जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 01:47 PM2018-12-03T13:47:46+5:302018-12-03T13:48:52+5:30

आत्मानुभवी संत आत्मरससेवनात मग्न असतो, तर तत्त्वज्ञानी मनुष्य आत्मानुभव हा बुद्धीच्या कक्षेत येत नसल्याने तो मनाचा खेळ आहे असे समजतो. मनुष्याच्या जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा आहे. आत्मानुभव हा सांगता येतो.

Self-realization is important in life | जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा

जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा

Next

आत्मानुभवी संत आत्मरससेवनात मग्न असतो, तर तत्त्वज्ञानी मनुष्य आत्मानुभव हा बुद्धीच्या कक्षेत येत नसल्याने तो मनाचा खेळ आहे असे समजतो. मनुष्याच्या जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा आहे. आत्मानुभव हा सांगता येतो. आत्मानुभूती सांगता येत नाही. एखादा अनुभव मांडत असताना मनुष्य आपले विचार स्पष्ट करतो. पण आत्मानुभूती ही एक ईश्वरानुभूतीच असते. म्हणजे थोडक्यात, ‘मजमाजी संचरे मीचि म्हणोनि’ ही ती स्थिती आहे. तैसा ज्ञानरूप आत्मा। ज्ञानेची आपुली प्रमा। करीतसे साहें मा। म्हणजे ज्याला ज्ञान म्हणतात (मी ब्रह्म ही वृत्ती) तो सत्त्वाचा म्हणजे गुणाचाच भाग आहे. मी ब्रह्म आहे अशी त्याला जाणीव होते. संत ज्ञानेश्वरांच्या मते आत्मा देहाहून अगदी वेगळा आहे. देह पंचमहाभुतांचा बनला आहे. या सर्वांपेक्षा ‘आत्मा’ त्यात मुख्य भूमिका निभावतो. पण त्या आत्म्याचे स्पष्टीकरण मनावर अवलंबून आहे. कारण अल्पज्ञ, चैतन्य, ईश्वर, ब्रह्म, आत्मा हे सर्व मनावरच असते. मनाने जाणणे महत्त्वाचे आहे.

ईश्वरानुभूती, ब्रह्मानुभूती चैतन्याशी एकरूपता होणे मनावरच आहे. उदा. आत्म्याच्या सत्तेवर देह स्फुरत असताना अज्ञानी देह आहे म्हणून मी आहे असे समजतो, पण तसे नसते. ती आपली एक समजूत आहे. खरं तर भास, आभास, प्रकाश, अप्रकाश, आनंद, निरानंद ही सर्व मनाची वृत्ती आहे. ती वृत्ती सर्वरूपांनी नटलेली आहे. भगवान शिवापासून ब्रह्मदेवापर्यंत, देवतापासून मुनष्यापर्यंत, प्राणिमात्रापासून मुंगीपर्यंत एका मनाचा खेळ आहे. किंबहुना या विश्वात ‘मन’ स्फुरत असते. सर्वकार्य मनाद्वारे घडते. मनाची सत्ता सर्वांवर अंकुश ठेवते. मन परिपक्व असले की परमार्थमार्गाचा मार्ग सोपा होतो. स्वकर्माचरण, ध्यानधारणा इत्यादी साधने मनाशी निगडित आहे. मनाचा परिपोष, संगोपन महत्त्वाचे असते. कारण अग्नीचे दीपन, चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन आणि आत्म्याचे मन याचाही विचार केला जातो. समजा, मनोबुद्ध्यादिकांचा प्रकाशक आत्मरूप होय. त्या आत्म्याचे ‘मन’ कष्टी-समष्टीचा खेळ असतो. त्यात मनाचा ठिकाणा लागत नाही. वेद मुके झाले पण मनाची स्पष्टता अजून कळली नाही. कारण कल्पनामय मनाचा विस्तारच फार मोठा आहे.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)


 

Web Title: Self-realization is important in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.