रूप आणि रुपया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 03:59 AM2019-12-28T03:59:54+5:302019-12-28T03:59:58+5:30
सुकर्माचे धन आणि गुणांची सुंदरता मनुष्याला या जीवनाच्या प्रवासामध्ये पदोपदी मदत करते
आपण कितीही सुंदर असलो तरी वयोमानानुसार वार्धक्य हे येतेच. निसर्गचक्र कुणासाठी थांबत नाही. कालानुरूप बदल हा निसर्गाचा स्थायीभावच आहे. त्यात निसर्गाविरुद्ध जाऊन कुणालाही त्याला विरोध करता येत नाही. प्रत्येक फक्त सुंदर व्यक्ती चांगला असतो किंवा सर्वांचा आवडता होतो, ही मान्यताच पूर्णत: चुकीची आहे. व्यक्तीच्या रूपापेक्षा त्याचे कर्तृत्व सगळ्यांच्या मानसपटलावर राहते. दीन-दु:खींना केलेली मदत, इतरांशी चांगला व्यवहार, कनवाळूपणा या सर्व गोष्टी मनाला स्पर्श करतात. आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये पैसा ही सर्वात मोठी आवश्यक बाब झाली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणताही भलाबुरा मार्ग अवलंबला जातो. आपण आज हे विसरलो आहोत की आपण काय कमवले यापेक्षा कसे कमवले हे महत्त्वाचे आहे. कारण ज्या कर्माने ते कमवले असेल ते कर्मच आपले मित्र किंवा शत्रू बनतात.
सुकर्माचे धन आणि गुणांची सुंदरता मनुष्याला या जीवनाच्या प्रवासामध्ये पदोपदी मदत करते. थोडेसे थांबून आपण स्वत:लाच विचारू या कीमाझा हा प्रवास सुखरूप पार होतोय की या मार्गामध्ये एकसारखे प्रतिकूल परिस्थितीचे स्पीड ब्रेकर येत आहेत? जर आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचे असेल तर ज्ञानाच्या स्टेअरिंगवर जम बसवायला पाहिजे. कोणत्या मार्गाने आणि कसा मोड घ्यायचा याची समज असेल तर हा कठीण वाटणारा प्रवासही अतिशय सरळ वाटू लागेल. एक घडीचा हा डाव आहे. जीवन खूप छोटे आहे. रूप आणि रुपया यांना महत्त्व द्यावे. परंतु हे मिळवण्यासाठी विचार आणि कर्म यांचेही संतुलन राखावे. विचारांची सुंदरता नक्कीच आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवेल आणि जिथे सुकर्माची पुंजी भरपूर कमवली असेल तर स्थूल धनसुद्धा आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मग, विचारांची सुंदरता आणि कर्मांच्या धनाने स्वत:ला रूपवान आणि धनवान बनवू या.