नैतिक मूल्यांचा संस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 08:46 PM2019-08-10T20:46:54+5:302019-08-10T20:48:30+5:30
निष्कलंक, धारदार, तेजस्वी मानसिकता हेच चारित्र्याचे गमक आहे. असे चारित्र्य संपादन करण्यासाठी सुबुद्धीचा कौल स्वीकारून, परिस्थितीचे आव्हान स्वीकारून, आपला जीवन आदर्श मनाशी निश्चित करून दृढतेने अखंडपणे चालत राहणे हाच चारित्र्यवर्धनाचा मार्ग आहे.
- डॉ. दत्ता कोहिनकर
धो-धो पाऊस पडत असताना घाईतच कामावर निघालो. पाहतो तर काय, मोटारीचे चाक पंक्चर. त्यामुळे वेळ घालवण्यापेक्षा सोसायटीच्या गेटवर येऊन रिक्षाला हात केला व कारखान्यात पोचलो. थोड्या वेळाने लॅपटॉपची बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले. त्यातच पाच हजार रुपयेही होते. मन अस्वस्थ झाले. विचारचक्र फिरू लागले. तेवढ्यात फोन खणखणला. बॅगेत असलेल्या व्हिजिटिंग कार्डवरून नंबर घेऊन रिक्षावाल्याने फोन केला होता. नंतर गेटवर येऊन त्याने लॅपटॉपची बॅग व पैसे परत केले. त्या रिक्षावाल्याला मी बक्षीस म्हणून दोन हजार रुपये देऊ लागलो. त्याने नकार दिला. तो म्हणाला, ""साहेब, फक्त आशीर्वाद द्या. वडिलांनी सांगितले होते, मेहनतीच्या पैशालाच जवळ कर, आयुष्यात इमानदारीने जग.‘‘ नमस्कार करून तो निघून गेला. एका रिक्षावाल्याने जपलेल्या नैतिक मूल्यांमुळे अंतःकरण भरून आले.
खरोखर नैतिकता-चारित्र्य हा सुखाचा पाया आहे. आज चंगळवादाला ऊत आला आहे. मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. लोक आत्मकेंद्री होत आहेत. अशा परिस्थितीत तरुणाईवर नीतिमूल्यांचे संस्कार करणे गरजेचे आहे. महात्मा गांधींनी एक मूठ मीठ उचलले. लाखो लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. चारित्र्याचा केवढा हा प्रभाव. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, ""मला अशी थोडीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसे द्या, जी शुद्ध व चारित्र्यसंपन्न असतील- मी संपूर्ण जग बदलून टाकीन.‘‘
मॅकडुगल नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणत असे, की चारित्र्य म्हणजे स्थिर भाववृत्तीचा सुसंघटित आकृतीबंध होय. ज्या व्यक्तीच्या जीवनात हे भावसंघटन आढळते, त्यांनाच चारित्र असू शकते. जे प्रवाहपतित होतात, कोणत्याही क्षणी कशालाही वश होतात, कशावरही भाळतात त्यांना चारित्र्य लाभू शकत नाही. चारित्र्य म्हणजे स्त्री-पुरुषांनी परस्परांकडे पाहणे कटाक्षाने टाळणे व अपराध्यासारखे मान खाली घालून नाकासमोरून चालणे ही समाजात मान्य पावलेली भ्रामक अशी कल्पना आहे. चारित्र्यसंपन्न व्यक्ती विषयांध नसते, हे खरे आहे, पण तिच्या जीवनात असणारा ध्येयवाद हे तिच्या जीवनाचे शिखर असते. निष्क्रिय शालीनता म्हणजे चारित्र्य नव्हे. चारित्र्यावर आधारलेले शिक्षण घेतल्याने नैतिक मूल्यांची वृद्धी होते. नैतिक मूल्ये जपणारा माणूस हा दुःखमुक्त होतो.
भगवान गौतम बुद्धांनी शुद्ध चारित्र्याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हटले आहे. हत्या करू नका, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, खोटे बोलू नका, व्यसन करू नका या पंचशीलाचे पालन केल्यास मनुष्य चारित्र्यसंपन्न व सुखी होतो. भगवान बुद्ध म्हणतात, चारित्र्य हा महत्त्वपूर्ण दागिना आहे. तुम्ही आजारी पडलात तर सगळी संपत्ती खर्च करा, पण निरोगी व्हा. एखादा अवयव कापून टाकण्याची वेळ आली (गॅंगरीनमुळे) तर कापून टाका. पण ज्या वेळेस तुमचे चारित्र्य (शील) तुटायची वेळ येईल व नैतिक मूल्ये पायाखाली तुडवावी लागतील; त्यावेळी जीव गेला तरी चालेल पण पंचशील तोडू नका.
निष्कलंक, धारदार, तेजस्वी मानसिकता हेच चारित्र्याचे गमक आहे. असे चारित्र्य संपादन करण्यासाठी सुबुद्धीचा कौल स्वीकारून, परिस्थितीचे आव्हान स्वीकारून, आपला जीवन आदर्श मनाशी निश्चित करून दृढतेने अखंडपणे चालत राहणे हाच चारित्र्यवर्धनाचा मार्ग आहे.