... तर 'तुम्ही संसार जिंकला'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 11:22 AM2018-10-08T11:22:43+5:302018-10-08T12:19:27+5:30
एकीकडे आई-वडिलांचं ‘मन’ही द्वंद्व अवस्थेत राहते. शेवटी मुलाजवळ जावे तरी सुनेचे बोलणे सहन होत नाही. ती त्यांना स्वीकारतच नाही.
आई-वडील लहानपणापासून मुलांना प्रेम लावतात. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचे लाड पुरवितात. मुलगा मोठा होतो. प्रेमविवाह करतो. त्याची पत्नी त्याला आई-वडिलांपासून दूर ठेवते. मुलगा आनंदात राहतो. आई-वडील कुढत बसतात. त्या दोघांनाही या मुलाच्या कर्तव्यशून्यतेचा खूप राग येतो. त्याच्या धास्तीने आई मानसिक आजारी होते. अशा परिस्थितीत तिला लकवा होतो. वडील तिची पूर्णरीत्या सेवा करतात. कारण ती धर्मपत्नी असते. रोज तिला स्वयंपाक स्वत: करून खावू घालतात. मुलाला मुलगी होते. तिला असे वाटते माझी नात मी एकदातरी बघावी. पण तसा प्रसंग सून येऊ देत नाही. त्यांना टाकून बोलते. नवरा अनेकवेळेला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ती समजून घेत नाही. आई-वडिलांची दुरवस्था पाहून मुलगा चिडतो. त्याची घरात चीड चीड वाढते. कारण तो एकुलता एकच असतो. त्या मुलाची इकडे आड, तिकडे विहीर अशी मनोवस्था होते. एकीकडे आई-वडील, तर दुसरीकडे पत्नी या द्वंद्व अवस्थेत तो अडकतो. त्याचे ‘मन’ स्थिर नसते. रात्रंदिवस त्याच्या मनाची अवस्था बदलत राहते.
एकीकडे आई-वडिलांचं ‘मन’ही द्वंद्व अवस्थेत राहते. शेवटी मुलाजवळ जावे तरी सुनेचे बोलणे सहन होत नाही. ती त्यांना स्वीकारतच नाही. दोघेही नवरा-बायको आपल्या मुलाविषयी विचारात राहतात. शारीरिक त्रास - मानसिक त्रास या अवस्थेत मनाचे खंगलेपण, मनाची निराशा कधीतरी वाईट गोष्टींकडे धाव घेते. आत्मविश्वास हरवून बसलेले असतात. लहानपणापासूनच्या आठवणी सतावतात. मनाचे मनपण हरवलेले असते. फक्त निराशानेच जगायचे. आत्मानंद नाही. हरवलेले मन - पुन्हा कधीतरी जुनीपुराणी आठवण काढून जागे होते. कधीतरी मनाला वाटते. हे जीवन दिले नसते तर बरे झाले असते. ही अशी संतती देण्यापेक्षा वांझ ठेवले असतेस तर बरे झाले असते. मनाची अवस्था कालमानानुसार बदलत जाते. मनाला समजावणे एवढे सोपे काम नाही. मनोवस्था समयानुसार बदलते. त्यामुळे मनाला अगोदरच समजावा. संसार दु:खमूळ आहे. या दु:खमूळ संसारात राहून मनाला प्रसन्न ठेवणे जमले की तुम्ही संसार जिंकला.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज