मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करणारा...संतांचा विवेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:53 PM2018-11-19T16:53:20+5:302018-11-19T16:56:58+5:30

संतांनी शिकविलेल्या अध्यात्माचा मुख्य परिणाम हा असतो की त्यामुळे मनुष्याचा 'विवेक' जागा होतो.

Saints' discipline, which motivates the mind and brings good thoughts in mind | मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करणारा...संतांचा विवेक

मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करणारा...संतांचा विवेक

googlenewsNext

संतांनी शिकविलेल्या अध्यात्माचा मुख्य परिणाम हा असतो की त्यामुळे मनुष्याचा 'विवेक' जागा होतो़ अविवेक नाहीसा होतो़ दुर्बुद्धी जाते आणि सद्बुद्धी जागी होते़ वस्तुत: हा 'विवेक' म्हणजे सद्विचाराचा व सदाचरणाचा परिणामच असतो़ हा विवेकच परमार्थाचे महत्त्वाचे साधन असतो़ 'विवेक' दृढ झाल्यावाचून खरा परमार्थ जीवनात येऊ शकत नाही़ संतांच्या उपदेशवाणीचे सतत मनन-चिंतन केले असता हा विवेक क्रमाक्रमाने विकसित होत जातो.

विषयासक्तीमुळे विवेक दुर्बल होत असतो़ परंतु संतांच्या उपदेशातून विषयांची म्हणजेच इंद्रियजन्य भोगांची आसक्ती कमी होत असते़ आपल्या देहाचे विषयांशी आणि आपले स्वत:चे देहाशी अज्ञानाने तादात्म्य झालेले असते़ यासाठी, आपण देहाहून वेगळे आहोत, हा विवेक संत आपणास शिकवित असतात.

देह नव्हे मी हे सरे... उरला उरे विठ्ठल...

आपण देहातील आहोत हे ओळखणे हाच खरा विवेक होय. आज आपण समाजातील नैतिक विकासासाठी सद्सद्विवेक महत्त्वाचा मानतो़ माणसाची नीतिमत्ता विवेकाच्या अभावाने घसरत असते़ परंतु ही सद्सद्विवेकबुद्धी म्हणजेच सत्य आणि असत्याच्या स्वरुपाचा निर्णय करणारी बुद्धी प्रत्येकाची वेगळी असून उपयोगाची ठरत नाही़ कारण सत्य आणि असत्य या संकल्पना वस्तुनिष्ठ आहेत, व्यक्तीनिष्ठ नाहीत़ एका माणसाच्या बुद्धीला जे योग्य वाटते ते दुसऱ्या माणसाच्या बुद्धीला अयोग्य वाटू शकते़ परंतु सत्य, असत्य, नैतिक, अनैतिक अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या लहरीवर अवलंबून नसतात तर त्यामागे व्यापक-सखोल असा तत्वविचार असतो़ त्यामुळे संतांनी वेदशास्त्र, पुराणे, उपनिषदे यांच्या आधारावर आपला 'विवेक' सांगितला.

मन हे अत्यंत चंचल असते़ ते चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे आकर्षित होते़ अशा मनाला चांगले कोणते वाईट कोणते, योग्य कोणते, अयोग्य कोणते याची जाणीव करून देणे व चांगल्याकडेच त्याची प्रवृत्ती घडवणे हे संतांच्या विचारांमधून सहजपणे साध्य होते़ 'मी देह नसून मी देव आहे' याचा अर्थ प्रत्येक माणसात देव आहे़ हा प्रत्येकांच्या ठिकाणी असलेला परमेश्वराचा अंश माणसाला असत्य, अन्याय, अत्याचार, काम-क्रोध अशा दुर्गुणांपासून दूर करतो़ हाच अंश संतांनी इतका विकसित केलेला असतो की त्यांचे मन हेच सत्य व असत्याविषयी प्रमाणभूत असते़ त्यामुळेच -

सत्य असत्यासी मन केले ग्वाही...

असे श्री तुकोबाराय म्हणतात़ परंतु त्यांचे मन म्हणजे केवळ त्यांची लहर नसते़ तर त्यांचे मन अध्यात्माच्या  ज्ञानाने संस्कारित झालेले विशुद्ध अंत:करण असते़ कारण त्यांनी जाणीवपूर्वक मनाला सांगितलेले असते की 'मना एक करी... म्हणे मी जाईन पंढरी...' श्री तुकोबारायांप्रमाणेच श्रीरामदास स्वामी मनाच्या श्लोकांमधून मनाला बोध करतात -

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे...
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे...

कारण मन हेच माणसाला सत्कृत्य किंवा दुष्कृत्य करण्याला प्रवृत्त करीत असते़ मनाला सत्कार्यात व सद्विचारात प्रवृत्त करण्याचे कार्य संतांचा विवेक करीत असतो़ म्हणूनच श्री ज्ञानदेव 'संत तेथे विवेका' असे म्हणतात़

- प्रा. डॉ. शरदचंद्र देगलूरकर, श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूऱ 
 

Web Title: Saints' discipline, which motivates the mind and brings good thoughts in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.