। धाव्याची अनुभूती।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:55 AM2018-07-20T00:55:47+5:302018-07-20T00:55:58+5:30

सुखाचा सोहळा करूनि दिवाळी। प्रेमे वनमाळी चित्ती धरू।।

. Running Experience | । धाव्याची अनुभूती।

। धाव्याची अनुभूती।

Next

इंद्रजित देशमुख

सुखाचा सोहळा करूनि दिवाळी।
प्रेमे वनमाळी चित्ती धरू।।
या संतश्रेष्ठ सावताबाबांच्या वचनाप्रमाणे आपल्या सामान्य जीवनात हा सुखाचा सोहळा भरून आम्ही आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यासोबत वेळापूरहून निघून ठाकूर बुवांच्या समाधीजवळील या पालखी सोहळ्यातील तिसरा गोल रिंगण सोहळा आणि त्यातील आंनद अनुभवून तोंडले बोंडलेमार्गे भांडीशेगाव येथे विसावणार आहोत. मध्येच टप्प्यावेळी सोपानकाकांच्या पालखीची भेट होणार आहे. तर आमचे तुकोबाराय आज बोरगाव इथून निघून माळखांबी मार्गे तोंडल्या बोंडल्याहून पिराची कुरोलीत विसावणार आहेत. या दोन्ही पालखी सोहळ्यांतील आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे कारण माउलींच्या पालखी सोहळ्यात आज ठाकूरबुवांच्या समाधीजवळ गोल रिंगण होणार आहे आणि दुपारी सोपानकाकांची भेट होणार आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुपारी धावा अनुभवायला मिळणार आहे.
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात धावा हा एक विशेष आणि खूप आर्ततादायी सोहळा आहे. कारण पूर्वी आमचे तुकोबाराय याच मार्गे चालत पंढरीला चालले होते. तुकोबारायांचं पंढरीला जाणं आणि आमचं पंढरीला जाणं यात खूप अंतर आणि वेगळेपणा आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी अगदी उतावीळ झालेले आमचे तुकोबाराय अंत:करणातील अतीव आर्ततेने त्याला म्हणत होते,
‘बा रे पांडुरंगा केंव्हा भेट देसी।
झालो परदेशी तुजवीण।।
तुजवीण सखा मज नाही कोणी।
वाटते चरणी घालू मिठी।।
ओवाळावि काया चरणा वरोनी।
केंव्हा चक्रपाणी भेट देसी।।
तुका म्हणे माझी पुरवावी आवडी।
वेगीं घाली उडी नारायणा।।’
त्यांच्या भेटीसाठी अंत:करणातून विकल झालेले तुकोबाराय आळवून आळवून त्याला म्हणत होते ‘तू मला कधी भेट देशील? तुज्यावाचून माझं सगळं जगणं परदेसी म्हणजेच अनाथपणाचं झालेलं आहे. मला लवकर भेट दे कारण तुझ्यावाचून मला कुणीच सखा नाही. मला तुझ्या पायाला घट्ट मिठी मारायची आहे. माझ्या पूर्ण कायेला तुझ्या रूपावरून ओवाळून टाकावं की काय की ज्यानंतर तू मला भेट देशील असं झालंय; पण हे देवा माझी एकच आवड पूरव आणि मला धावत येऊन भेट दे.’
महाराजांच्या अंत:करणातील प्रभूच्या भेटीची आस व्यक्त करणारा आणखी एक खूप गोड अभंग आहे.
‘भेटीलागी जिवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन।
तैसे माझे मन वाट पाहे।।
दिवाळीच्या मुळा लेकी असावली।
पाहतसे वाटुली पंढरीची।।
भुकेलिया बाळ अतिशोक करी।
वाट पाहे परी माउलीची।।
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावुनी श्रीमुख दावी आता।।
महाराज त्यांच्या भेटीची रात्रंदिवस वाट पाहत होते. काय सांगावी ती अवस्था, ज्याप्रमाणे चकोर नावाचा पक्षी पौर्णिमेच्या चंद्राचे चंद्रमृत सेवण्यासाठी आसुसलेला असतो. त्याचे इतर कोणत्याच पदार्थ अथवा द्रवापासून समाधान होत नाही. महाराज मनापासून तशी वाट पाहत होते.
ती वाट पाहण्यात प्रचंड आर्तता होती. दिवाळीच्या सनावेळी सासुरवासाचा जाच असणारी एखादी सासुरवाशीण ज्या आतुरतेनं आपल्या माहेरच्या दिवाळी सणाच्या निरोपाची वाट पाहत असते. महाराजांचं तसचं झालं होतं ते म्हणतात , ‘हे पांडुरंगा माझ्या डोळ्याला एकच भूक लागली आहे आणि ती म्हणजे तुझं श्रीमुख डोळ्यांनी पाहण्याची म्हणून मला लवकर भेट दे आणि मला तृप्त कर,’ असं म्हणून ते वारंवार डोळ्यातून आसवं गाळावयाचे.
अंत:करणातून असे भावविभोर झालेले आमचे तुकोबाराय या परिसरातून म्हणजेच तोंडले बोंडले परिसरातून चालले होते. इथे एक नंदाचा ओढा नावाचा ओढा आहे. त्या ओढ्यात पूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अंघोळ केली होती, अशी आख्यायिका आहे. या ओढ्याजवळून जाताना आमच्या तुकोबारायांना अचानक पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसल्याचा भास झाला आणि महाराज,
‘तुका म्हणे धावा।
आहे पंढरी विसावा।’
असं म्हणून पंढरपूरच्या दिशेने धावत सुटले. यालाच धावा म्हणतात. अजूनही महाराजांचा पालखी सोहळा इथे आला की, वारकरी पंढरीच्या दिशेने धावतात यालाच धावा म्हणतात.
आज आम्ही याच धाव्याची अनुभूती घेणार आहोत; पण हा धावा अनुभवताना आमच्या अंत:करणाची धाव म्हणजेच सीमा आमच्या तुकोबारायांप्रमाणेच व्यापक आणि विशाल होऊन आम्हालाही त्या सावळ्या परब्रह्मचा मनापासून लळा लागावा एवढीच माझ्या तुकोबारायांचरणी प्रार्थना.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title: . Running Experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.