साधू,संतांचे जीवन खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:43 PM2019-08-25T13:43:38+5:302019-08-25T13:43:42+5:30
सर्वसामान्य माणूस आणि संत किंवा महापुरुष यांच्या जीवन जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. संतांचे जीवन खडतर असते ते काटेकोरपणाने नियमांचे पालन करतात म्हणूनच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंंत पोहोचतात.
अहमदनगर : सर्वसामान्य माणूस आणि संत किंवा महापुरुष यांच्या जीवन जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. संतांचे जीवन खडतर असते ते काटेकोरपणाने नियमांचे पालन करतात म्हणूनच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंंत पोहोचतात. साधूंना पूर्व जीवनाचा परिचय देण्याची अनुमती नसते. साधूंचे जीवन संयमधारी असते. स्वत: खडतर जीवन जगून सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भौतिक सुखापासून ते सतत दूर असतात. सर्वसंग परित्याग करुन संत, साधू आत्मिक सुखाचा मार्ग शोधतात. जीवनात आचारसंहिता पाळली तरच जीवन योग्य मार्गावर चालते. साधू संतांच्या आचार-विचारावर नेहमी चर्चा होते. सम्यक दृष्टीने साधू जीवन जगतात, जीवनात शिस्त पाहिजे म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ समजतो.
सर्वसामान्य माणूस जर धर्मानुसार वागला तर समाज बदलण्यास वेळ लागणार नाही. संतांच्या जीवनाचा अभ्यास करा. मगच त्यांच्या संदर्भानुसार वागायचा प्रयत्न करा. संत आणि सामान्य माणूस यांच्यात जमीन अस्मानचे अंतर आहे. नराचा नारायण व्हायचा असेल तर जीवनाला शिस्त लावलीच पाहिजे. कठोर साधनेशिवाय कोणतीही ध्येयपूर्ती, लक्ष प्राप्ती होत नाही. मनावर ताबा ठेवण्यातच प्रत्येकाचे हीत आहे. चातुर्मासात साधना केल्यामुळे मानसिक शांतता लाभते. आत्मिक व शरीर शुध्दीचा अनुभव मिळतो. साधूंवर काही बंधने असतात. भोगाने नाही तर योगाने माणूस यशस्वी जीवनाकडे वाटचाल करु शकतो. प्रत्येकाने प्रत्येक संकटाचा खंबीर मुकाबला करुन जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लाच घेण्याची प्रवृत्ती नष्ट झाली तर भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होईल. कायदा पायदळी तुडविण्याच्या वृत्तीला अटकाव घालण्याची गरज आहे.
महापुरुषांचे जीवन प्रेरणादायी असते
श्रावण महिना हा वर्षातील अतिशय चांगला महिना आहे. कधी पाऊस, कधी ऊन अशी निसर्गाची रुपे आपणास पाहता येतात. श्रावण महिना सर्वांनाच आकर्षित करतो. सूर्य अंधाराला दूर करतो. फुल देखील सुगंध देते. महापुरुषांचे जीवन देखील प्रेरणादायी असते. समाजाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मदत करते.
महापुरुष लोककल्याणाचे कार्य करतात. स्व.पू श्री अमृतकंवरजी महाराजांचे श्रीरामपूरशी जवळचे नाते आहे. त्यांनी अंतिम श्वास श्रीरामपूरात घेतला. त्यांचा स्वभाव श्रीफळ (नारळ) प्रमाणे होता. वरुन कडकपण आतून मऊ, पौष्टीक होता. त्यांच्या वास्तव्याने श्रीरामपूर पुण्यभूमी ठरली आहे.
श्रीरामपूरमध्ये पू.श्री. अमृतकंवरजी व पू.श्री. सुशिलकंवरजी यांनी धर्मजागृतीची पताका फडकविली आहे. ही पताका आजही फडकत असून समाज धर्म आराधनेत पुढे आहे. येथे जैन धर्माच्या विविध कार्यात त्यांचे योगदान होते. ग्रंथालय निर्मिती ही एक मोठी देणगी आहे. स्व.पू.श्री. अमलोकऋषिजी, आचार्य देवनंदजी महाराज यांचे कार्य सुध्दा समाजाकरीता अमूल्य आहे. संतांना तीन वेळा नमन करण्यामागे नम्रता हा गुण आहे. संतांच्या अनंत ज्ञानास चारित्र्यमय जीवनास नेहमी नमन केले जाते. लहान संतांना नमन करण्यात मोठेपणा आहे. जीवनात शिस्त असावी, श्रध्दाभाव असावा. सर्वांनाच समानतेची वागणूक महापुरुषांकडून दिली जाते. इमारत नीट उभी रहावयाची असेल तर पाया भक्कम असावा लागतो. तसेच जीवनात वरिष्ठांची साथ, सावली असेल तर कोणत्याही प्रसंगाशी धैर्याने तोंड देता येते. संतांचे विचारांचे जीवनात आचरण करा.
- पू. श्री. सन्मती महाराज