स्वार्थ त्यागा, आत्मसुखाचा बोध होईल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:12 PM2019-01-16T17:12:57+5:302019-01-16T17:14:05+5:30
व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा पूर्ण झाल्यानंतर तो खरे तर या जीवसृष्टीतला सर्वात सुखी आणि समाधानी प्राणी असायला हवा.
जीवसृष्टीमध्ये मानव हा सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणून ओळखला जातो. विचार करणे, आपले मत मांडणे यांसारख्या महत्वाच्या गोष्टी फक्त मानवालाच अवगत आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. आज व्यक्तीने चंद्रावर पाऊल ठेवले आहे. भविष्यात चंद्रावर वसाहत निर्माण करण्याचे त्याचे स्वप्नं आहे. अशक्य प्राय गोष्टींच्या शोधात मानव नेहमीच असतो. स्वतःच्या कल्पना शक्तीचा वापर करून त्याने जीवन अतिशय सुखकारक करण्याचा प्रयत्न तो करू पाहत आहे.
या सगळ्या चांगल्या गोष्टी मानवाच्या बाबतीत असल्या तरी मानवा इतका क्रूर, स्वार्थी, लोभी प्राणी या जीवसृष्टीत शोधून सापडणार नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी व्यक्ती चोरी, फसवणूक, खून यांसारख्या गोष्टी सहजगत्या करत आहे. एकाच उदरातून जन्म घेतलेल्या आपल्या नात्यांना स्वार्थापाई एखादे फुल सहज चुरगाळून टाकावे, त्याप्रमाणे हत्या करण्यास मागे-पुढे पाहत नाही. इतका स्वार्थी आणि लोभीपणा फक्त मानव प्राण्यामध्ये दिसून येतो.
व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा पूर्ण झाल्यानंतर तो खरे तर या जीवसृष्टीतला सर्वात सुखी आणि समाधानी प्राणी असायला हवा. परंतु या सर्व महत्वाच्या गरजा पूर्ण झाल्या नंतर ही व्यक्ती सुखी,समाधानी दिसत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे स्वार्थ, हव्यास. या स्वर्थामुळेच महाभारत घडले. यातूनच जन्म झाला तो भगवतगीतेचा. साक्षात श्रीकृष्णाने या संपूर्ण ब्रम्हांडाचे अमूल्य ज्ञान मानवाला दिले. परंतू ज्ञानाचे दार खुले होऊनही मानव स्वार्थाच्या अथांग समुद्रात नखशिखांत बुडून खरे सुख, समाधान याच्या शोधात आहे. जन्मदात्यांचे अनंत काळाचे उपकार,प्रेम, त्याग सर्व विसरून क्षणभंगुर स्वार्थास पाहून त्यांना घराबाहेर काढायला तो मागे-पुढे पाहत नाही. किती हा मानवाचा स्वार्थीपणा ? सतत स्वतः च्या मनाचा, स्वतःच्या सुखाचा विचार करता करता व्यक्ती स्वतःच्या मनापासून खूप दूर निघून जात आहे.
भौतिक सुखाच्या मागे धावतांना दाग-दागिने, गाडी, जमीन- जुमला, धन-दौलत यांची किंमत त्याला जास्त वाटते. परंतू स्वतःच्या उदरातून अतोनात हाल सहन करून जन्म देणाऱ्या मातेची, स्वतःच्या सुखाचा कणभर ही विचार न करणाऱ्या अविरत कष्ट करणाऱ्या पित्याच्या जीवनाचे मूल्य त्याला काहीच वाटतं नाही. इतका स्वार्थी आजचा मानव झाला आहे. खरे सुख, समाधान यासाठी तो दिवसें दिवस स्वर्थी होत आहे. स्वार्थी या शब्दातच असे आहे की, जी काही नाती आहेत ती आर्थिक गोष्टींशी जोडली गेली आहेत. आपल्या सारखे मन इतरांचे ही आहे, त्यांना ही काही दोन शब्दांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, याचा विचार न करता. सर्व नाती तो आर्थिक पारड्यात बसवून तोलत आहे. व्यक्ती जितका स्वतःच्या मनाचा, सुखाचा, स्वार्थाचा विचार करेल. तितका तो स्वतःपासून दूर जाईल. आत्मसुख स्वार्थात नसून ते इतरांसाठी काही करण्यात आहे, त्यांना दोन शब्द प्रेमाचे बोलण्यात आहे, त्यांच्या आनंदासाठी काही करण्यात आहे.
आज स्वार्थी कौरव अनेक भेटतात, परंतू निस्वार्थी संत तुकाराम फार कमी. वाढदिवस, भंडारे, होम-हवन या माध्यमातून जेवणावळी देणारे अनेक दिसतील. परंतू आहे त्यातून एक घास खऱ्या भुकेल्या व्यक्तीला खाऊ घालणारे थोडेच. या स्वार्थापासून व्यक्ती ज्या दिवशी दूर जाईल, त्यादिवशी त्याला खऱ्या आत्मसुखाचा बोध होईल.
- सचिन व्ही.काळे, ९८८१८४९६६