समुद्र मंथन : आनंदाची कामधेनू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:41 PM2019-04-26T16:41:37+5:302019-04-26T16:42:24+5:30

देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जे समुद्र मंथन केलं त्या वेळी सागरातून अनेक रत्नं बाहेर पडली. आता हलाहल विष आणि मदिरा या वस्तूही सागर मंथनाच्या कृतीतून निर्माण झाल्या.

Samudra Manthan : Kamadhenu of happy | समुद्र मंथन : आनंदाची कामधेनू

समुद्र मंथन : आनंदाची कामधेनू

googlenewsNext

- रमेश सप्रे

देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जे समुद्र मंथन केलं त्या वेळी सागरातून अनेक रत्नं बाहेर पडली. आता हलाहल विष आणि मदिरा या वस्तूही सागर मंथनाच्या कृतीतून निर्माण झाल्या. त्यांना  रत्नं म्हणणं योग्य होईल का? या प्रश्नावर विचार करायला हरकत नाही; पण इतर वस्तू ज्यात पारिजातक वृक्ष, कौस्तुभ मणी, उच्चै:श्रवा घोडा, ऐरावत हत्ती अशा गोष्टींना रत्नं म्हणायला हरकत नाही. रत्न म्हणजे केवळ मौल्यवान मणी नाही. तर अकबर-शिवाजी महाराज अशा राजांच्या दरबारातही अनेक  रत्नं म्हणजे बुद्धिमान, कलावान, प्रतिभावंत अशा व्यक्ती होत्या. इतकंच काय पण आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘भारतरत्न’ही विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणा-यांना दिला जातो ना? तर कामधेनू ही असं समुद्र मंथनातून वर आलेलं रत्न होती.

देवांनी ती आपल्यासाठी घेतली; पण ती स्वर्गात रमली नाही. कारण ज्यांच्या कधीही न संपणा-या, कधीही तृप्त न होणा-या कामना, वासना किंवा इच्छा आहेत त्यांच्याकडे कामधेनू शांतस्वस्थ कशी राहू शकेल? नंदिनी, सुरभी यांना कामधेनूची संतती समजले जाते. त्यांनी सरळ ऋषींच्या आश्रमांची वाट धरली नि तिथं पोहोचून या आनंदात राहू लागल्या. कारण? उघड होतं ज्यांच्या स्वत:च्या सर्व कामना तृप्त, पूर्ण शांत झाल्या आहेत अशा आप्तकाम-पूर्णकाम-शांतकाम ऋषींकडे राहण्यातच खरा अर्थ आहे. याचा अर्थ ऋषी कधी काही कामधेनूकडून मागतच नाहीत असं नाही. फक्त स्वत:साठी, स्वार्थासाठी ते कधीही कामधेनूकडे याचना करत नाहीत. 

वसिष्ठ असे मुनी होते जे सदैव शांत-तृप्त-प्रसन्न असत. नंदिनी आपणहून वसिष्ठांच्या आश्रमात आली. येणा-या-जाणा-या सर्व अतिथींसाठी लागणारं अन्न, इतर सेवासाहित्य पुरवत राहिली. एक दिवस राजा विश्वामित्र आपल्या तहानलेल्या-भुकेल्या सैनिकांना घेऊन वसिष्ठांच्या आश्रमात आला. त्यांना अगदी थोडय़ा वेळात यथेच्छ भोजन दिलं गेलं. राजाला आश्चर्य वाटून त्यानं विचारलं, ‘मुनिवर, एवढी अन्नसामग्री आश्रमात होती? अन् इतक्या कमी वेळात भोजन व्यवस्था कशी केलीत?’ यावर शांतपणे वसिष्ठ म्हणाले, ‘राजन, ही सारी किमया या नंदिनी कामधेनूची.

ही तिला जे मागाल ते क्षणात पुरवते.’ यावर विश्वामित्र राजा म्हणाला, ‘तर मग ही गाय तुमच्या आश्रमापेक्षा आमच्या राजवाडय़ात असणं अधिक योग्य नाही का? तिथं ती अनेकांच्या कामना तृप्त करील’ वसिष्ठ उद्गारले, ‘तिची इच्छा असेल तर ती तुमच्यामागून येईल. मी तिला तसं सांगतो; पण तिचीच इच्छा नसेल तर बळाचा उपयोग करून तिला ओढत नेऊ नका. परिणाम चांगला होणार नाही. यात विश्वामित्रला एक आव्हान वाटलं नि तो तिला बळजबरीनं नेऊ लागला. नंदिनीनं स्वत:च्या शरीरातून सशस्त्र सैनिक निर्माण करून विश्वामित्रच्या सेनेचा पराभव केला. राजा निराश होऊन निघून गेला. 

वसिष्ठ म्हणत होते तेच खरं होतं, कुणाजवळ राहायचं हे कामधेनू स्वत: ठरवते. ज्याच्या कामना पूर्ण झालेल्या आहेत, कोणतीही वखवख, हव्यास उरलेला नाही अशांच्याच घरी कामधेनू जाते. आपण कामधेनू योजना, कामधेनू ठेवी (डिपॉङिाटस), कामधेनू खतं अशा अनेक प्रकारांना कामधेनूचं नाव देतो; पण प्रत्यक्षात या सा-या गोष्टी कामना, वासना वाढवणा-याच असतात. 

पू. गोंदवलेकर महाराज या संदर्भात एक मार्मिक गोष्ट सांगत. एका साधूची जनसेवा पाहून देवानं त्याला एक कामधेनू दिली. त्याच्याकडे येणा-या सर्वाच्या इच्छा ती पूर्ण करू शकत असे. साधूनं अनेकांसाठी  अन्न, भांडी, गाद्या, कपडे अशा वस्तू कामधेनूकडून मागून अनेकांना तृप्त केलं; पण जेवल्यानंतर लोकांची ताटं, इतर भांडी, झोपून उठल्यावर त्यांच्या गाद्या, पांघरुण हे सारं साठवत गेला. गाय ही मातेसमान असल्यानं तिच्यावर वजन ठेवता येत नाही म्हणून तो स्वत:च्या डोक्यावरून सारा बोजा वाहून नेऊ लागला. ते पुढे असह्य होऊ लागतं. काय करावं या विचारात असताना समोरून एक माणूस गाढव घेऊन येताना दिसला.

साधूनं त्याला म्हटलं, ‘हा सारा भार वाहण्यासाठी तुझं गाढव मला दे नि बदल्यात ही हवं ते मागाल ते देणारी कामधेनू घे. तो माणूस म्हणाला, ‘मला सामान वाहून नेण्यासाठी गाढव लागतं. ही गाय घेऊन मी काय करू? हिला कसं पोसू?’ तरीही साधूच्या आग्रहावरून त्यानं त्या कामधेनूकडून एक दोन वस्तू मागित्या ज्या तिनं त्वरित निर्माण केल्या. साधूनं गाढव घऊन सारा भार त्याच्यावर टाकल्यावर त्याला हायसं वाटलं. त्याचवेळी तो माणूस मनातल्या मनात म्हणत होता, ‘मी हिच्याकडून गाढव सुद्धा मागू शकतो आणि ही ते देईलही’ मागे वळून त्या साधूकडे पाहत तो म्हणाला, ‘कामधेनूकडून गाढव मागावं हे सुद्धा लक्षात आलं नाही साधूबाबाच्या. गाढव कुठला!’

आपणही कामधेनूच्या बदल्यात गाढव मागण्याचा गाढवपणा करत नाही का? नाही तर आतून नि सर्वत्र उसळणा-या नि फुकट मिळणा-या आनंदाचा त्याग करून शरीराची तात्पुरती सुखं, इंद्रियाचे क्षणिक भोग विकत घेत नाही का? आनंदाची कामधेनू आपल्याला शाश्वत आनंद द्यायला तयार असताना क्षणोक्षणी पालटणारी शारीरिक सुखं- ती सुद्धा पैसे-शक्ती-बुद्धी खर्च करून का विकत घेतो? विचार करूया. 

Web Title: Samudra Manthan : Kamadhenu of happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.