संत ईश्वराची भेट घडवत असतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 05:11 PM2019-07-27T17:11:15+5:302019-07-27T17:11:46+5:30
विनय - गौतम वाणी
सोलापूर : संतांची वाणी, त्यांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत आपणास ईश्वराची भेट घडवितात, असे प्रतिपादन प. पू. श्री. गौतम मुनीजी म. सा. यांनी आज येथे केले.
प. पू. विनय मुनीजी म. सा. यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरू आनंद-कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गुरू परमात्म्याचा दिव्य संदेश घेऊन आलेले असतात. त्यांचे विचार ग्रहण करून जीवन सफल बनविले पाहिजे. गुरूंच्या वाणीत, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द, त्यांच्या वचनात खूप मोठी शक्ती असते.
गुरुवाणी श्रवणामुळे व्यक्तीची दशा व दिशा बदलण्यास मदत होते. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी आळस करू नका. ज्ञान प्राप्त करा. ज्ञान कोणाच्या मालकीचे नसते. सत्कार्य करा व ज्ञान प्राप्त करा. कारण वारसा हक्काने जमीन, पैसा, सोने-नाणे सारे मिळते. अनुवंशिकतेने बºयाच जणांना ज्ञानही प्राप्त होते. जन्मत: काही जण खूप हुशार असतात. कुशाग्र बुद्धीचे असतात; पण बºयाच जणांना प्रयत्नानेच ज्ञान प्राप्त करावे लागते.
प. पू. सागर मुनीजी म्हणाले, त्यागी, तपस्वी, संयमी हे गुण संतांच्या अंगी असतात. त्यांच्या वाणीत शक्ती असते. संयम म्हणजे जीवन तर असंयम म्हणजे मरण होय. आपल्या कृतीत सदाचार, सेवा, संयम, ध्यानधारणा, तपस्या, धार्मिकता हवी. ‘कर भला तो हो भला’ या उक्तीप्रमाणे आपल्या हातून सदैव सत्कार्य घडू द्या.
भयाचे चार प्रकार असून, माणसाला सदैव मृत्यूचे भय सतावते. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ म्हणजे साधूंच्या आगमनाने आपल्या आत्मरूपी घरात धर्माचा समावेश होतो. त्यांच्या वाणीतून मिळालेल्या ज्ञानामुळे जीवन प्रकाशमय बनते. ज्ञानरूपी प्रकाश लावून आपण दिवाळी-दसरा साजरा करूया.