समृध्द जीवनासाठी संतविचार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 07:00 PM2019-08-21T19:00:06+5:302019-08-21T19:01:23+5:30
मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे...
- हभप चंद्रकांत महाराज वांजळे, (प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार)
वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून विश्वसुखाची प्रार्थना केली आहे.
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे . माऊलींचे पसायदान ही विश्वप्रार्थना आहे. माऊली जी विश्वप्रार्थना करताहेत, त्यात विश्वात्मक सुखाचे मागणे आहे. ते मिळाल्यानंतर त्यांचे असणारे विश्वात्मक गुरूं म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो..पसायदानात मागितलेले तुझे सगळे पूर्ण होईल. तेव्हा येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाहला... जग सुखी झाले की ज्ञानोबा सुखी झाले. माऊलींना मला द्या म्हटलय पण, मज द्या म्हणताना, मला व्यक्तिगत नाही तर सगळ्या जगासाठी मागितलेले आहे. म्हणून ती विश्वप्रार्थना आहे.
भविष्यात जगातील सर्व देश आणि संस्कृती एकत्र आल्या आणि सर्वांचे एक विश्वगीत जर कोणते असेल तर महाराष्ट्रातील ज्ञानोबारायांचे पसायदान हेच गावे लागणार आहे. मानवी जीवनाची उंची वाढविणे पसायदान हे आहे. संतांनी मानवी जीवन उदात्त आणि समृद्ध होण्यासाठी खूप खस्ता घेतलेल्या आहेत. ती कृतज्ञता संतश्रेष्ठ तुकोबारायांनी व्यक्त केली आहे. देऊनिया जीव, वढयेला साधियेला ठाव... हे सगळं करताना, हे सोपे काम नव्हते.
कुणीतरी माऊलींचे चरित्र लिहिताना म्हटले होते. माय जॉय इज माय पब्लिक प्रॉपर्टी, बीटवीन मेन अ?ँड मी. माय पेन इज माय प्रायवेट प्रॉपर्टी.. माझा आनंद ही माझी सार्वजनिक मालमत्ता आहे. ती लोकांना वाटण्यासाठी आहे. माझे दु:ख ही माझी प्रायवेट प्रॉपर्टी आहे. ती माज्यासाठी आहे. किती हा उदात्त विचार आहे.
खरे तर आनंदाची उधळण करणारे महात्मे, संत याच मातीत वाढले, मोठे झाले. आकाशाऐवढे मोठे झाले. ह्यह्यअणु रेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा... तुकोबारायांनी ४१ वर्षांच्या आयुष्यात एवढी क्रांती केली. माऊलींचे आयुष्यही वीस एकवीस वर्षांचे. सर्वसामान्य माणसांना मिळालेल्या आयुष्यात काही दीव्य करता येत नाही. मात्र, संत महात्मे हे जीवनासाठी प्रेरक असतात. त्यांच्या विचार-आचारातून आपणास चेतना मिळत असते. अशा संतांना लोकोत्तर जीवन जगता येते, त्यामुळे संतांचे विचार, संतसाहित्याचे वाचन आपण करायला हवे. त्यातून समृद्ध जीवन जगता येणार आहे.