विज्ञान
By Admin | Published: August 17, 2016 05:31 PM2016-08-17T17:31:03+5:302016-08-17T17:31:03+5:30
विज्ञानाच्या नवनवीन शोधांचा अवाका व वेग प्रचंड आहे. त्यामुळे आयुष्याला वेग व सहजता प्राप्त झाली आहे.
>- प्रा. डॉ. यशवंत पाटील
विज्ञानाच्या नवनवीन शोधांचा अवाका व वेग प्रचंड आहे. त्यामुळे आयुष्याला वेग व सहजता प्राप्त झाली आहे. विज्ञानामुळे अनेक गुंतागुंतीच्या, अनाकलनीय बाबी आकलन होण्यास मदत झाली आहे. काही शतके, दशके, वर्षे ज्या गोष्टी अशक्यप्राय, स्वप्नवत वाटत होत्या, त्या आता सहज साध्य झाल्या आहेत. सर्व जग जणू मुठीत आले आहे. सर्वच क्षेत्रांत अचंबित करणारे बदल आणि अनुभवत आहोत. विज्ञानामुळे विविध प्रकारच्या सुख-सुविधा आपल्या उशा-पायाशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळेच आपल्यातील बहुतेक सुखासीन झाले आहेत हे वास्तव आहे.
विज्ञानाचे दृश्य परिणाम आपण अनुभवत आहोत. स्मार्ट फोन, त्यावरील विविध अॅप्स, ऑनलाइन खरेदी-विक्री, ऑनलाइन बँकिंग इ. अनेक क्षेत्रांत विज्ञानाने चांगलाच शिरकाव केला आहे. इंटरनेट, संगणक स्मार्ट फोन यांच्याशी निगडीत कितीतरी गोष्टींनी अनेक क्षेत्रांत क्रांती केली आहे. अर्थात प्रगतीसाठी हे सर्व आवश्यकच आहे. पण विज्ञानाच्या वापरामागे सकारात्मक, सुसंस्कारित ‘मन’ आवश्यक आहे. याचा आग्रह धरणे, प्रत्यक्ष तसा वापर करणे हे ‘सुसंस्कृत’ मनाचे निदर्शक आहे.
पण, काही अपवाद वगळता काय चित्र आढळते? बड्या-बड्या कंपन्या, बॅँका संस्थांच्या संगणक प्रणालीत बेकायदा घुसून त्यांच्या संगणक प्रणाली निकामी करणे किंवा नष्ट करणे, महत्त्वाच्या माहितींची चोरी करणे, व्हायरसद्वारे माहितीच नष्ट करणे, संकेतस्थळ हॅक करणे, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडणे, त्याद्वारे मेल किंवा संदेश पाठवून विविध प्रकारे फसवणूक करणे, अश्लील छायाचित्रे किंवा संदेश पाठविणे, बदनामी करणे, त्यातून लूट, फसवणूक करणे, व्हॉट्सअॅपद्वारे बदनामी करणे, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डचा बॅँकेत रजिस्टर असलेल्या इमेलचा पासवर्ड मिळविणे, त्याचा वापर करून खात्यातून पैसे काढणे, धार्मिक सलोखा आणि शांतता बिघडविणारा मजकूर छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रसारित करणे इत्यादी विविध प्रकारचे सायबर गुन्हे घडताना आपण ऐकतो व वाचतोसुद्धा.
अशा विज्ञानाचे हेही ‘फलित’ टाळावयास हवे. म. गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापापैकी १) Pleasure without Conscience विवेकशून्य आनंद, २) Science without Humanity मानवताशून्य विज्ञान या दोन पापांचा विवेकाने विचार करून विज्ञानाचा वापर केला तर खरोखर विज्ञान हे मानवजातीला मोठे वरदान ठरेल. पण, हे सर्व आपल्या अंतर्मनातून व्हावयास हवे.