संत गजानन महाराज- ते तू तत्त्व खरोखर नि:संशय असशी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 06:27 PM2018-09-13T18:27:58+5:302018-09-13T18:28:40+5:30

संतांनी देव नुसता अनुभवला नाही, तर सर्वाभूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत। ते ते वाटे मी ऐसे।। असा संदेश दिला आहे.

Saint Gajanan Maharaj - That principle you really should be ... | संत गजानन महाराज- ते तू तत्त्व खरोखर नि:संशय असशी...

संत गजानन महाराज- ते तू तत्त्व खरोखर नि:संशय असशी...

googlenewsNext

संतांनी देव नुसता अनुभवला नाही, तर सर्वाभूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत। ते ते वाटे मी ऐसे।। असा संदेश दिला आहे. प्रत्येक प्राणिमात्रामध्ये ईश्वराचा अंश असल्याचे संत एकनाथांना जाणवले. त्यांनी प्रत्येक जीवाला परमेश्वराचे एक स्वरूप मानले आहे. जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत स्वस्वरूपाला प्रत्येक जीवांमध्ये पाहण्याची विश्वात्मक दृष्टी संतांकडे होती. संतांनी स्वत: विश्वात्मक ईश्वराची अनुभूती घेऊन त्याप्रमाणे आपल्या आचरणामध्ये त्या तत्त्वांचे अनुकरण केले आहे. ज्ञानेश्वरीचे अखेरचे पसायदान हे विश्वात्मक देवापाशी मागितलेले आहे. निवृत्तीनाथांपासून सर्व संतांनी विश्वात्मक देवाचा अनुभव वर्णिला आहे. आकाश जसे सर्वत्र आहे, तसा ईश्वर हा विश्वात्मक असून, सर्वांना विश्वात्मक एकतेचे दर्शन घडवितो. त्याच एकात्मभावाचे दर्शन विदर्भ पंढरीनाथ शेगावीचे अवलिया संत गजानन महाराज त्यांच्या अवतार कार्यातून घडवितात. संत जगाला समजावे म्हणून पंतोजीसारखे पाटी हाती घेऊन शिकवितात, असे संत तुकाराम आपल्याला सांगतात-

अर्भकाचे साटी। पंते हाती धरिली पाटी।।
तैसे संत जगी। क्रिया करुनी दाविती अगी।।
बाळकाचे चाली। माता जाणूनी पाऊल घाली।।
तुका म्हणे नाव। जनासाठी ठाव।।

माघ वद्य सप्तमीला देवीदास पातुरकरांच्या वाड्यासमोर उष्ट्या पत्रावळीवरील भातांची शिते उचलून खाणारी उवलिया मूर्ती म्हणजे सद्गुरू गजानन महाराज होय. त्यांच्या प्रगटण्याचे निमित्त जरी पातुरकरांच्या घरचा हा ऋतुशांती कार्यक्रम असला, तरी लोककल्याणाचे कार्य करण्यासाठीच त्यांचे अवतार कार्य असल्याचे महाराजांच्या लिळांवरून दिसून येते. मनुष्याने धर्माने वागावे, यासाठी ते संकेत देतात. दासगणू महाराजांनी त्यांचे वर्णन गजानन विजय ग्रंथातून केले आहे.
गजानन जे स्वरूप काही। ते विठ्ठलावाचून वेगळे नाही।।
ँ्नँ संत गजाननांनी भाविकांना दिलेला संदेश हा सत्कर्म करण्याचा आहे. त्यांनी प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये भक्तीची गंगा निर्माण केली आहे. संतांजवळ परमेश्वराचा पत्ता आहे. त्यांना शरण गेल्यानंतर ते परमेश्वराची भेट घडवून देतात. मग ते सद्गुरू स्वरूपात भेटतात, तर कधी गुरुमाउली म्हणून ओळख पटवितात.
जणूकाही हा संदेश देतात की मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका।। हा त्यांचा संदेश भक्तांना त्यांनी देऊन जगण्याची शक्ती प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण केली आहे. तोच विश्वास घेऊन आज प्रत्येक भक्त शेगावी गजाननांच्या दर्शनासाठी येतात. संत भक्तांच्या मनीचा हेतू ओळखतात. भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे असते. भक्तांना अलौकिक भक्तीची अनुभूती ते सतत देत असतात. सद्गुरू गजानन महाराज प्रत्येकाला जणू आपले मनातील ईश्वर वाटतात. संत जन्मोजन्मी भक्तीचे कार्य करीत आले आहेत. भक्तांचे भवदु:ख हरण्याचे सामर्थ्य त्यांच्याठायी असते. फक्त प्रत्येकाची भक्ती, विश्वास व श्रद्धा यावर ते अवलंबून आहे.

मागा बहूता जन्मी। हेचि करित आलो आम्ही।
भवतापश्रमी। दु:खे पीडिली निववू त्यां।
गर्जू हरिचे पवाडे। मिळवू वैष्णव बागडे।
पाझर रोकडे। काढू पाषाणामध्ये।।

सदगुरूचे चिंतन केल्याने त्रिविध ताप हरण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. नाहीतर आज सर्वत्र स्वार्थाचे वातावरण आहे. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष। परी सहाय्य संकटास कोणीही करीना।। तेव्हा सद्गुरू गजाननच आपल्या मदतीला धावल्याचे अनेकांच्या अनुभवावरून आपल्याला जाणवते. आज गजानन महाराज संस्थानमध्ये कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये ४२ सेवा प्रकल्पाद्वारे गजाननाची सेवा करीत आहेत. भक्त हाच माझा भगवंत, असे त्यांचे ब्रीद आहे.
चिंतनाची जोडी। हाचि लाभ घडोघडी
तुम्ही वसोनी अंतरी। मज जागवा निर्धारी

गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव म्हणजेच ऋषीपंचमी सर्व गजानन भक्तांना जय गजानन सांगणारे अवलिया मूर्ती या पंचतत्त्वात समाधीरूपाने आजही भेटताना भक्तांना दिसतात. मनश्चक्षूच्या अनुभूतीद्वारे त्यांचे अस्तित्व मनामनात जाणवते. ते योगीराज परब्रम्ह सद्गुरू सात्त्विक विचारांच्या लोकांना नेहमीच योग्य मार्ग दाखवितात. सत्य संकल्पाचे दाता असणारे हे तत्त्व सर्वांना सद्बुद्धी प्रदान करो.
डॉ. हरिदास आखरे,
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर येथे प्राध्यापक आहेत. )

Web Title: Saint Gajanan Maharaj - That principle you really should be ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.