सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ११
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:49 PM2017-07-31T14:49:59+5:302017-07-31T14:56:10+5:30
जीवनविद्येच्या दॄष्टीकोनातून चूल व मूल सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नव-याच्या मिळकतीतला अर्धा भाग कायद्याने मिळायला हवा.आता तो मिळत नाही.जिथे सोहार्दाने चाललेले आहे तिथपर्यंत ठीक
- सदगुरू श्री वामनराव पै
सूनेला मुलीसारखे वागविले पाहिजे
जीवनविद्येच्या दॄष्टीकोनातून चूल व मूल सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नव-याच्या मिळकतीतला अर्धा भाग कायद्याने मिळायला हवा.आता तो मिळत नाही.जिथे सोहार्दाने चाललेले आहे तिथपर्यंत ठीक आहे पण ज्या ठिकाणी नवरा बायकोचे पटत नाही तिथे नवरा बायकोला घरातून चालती हो असे सांगतो. अलिकडे अशी अनेक प्रकरणे माझ्याकडे आली म्हणून मी हे सांगत आहे. लग्न होवून वर्ष देखील झाले नाही तर बायकोला त्याने वाईट वागणूक, अमानुष वागणूक दिली. तिची देखील यात काही तरी चूक असेल. पण चूक कोण करत नाही. माणसाकडून काही चुका घडतात. ती चुकीची वागली म्हणून तिला हाकलून दयायचे का? ती तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केले असते.जीवनविद्या हेच सांगते की तुमची मुलगी लग्न होवून दुस-याच्या घरी जाते व तुमची सून ही दुस-यांच्या घरातून तुमच्या घरी येते. मग या ठिकाणी महत्व कुणाला दिले गेले पाहिजे. सुनेला महत्व दिले गेले पाहिजे. सूनेला मुलीसारखे वागविले पाहिजे. किंबहूना मुलीपेक्षा जास्त प्रेम व आदर सुनेला मिळायला हवा. मग संसार सुखाचा व्हायला कितीसा वेळ लागतो पण लोकांच्या ही गोष्टच लक्षांत येत नाही. सुनेला वाईट वागणूक देतात. वाट्टेल तसे बोलतात. तुझ्या आईवडिलांनी तुला हेच शिकविले का असे बोलतात. आता लोकांना कसे बोलावे व वागावे याची अक्कल नसते याचे कारण अज्ञान. प्रत्येक ठिकाणी हे अज्ञान आड येते. संसार कसा करायचा हेच जर ज्ञान नसेल तर संसार सुखाचा कसा होणार. जीवन जगणे ही एक कला आहे, शास्त्र आहे हिच जीवनविद्या आहे हेच मी नेहमी सांगत असतो.स्वयंपाकाचे ज्ञान नसेल तर ती स्वयंपाक कसा काय करणार.स्वयंपाक शिकून तो तिने करायला हवा. नाहीतर मी पैसे कमवून आणीन व स्वयंपाकीन ठेवीन असे म्हटले तर याला कोण काय करणार.यासाठी ही कला शिकविणारा पाहिजे तसा शिकणारा देखील पाहिजे.संसार सुखाचा करायचा असेल तर ज्ञानाला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे.लोक सांगतात भक्ती करा.ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असे सांगणारे किर्तनकार,प्रवचनकार मी ऐकलेले आहेत.केवळ रेडिओवर टी.व्ही.वर नव्हे तर प्रत्यक्ष ऐकलेले आहे.पण वास्तवात ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ हे पूर्णपणे चूक आहे.