सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 10
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:13 PM2017-07-27T18:13:12+5:302017-07-27T18:13:26+5:30
मला एक स्त्रीने फोन केला.तिची माझी प्रत्यक्षात काहीच ओळख नव्हती.ती स्त्री प्रवचनाला येणारीही नव्हती.पण तिला कुणीतरी सांगितले की तुम्ही वामनरावांना फोन करा म्हणून तिने मला फोन केला.
- सदगुरू श्री वामनराव पै
मूल चांगले निपजले तर ती तुमची खरी संपत्ती आहे
मला एक स्त्रीने फोन केला.तिची माझी प्रत्यक्षात काहीच ओळख नव्हती.ती स्त्री प्रवचनाला येणारीही नव्हती.पण तिला कुणीतरी सांगितले की तुम्ही वामनरावांना फोन करा म्हणून तिने मला फोन केला.ती म्हणाली मला ऑफिसला जाण्याची भिती वाटते.मी तिला विचारले तुला भिती का वाटते?तर ती म्हणाली ते मला माहित नाही.तुला बॉस ओरडतो का? तर नाही म्हणाली.मी तिला म्हटले की मी सांगतो तुला भिती का वाटते ते.तू जे काम करतेस ते तुला नीट माहित नाही त्यामुळे तू बॉसकडे गेलीस व त्याने काही प्रश्न विचारला तर तुला त्याचे उत्तर सांगता येत नाही म्हणून तुला कामाची भिती वाटते.मग ती म्हणाली हो हे खरे आहे.पण मग यावर उपाय काय? मी तिला सांगितले की याला उपाय एकच तो म्हणजे तू तुझ्यावाट्याला आलेले काम नीट समजावून घेणे.ज्यांनी अगोदर हे काम केलेले आहे त्यांच्याकडून तू कामाबाबत सर्व माहिती घेणे,ते कसे करायचे,नेमके काय करायला पाहिजे हे समजावून घेणे, कुठल्या फाईल्स वाचल्या पाहिजेत हे लक्षांत घेणे. आता तुला कामाची भिती वाटते कारण तुला त्या कामाबद्दल अज्ञान आहे. संसारातही प्रत्येक ठिकाणी हे असेच असते.जीवनविद्येने चूल व मूल हया दोन्ही गोष्टींना फार महत्वाचे स्थान दिलेले आहे| जीवनविद्या सांगते चूल या विषयाकडे घरातल्या बाईने व्यवस्थित पाहिले पाहिजे व मुल हे सुध्दा नीट वाढविले पाहिजे. हयाला पर्याय नाही. जर तुमच्या घरात कुणीतरी वडिलधारी व्यक्ती, आजी, आत्या वगैरे असेल तर त्या स्त्रीने नोकरी करायला काहीच हरकत नाही.पण जर नसेल तर केवळ पैसा कमविण्यासाठी आपले मूल पाळणा घरात ठेवायचे व नोकरीला जायचे हे मुळीच योग्य नाही असे जीवनविद्या सांगते.आपले मूल हे चांगले निपजायला पाहिजे यासाठी आपण त्याची नीट काळजी घ्यायला हवी.मुल चांगले निपजले तर ती आपली संपत्ती ठरते पण जर मूल वाईट निपजले तर तीच आपली आपत्ती ठरते.आज कित्येक घरांत मूले ही आपत्ती झालेली आहेत कारण मूले वाटेल तशी वागतात.आईबापांना वाट्टेल तसे बोलतात.दुरुत्तरे देतात.तुम्हांला अक्कल नाही वगैरे बोलतात.आता असे कशामुळे होते तर तुमची मुले ही चांगल्या संस्कारांत वाढत नाहीत.आईचे काम हे दाई कधीच करु शकत नाही.आईचे काम एखादी आचारी करु शकत नाही.आचारी अथवा बाई जे काम करेल त्यात प्रेम नसेल व आई जे करेल त्यात भरभरुन प्रेम व माया असेल| घरातल्या स्त्रीने चूल व मूल सांभाळणे ही गोष्ट माझ्या दॄष्टीने फार महत्वाची आहे.यासाठीच मी माझ्या पुस्तकांत लिहून ठेवलेले आहे.”चूल व मूल सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नव-याच्या मिळकती मधला अर्धा भाग कायद्याने मिळायला हवा.यासाठीच जीवनविद्या तत्वज्ञानामध्ये या विषयाबाबत काही महत्वाचे सिध्दांत मी मांडून ठेवलेले आहेत व जीवनातल्या सर्व समस्यांवर योग्य उपाय सुचवलेले आहेत.