संत सोयराबाई

By Admin | Published: October 12, 2016 12:47 PM2016-10-12T12:47:25+5:302016-10-12T12:47:25+5:30

सहजता हा मानवी मनाचा सहजधर्म आहे. अंतरंगातून उमलणारा तो एक हुंकार आहे. नि प्रकट मनाचा मूक आविष्कारही आहे. याचा प्रत्यय कितीतरी काव्यातून येतो.

Saint soyarabai | संत सोयराबाई

संत सोयराबाई

googlenewsNext

- कुमुद गोसावी
सहजता हा मानवी मनाचा सहजधर्म आहे. अंतरंगातून उमलणारा तो एक हुंकार आहे. नि प्रकट मनाचा मूक आविष्कारही आहे. याचा प्रत्यय कितीतरी काव्यातून येतो. विशेषत: स्त्रीसुलभ काव्यातून अगदी तेराव्या शतकातील राजाई, गोणाई, निर्मला, सोयराबाई आदींच्या काव्यातूनही होणारा भावभावनांचा सहजाविष्कारही याची साक्ष देऊन जातो.
संत नामदेवांची आई गोणाई आपला ‘नाम्या’ पोटापाण्यासाठी आवश्यक असलेली शिंपीकामाची कला शिकून कपडे शिवण्याऐवजी सदैव देव-देव करीत बसतो. त्याने संसाराला हातभार लावण्यासाठी सुई-दोरा हाती घ्यायलाच हवा. या पे्रमभऱ्या भावनेचा त्यातील स्वाभाविक चिंतेचा सूरही व्यक्त होतो.
गोणाई म्हणे नाम्या वचन माझे ऐक । पोटीचे बालक म्हणोनी सांगे । शिवण्या- टिपण्या घातलेसे पाणी । न पाहसी परतोनी घराकडे ।
कैसी तुझी भक्ती या लौकिकावेगळी । संसाराची होळी केली नाम्या ।।
अशी आईच्या अंतरीची उमळून येणारी कळ पाहता पाहता काव्यरूप घेते. आपल्या काळजाच्या तुकड्याची- नाम्याची अशी अवस्था करणारा तो पंढरीचा विठोबा कटीवर हात ठेवून विटेवर उभा करणाऱ्या भक्त पुंडलिकालाही गोणाई फटकारते,
कासया पितृभक्ती पुंडलिके केली ।
विवसी आणिली पंढरीसी।।
विठ्ठलालाही आळवणी करतानाही काहीसे फटकारतच गोणाई म्हणते,
तू कृपेच्या कोवळा म्हणती विश्वजन।
त्या तुझे निर्वाण कळले नाही ।
‘माझा नामा, माझं लेकरू मला परत कर’ म्हणून व्याकूळ होऊन अश्रू गाळते.
संत नामदेवरायांची पत्नी राजाई तर आपल्या पतीलाच प्रश्न करते.
लावोनी लंगोटी झाले ती गोसावी ।
आमुची ठेवाठेवी कोण करी ।।
आपली वेदना राजाई मध्यरात्री ‘रखुमाई’कडे कळवळ्याने कथन करते.
‘अहो रखुमाबाई विठोबासी सांगा ।
भ्रतारासी का गा वेडे केले ।।
असा उद्वेग व्यक्त करीत आपल्या संसाराचे वाटोळे झाले ! म्हणणारी ही राजाई आपल्या पतीचा नामदेवाचा भक्तीतील अधिकार जाणते तेव्हा परिवर्तनाची माया तेव्हा परिवर्तनाची भाषा बोलते.
‘आता ये संसारी मीच धन्य जगी।’ जे तुम्हा अर्धांगी विनटले।
असं आपण आता संसारात समाधानी असल्याचे उद्गारही त्या मनमिळाऊ गोणाई वा राजाई यादेखील संताशिवाय नि खूप काही सांगणारे त्यांचे सहजसुंदर भाष्य.
संत सोयराबार्इंची कविता : संत सोयराबाई संत चोखामेळा यांची पत्नी गोजाई, राजाईकडे पंढरीच्या वारीत आवर्जुन भेटत. चोखोबांना जशी नामदेवांच्या भेटीची, त्यांच्या रसाळ कीर्तन श्रवणाची ओढ असे तशी सोयराला नामदेवांच्या घरी जाऊन जनाई, गोराई नि राजाई यांना भेटून त्यांच्याशी गुजगोष्टी करायला अतिशय आवडायचे. त्यांच्यासारखे कवितेतून हृदगत् व्यक्त करायलाही आवडायचे.
सदा सर्वकाळ नामाचा छंद । रामकृष्ण गोविंद जपे सदा ।।
अखंड वाचेशी नाही पै खंडण । नाम नारायण सुलभ हे ।।
सुख दु:ख काही न पडे आवाज । होय मन शांत जपता नाम ।।
सोयरा म्हणे मज आलीसे प्रचीत । नामेचि पतीत उद्धरती ।।
संत ज्ञानदेवांच्या मांदियाळीतील सर्वच संतांनी ‘आवडीने भावे हरिनाम घेसी’ असे आपापल्या काव्यातून सांगितले आहे. अर्थात ‘आधी केले मग सांगितले!’ या उक्तीनुसार कृती, उक्तीतून समन्वय साधत सांगितले. मग सोयराही तर आधी नामाचा छंद लावून घेते. आत्मसुखाचा आनंद त्यातून रोमरोमी भेंदून घेते. त्यात जीवन संसारातील पावलोपावली वाट्याला येणाऱ्या यातना, अवहेलना सारं सारं विसरते अन् अंती शांतिसरिता होऊन नामजपात रमते ! सोयराबार्इंनी काढलेले हे आत्मप्रचीतीचे बोल दिशादर्शक नव्हेत काय?
खरं तर मेलेली जनावरं ओढून नेण्याचं अत्यंत अवघड काम केवळ जन्मानं वाट्याला आलेल्या संत चोखोबांची जी वाट्याला आलेली दु:ख होती ती ढीगभर सोबत असताना त्यांची पत्नी म्हणून त्याच्या जखमा अंतरी काय कमी गळभळत असणार? त्यात पतीला लागलेला विठ्ठल भक्तीचा, विठुनामाचा लळा जोपासताना पडणारा प्रपंचाचा भार सोसत सोयरानं पतीला त्यापासून न तोडता उलट त्या मार्गाशी त्यातील नामाशी स्वत:ला जोडून घेतलं ! तसं तर
‘जोड तो तो धर्म ! नि तोडतो तो अधर्म !’ असं म्हणतात मग सोयरानं स्वकृतीद्वारा स्वधर्म तर सांगितला- सर्वार्थानं अध्यात्म अंगीकारून समाजाला आपल्या सहज सुंदर अभंग - काव्यातून वस्तुपाठ दिला ! आत्मानुभव कथन केला.
सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही ।
आणिक तो आम्ही दृढ धरा ।।
विठ्ठलाला सोयरानं आपल्या अनन्य भक्तिभावानं असं आपलंसं करून घेतलं की, तिला आता प्रपंचातील ‘नित्य दिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती असताना प्रत्येक कसोटीच्या क्षणी आपल्या सोबत आपला जीवीचा जिवलग प्राणसखा विठुराया आहे! हा अंतरीचा दुर्दम्य विश्वासच तिला उदंड बळ देत असे! त्यामुळे तिच्यातील भयगंड मावळला. निर्भय होऊन तिला प्रपंच नि परमार्थ साधता आला.
अंतरीची व्यथा : सोयराबाई भक्तिरंगात रंगून गेली असली तरी तिला प्रत्यक्ष प्रपंचात प्राणांतिक प्रसंगांना सामोरं जाण्याच्या दिव्यातून नेहमीच जावं लागे. त्यात स्पृश्य- अस्पृश्य भेद! त्यातील सोवळं-ओवळं ! या रूढी-परंपरांचं जोखड! त्यामुळे जागोजागी होणारी जिवाची फरपट! याचं शल्य सोयराच्या काल्यातूनही जेव्हा व्यक्त झालेलं दिसतं तेव्हा तिच्या भक्तीतील डोळसपणही ध्यानी येतो.
‘अंतरीची एकता म्हणजेच खरी समता!’ मनीची सदयता हीच खरी बंधुता! असं मानणारी नि ती आचरणात आणणारी सोयरा, अंतरीची शुद्धता, निर्मळता नि सात्त्विकता यांची साक्षात धारणकर्ती असूनही समाजानं मला आपल्याला दूर ठेवावं! आपल्या सावलीचाही विटाळ मानावा! यासंबंधी ती विठ्ठलाशी संवाद साधते.
देहासी विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध ।
देहीचा विटाळ देहीच जन्मला । सोवळा तो झाला कवण धर्म ।।
असा प्रश्न सोयराच्या मनात उपस्थित व्हावा! नि त्याचं उत्तरही तिच्या प्रपंचातच अनुस्युत असावं असा अधिकार सोयराच्या या अभंग भक्तिभावात आहे. सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना या केवळ संकुचितपणाच्या द्योतक आहेत! वास्तविक ‘देहाचा विटाळ’ ‘आत्म्याला’ असतोच कुठं? आत्मा तर सर्वंकष निर्लेप आहे. कोणत्याही अक्षरांच्या शाळेत न जाताही सोयरासारख्या स्त्रिया केवळ भक्तीच्या अनुभूतीच्या आधारे आत्म्याची ओळख करून घेतात. नि ती करून घेण्यानं त्यांना जो आत्मसुखाचा चिरंतन लाभ झाला तसा सर्वसामान्यांनाही व्हावा.
या सामाजिक जाणिवेनं त्या लोककल्याणास्तव आपल्या कवितेतून असं आपलं अनुभवविश्व साकारतात ! त्यांच्या या काव्याचा आस्वादही असा अनेकांगांनी घेतल्यास त्यांनी कालातील असा जो हृदयसंवाद आपल्या काव्यातून अखंड साधला आहे त्याची खऱ्या अर्थानं ओळख होईल ! अर्थात आस्वादकांना !
अवघे सुखाचे सांगाती ।
दु:ख होता पळती आपोआप ।।
सोयराबाई हे वैश्विक सत्य अगदी सहज सांगून (जातात) एक सामाजिक शैल्यही त्यात गोवलं गेलं आहे. ज्याला वैयक्तिक अनुभवाचा स्पर्शही आहे. नाममहिमा जसा रसाळपणे गाऊन सांगावा तसाच जीवनसूत्रांचाही सहज परिचय करून द्यावा ! अशी सोयराची ही सांगण्याची रीतही सहज भावून जावी ! अशीच आहे.
बैसुनी एकांती बोलू गुजगोष्टी । केधवा भेटसी बाई मज ।।
ही नीत नव्हे बरी । म्हणे चोखियाची महारी।।
असं साक्षात विठ्ठलाशी किती बोलू न किती नको ! असं मोकळेपणानं म्हणणारी त्याच्याशी गुजगोष्टी करू इच्छिणारी सोयराबाई अंतर्बाह्य किती निर्मळ आहे हे ध्यानी येतं.
आत्मनिर्भर भावविश्व : संत साहित्यातील असं आत्मनिर्भरतेनं आत्मरंगी रंगून साकारलेलं स्त्रीरचित काव्य तसं बेतानंच उपलब्ध आहे. सोयराबार्इंचेही अवघे ‘साठ’च अभंग गाथेत गवसतात. मात्र, त्यातून व्यक्त होणारं या कवयित्रीच्या अंतर्यामी कोंदलेल्या भावभावनांचे कितीतरी विविधरंगी पदर उलगडत जातात. तिच्या प्रापंचिक नि पारमार्थिक जीवनाची झालेली फरपट नि त्यावर मात करीत प्राप्त केलेलं आत्मिक समाधान, चिरंतन सुखाचा ठेवा ही त्यातून दृग्गोचर होतो.
किती शिणताती प्रपंच परमार्थी । परी न घडे सर्वथा हित कोणा
न घडे प्रपंच न घडे परमारर्थ । न घडे स्वार्थ दोहियेसेविषयी ।।
सोयरा चोखियाची म्हणे पंढरीराया । दंडवत पाया तुमचिया ।।
प्रत्येकाच्या संसाराच्या व्यथा नि कथा आयुष्यभर अशा काही चालत राहतात की ‘अरे संसार संसार । जसा तवा चुल्यावर । आधी हाताला चटके । तेव्हा मिळते भाकर ।।’
असं आधुनिक काळातही ‘बहिणाबाई चौधरी’सारख्या कवयित्रीला म्हणावंसं वाटलं. त्या चटक्यांचा संसारानुभव घेत-घेत आधी शिणल्या-भागल्या सोयराच्या कवितेतून लौकिक नि पारलौकिक प्रपंच व परमार्थ या दोन्ही पातळ्यांवरून तिनं समर्थपणानं वाटचाल करून अंतिम आत्महित कसं साधता येतं? हेही मोठ्या विश्वासानं कथन केलं आहे. त्याचबरोबर ज्याला धड ‘प्रपंच वा परमार्थ कळत नाही !’ त्याला स्वत:चं हित नेमकं कशात आहे? हेही कळत नाही ! मग अशी अज्ञानी माणसं बुवा-बाजीच्या-मृगजळाच्या मागे धावतात ! हेही त्यातून जाणिवेनं सूचित केलं आहे. शोधलं तर सापडतं ! एवढंच इथं ध्यानी येतं.
सोंगाचे ते सोंग । दावी रंग कथेचा ।।
परधनी सदा मन । वरी दावीतसे डोलून ।।
ऐसा नर तो दुराचारी । म्हणे ‘चोखयाची महारी!।।’
स्वत:ला ‘चोखयाची महारी’ अशा नाममुद्रेनं मोठ्या अभिमानानं मिरवणारी सोयराबाई. समाजातील दांभिकता संपूर्ण जाणून होती ! तसं संत चोखोबांचा लोक गोतावळा मोठा असल्यानं नानापरीची माणसं घरी-दारी भेटत. नि त्यांच्या वर्तनाची नोंद आपसूकच सोयराच्या मनात होत राही. त्याचं प्रतिबिंब तिच्या काव्यात पडलेलं दिसतं. आपल्याला विठ्ठल कृपेनं नवसासायासानं झालेल्या पुत्रावर - कर्ममेळ्यावर सोयरानं बाळपणापासून केलेल्या नितळ भक्तिसंस्कारानं तोही विठ्ठल भक्त झाला. अभंग रचनाही करू लागला. नि निर्मळा नणंद - तिच्या रूपानं कर्ममेळ्याच्या जन्मवेळी साक्षात पांडुरंगानं येऊन सोयरानं बाळंतपण केलं! विठोबा- रखुमाईनंच त्याचं बारसंही केल्याचं तिनं नोंदवून ठेवलं आहे. ‘उपजता कर्ममेळा ! वाचे विठ्ठल सावळा । करी साहित्य सामग्री । म्हणे चोख्याची महारी ।।’ असं ‘आत्मकथन’ आत्मनिवेदनातून केलं आहे.
अमृताचं शुद्धीकरण : संत चोखोबांची विठ्ठलभक्ती अशी अगाध की, पंढरीच्या वाटेवरून येताना-जाताना चोखोबाच्या घरी संत मेळा जमत असे. त्यांच्या अशाच एका भेटीत चोखोबांच्या अंगणात भोजनासाठी संत, महंत नि देवांनाही यावसं वाटलं. त्यांची पंगत बसली असताना चक्क स्वर्गातून इंद्रानं अमृतकलश तिथं आणला नि त्यातील अमृताचं शुद्धीकरण इंद्रदेवानं संत चोखामेळा नि संत सोयराबाई यांच्या हातून करून घेतलं ! असा अतिशय अभुतपूर्व प्रसंग संत एकनाथविरचित ‘संत चोखामेळाचरित्रात चितारला आहे ! त्यावरून संत सोयराबाईचं संतत्व स्वयंभू होतं। हे ध्यानी येतं.
चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती । स्त्री ते वाढिती चोखियाची ।।
अमृताचे ताट इंद्रे पुढे केले । शुद्ध पाहिजे केले नारायणा ।।
चोखियाची स्त्री चोखा दोघे जण । शुद्ध अमृत तेणे केले देखा ।।
चोखियाच्या घरी शुद्ध होय अमृत । एका जनार्दनी मात काय सांगू ।।
संत सोयराबार्इंच्या जीवनातील अमृत शुद्धीकरणाचा हा प्रसंगच इतका बोलका आहे की, एका अक्षराचेही भाष्य त्यावर करण्याची आवश्यकताच नाही ! होय ना? चोखोबा नि सोयराबार्इंनी आपल्या अपार भावभक्तिबळावर मिळवलेलं असं उत्युच्च आध्यात्मिक वैभव ‘जन्मावर अवलंबून नसतं, तर कर्मावर आधारित असतं !’ हे समजावून सांगण्याचे याहून अधिक प्रभावी साधन ते कोणतं?
समाजातील जातिभेदाच्या विषमतेचं दु:ख वेशीवर टांगून केवळ कोरड्या निषेधाचे नारे न लावता समतेचा प्रेममंत्र जनताजनार्दनाच्या हृदयांपर्यंत असा आपल्या नित्य कीर्तनातून गायिल्या जाणाऱ्या संतचरित्रांतील लक्षवेधी प्रसंगचित्रण करणाऱ्या युगप्रवर्तक संत एकनाथांचा हा वसा आजही अनुसरणीयच आहे ! नाही का? देव वा धर्म भेदातीतच. जाती-पाती, स्त्री-शुद्ध असा कोणताच भेद तिथं नाही.
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।
मी-तूपण गेले वाया । पाहता पंढरीच्या रामा ।।
नाही भेदाचे ते काम । पळोनी गेले क्रोध काम।।
देही असुनी तू विदेही । सदा समाधिस्त पाही ।।
पाहते पाहणे गेले दुरी । म्हणतसे महारी चोखियाची ।।
असा अध्यात्म अनुभूतीचा आनंद अक्षर ब्रह्मात अखंड स्रवत ठेवण्याचं सामर्थ्य सोयराबाईच्या एका दलित स्त्रीच्या अभंगवाणीतून आस्वादता यावं हेच तिचं वैभव ! तिच्या काव्यातील ऋजुता, नादमधुरता नि अर्थपूर्णता जशी लक्ष वेधी तशी त्यातील अतीव हळुवारता, साधी-सुधी सहजसुलभ भाषासुकरताही रसिक मनाला भावते ! अशा मनोज्ञ, भावगर्भ, साक्षात्कारी नि तरल संवेदनाक्षण भावविश्वाला विसरून कसं चालेल ? याची साक्षे पटते !

Web Title: Saint soyarabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.