आत्मानंदातच परमानंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 09:58 AM2018-11-12T09:58:54+5:302018-11-12T09:59:02+5:30
मनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते.
- स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
मनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते. स्थिर मनाला सदा पर्वकाळ असतो. प्राणिमात्राविषयी त्याचे मन स्थिर असते. त्याच्यापाशी शांती वास करते. दयावान मन म्हणून त्याची कीर्ती होते. त्या मनाला संसाराची चिंता राहात नाही. स्व-लीला, स्वल्पता त्याची त्याला कळते. ते मन बोलायला लागले की सर्वत्र आनंदाची निर्मिती होते. विवेक, वैराग्य, क्षमादी गुण त्याच्या अंगी वसलेले असतात. पण त्या मनाकडून निष्कर्मसिद्धी घडतात. योग-यागादी साधनावर त्यांनी आपला विजय प्राप्त केलेला असतो.
रिद्धी-सिद्धी त्या मनावर लोटांगण घालतात. त्या स्थिर मनात ईश्वरतत्त्वाचे अखंड चिंतन चालते. ते मन उदार, दयाळू असते. त्या मनाला प्रेमपान्हा पान्हावतो. सर्वांना आपल्या कुशीत कुर्वाळणारे ते मन असते. आंतर-बाह्य ते निर्मळ असते. सर्व दु:खाला पचवून टाकते. संसाररूपी सागरातून मुक्त होेते. सर्वसुखे त्याच्याजवळ असतात. युक्ती-मुक्ती त्याला लोटांगण घालतात. त्या मनाला सतत ईश्वरचिंतन घडते. त्याचेच त्याला ध्यान लागते. त्याला सतत त्याचीच आठवण होते. अंती त्या मनाचे विश्रांतिस्थानी भगवंताचे चरणच आहे. संत तुकाराम महाराजही हेच म्हणतात, ‘‘आता कोठे धावे मन। तुमचे चरण देखिलिया।।’’ त्या मनाला पुन्हा कुठेही जायची गरज नाही.
ते ह्या ईशतत्त्वाशी एकल्प होते. मग कुठेही त्याला भटकता येत नाही. त्या स्थिर मनाचे हे लक्षण आहे. मग त्या मनाला भजनात-कीर्तनात-सर्वदूर संतोष होतो. हरिजागरणात ते मन स्वयंसिद्ध प्रकट होते. निजात्म स्थितीचा त्याला बोध होतो. परमार्थ हा त्याचा भाव बनतो. स्थिर मनच हे सर्व करू शकते. म्हणून श्रीमद्भागवत गीतेतही अर्जुनाला स्थिर मनाचे महत्त्व भगवंताने सांगितले आहे. कलियुगात स्थिर मन करणे महत्त्वाचे आहे. कारण स्थिर ‘मन’ आत्मानंदाची निर्मिती करते. म्हणून म्हणावेसे वाटते आत्मानंदातच परमानंद आहे.
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)