटी करणासाठी माणसात संस्कार हवे. आज देवपण तर लांबच राहिले. माणसातले माणूसपण तरी कुठे शिल्लक राहिले आहे? माणसाने देव व्हावे ही या जगातल्या प्रेषितांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी संस्काराचे महत्त्व सांगितले. मंडळी. ...! खरंच देव होता येते का? देवपण इतके सोपे आहे का? तुकाराम महाराज साधना सांगतात-
देव पहावो देव पहावो! उंच जागी ऊभे राहावो !
उंच जागा ही साधना आहे. ही उंच जागा पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, कुल, वर्ण यांच्या सीमा पार असणारी आहे. देवपणा प्राप्त करण्यासाठी कितीतरी टाकीचे घाव सहन करावे लागतात. हे घाव सहन करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमत्वात असते ते देवपदापर्यंत जाऊ शकतात. मंडळी, ...दगडाला जर देव होता येते तर, माणसाला होता येणार नाही काहो? दगडातल्या देवपणाच्या प्रगटी करणासाठी जाणकार शिल्पकार मिळायला हवा. माणसाचही तसंच आहे. योग्य मार्गदर्शक लाभला की देवपण प्राप्त होते. आचार्य अत्रे यांची एक कविता मला आठवते. कविता भावपूर्ण आहे. कवितेचे नाव फत्तर आणि फुले ...!
डोंगराच्या एका पायथ्याशी एक मोठा प्रचंड दगड पडलेला होता. अनेक वर्षांपासून त्याच जागेवर तो पडून होता. जवळच एक जाईच्या फुलाची वेल बहरलेली होती. त्या बहरून आलेल्या फुलांनी एकदा त्या दगडाची थट्टा केली. अरे....! तू तर दगड. ..तुझा या जगाला उपयोग तरी काय...? तुझ्या जीवनात कुठलेही परिवर्तन नाही. क्र ांती नाही. काय उपयोग तुझा. .?
‘थट्टेखोर फुले हसून वदली धोंड्यास ती एकदा! धोंडा केवळ तू अरे न जगती काही तुझा फायदा!!
दगडाला फुलाचे टोचून बोलणे सहन झाले नाही. तो दगड फुलांना म्हणाला, तुमचे बाह्य सौंदर्य तरी किती काळ टिकणार आहे. .? तुम्ही पण एक दिवस कोमेजून जाल. ..! मग नुसतेच निर्माल्य. ....त्या वेळी तुम्हाला विचारतो तरी कोण. ..? दगडाचे हे उत्तर ऐकून, फुले मात्र पांढरी पडली. ...एक दिवस एक सुजाण शिल्पकार रस्त्याने जाताना त्या डोंगरावर आला. त्याने तो दगड बघितला. आणि त्या दगडात त्याला एक दिव्यता दिसली. त्याने अथक परिश्रमातून छन्नी हातोड्याच्या सहाय्याने त्या दगडाची एक सुबक सुंदर जगदंबेची मूर्ती घडवली. त्याच ठिकाणी ती ठेवली. एक दिवस देवीचा एक भक्त त्या रस्त्यावरून जाताना त्याने ती बघितली. तो मूर्तीजवळ गेला. शेजारीच असलेल्या जाईच्या फुलांनी मूर्तीची पुजा केली. देवाचिये द्वारी क्षणभर बसला. विनम्रपणे हात जोडले व आल्या रस्त्याने निघून गेला. तात्पर्य काय. ..तर, जाणकार शिल्पकार मिळण्याची गरज आहे. देव तर आपल्यातच आहे. दगडावर संस्कार केले. आणि देवत्व प्रगटले. असे सुयोग्य संस्कार घडले तर, मानवत्वाकडून आपल्यालाही देवत्वाकडे जाता येईल.
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांच्या संपर्क क्र.8329878467 )