जग ब्रह्म रूप जाण! हेची साधुचे लक्षण!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 03:42 PM2019-11-16T15:42:05+5:302019-11-16T15:46:43+5:30
ब्रह्मज्ञान मिळवून जो स्वतःचा उद्धार करतो पण इतर जीवाचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून ते भंडपण आहे.
- हभप भरतबुवा रामदासी. बीड.
मध्यम भक्ताची भक्ती ही उदात्त असते. त्याच्या अंतःकरणात भगवंताबद्दल अत्यंतिक प्रेम असते. भगवंताची भक्ती करणाऱ्या साधकाबद्दल मैत्रीपूर्ण भाव असतो. हे सगळे खरे असले तरी, मध्यम भक्ताची भक्ती ही फक्त आत्मोद्धाराच्या साधनेनेच चाललेली असते. समाजकल्याणाची किंवा समाज उद्धाराची तळमळ मध्यम भक्ताला मुळीच नसते. संत एकनाथ महाराज मध्यम भक्ताचे वर्णन करतांना म्हणतात;
पावोनिया ब्रह्मज्ञान! स्वयें उद्धरी आपण! न करी जो दीनोध्दारण! हे भंडपण झाल्याचे!!
ब्रह्मज्ञान मिळवून जो स्वतःचा उद्धार करतो पण इतर जीवाचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून ते भंडपण आहे. वैयक्तिक मोक्षाच्या मागे लागलेले योगी व समाजकल्याणाची तळमळ असणारे संत यांच्यात हाच मोठा फरक आहे.
जग ब्रह्म रूप जाण! हेची साधुचे लक्षण!!
जगाला ब्रह्म रूप समजून जगातील प्राणिमात्रांकडे ब्रह्म भावाने बघणें हाच खरा भागवत धर्म आहे. ईश्वर सर्वत्र आहे या अद्वैत भुमीकेतून भक्तीची साधना केली तरच विश्वोद्धार व आत्मोद्धार होईल. सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वरभाव ठेवून जो भक्ती करतो तोच उत्तम भक्त होय. उत्तम भक्तांचे लक्षण सांगतांना व्यास महाराज म्हणतात;
न काम कर्म बीजानां यस्य चेतसि संभवः !
वासुदेवैक निलयाःस वै भागवतोत्तमः!!
उत्तम भक्ताच्या चित्ताला राग, द्वेष, इर्षा, मोह, हर्ष, विषाद इ.विकार कधीच शिवत नाहीत.कारण त्याचे चित्त फक्त परमेश्वराचे ठिकाणीच स्थिर असते. त्यामुळे कुठलेही काम विकार उत्तम भक्ताला निर्माण होत नाहीत. काम नाही म्हणून त्या पासून निर्माण होणारे कर्म नाही. कारण कर्माला कारण असणारे अज्ञानाचे बीजच नष्ट झालेले असते. उत्तम भक्त हा कर्म करून देखील अकर्मीच राहतो. भक्ती साधनेतून सर्व भूतमात्रात एक परमेश्वर भरलेला असल्याची त्याला प्रचिती आलेली असते. तुकाराम महाराज आपला स्वानुभव वर्णन करतात;
विठ्ठल जळी स्थळी भरला! रिता ठाव नाही उरला! तो म्या दृष्टीने पाहिला! विठ्ठलाची विठ्ठलची !!
देव सर्वत्र आहे. सर्वांभूती आहे. त्या परमेश्वराला देश, काल, आणि वस्तु मर्यादा नाही. असा अमर्याद असणारा तो परमात्मा सर्वत्र व्यापून दशांगुले उरला आहे. उत्तम भक्ताला. .सर्वं विष्णुमयं जगत्. ...! हे ज्ञान झालेले असल्यामुळे त्याचे भेदाभेद संपलेले असतात. भगवान अर्जुनाला सांगतात;
समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्!
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् !!
समत्व प्राप्त झालेल्या भक्तालाच उत्तम भक्त असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात;
जो सर्व भूतांचे ठायी ! द्वेषातें नेणेंचि कांही! आपपरू नाही! चैतन्य जैसा!!
( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क 8329878467 )