विभूती आणि अनुभूती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 12:29 AM2019-12-06T00:29:18+5:302019-12-06T00:29:27+5:30
कट्टर धार्मिकनिष्ठ आणि कट्टर विज्ञाननिष्ठ असे दोन विचारप्रवाह आज अस्तित्वात आहेत. जिथे रहस्य तिथे वाद असतातच.
- विजयराज बोधनकर
या पृथ्वीतलावर अनंत धर्म, भाषा, संस्कृती, वेशभूषा, परंपरा, रूढी आज अस्तित्वात आहेत. जशी मानसिकता तसे तिथले जगणे असते, जशी जिथली भौतिक साधने, तसे तिथले व्यवहार, प्रथा प्रचलित झालेल्या असतात. कट्टर धार्मिकनिष्ठ आणि कट्टर विज्ञाननिष्ठ असे दोन विचारप्रवाह आज अस्तित्वात आहेत. जिथे रहस्य तिथे वाद असतातच. रहस्यमय प्रश्नाच्या उत्तराला प्रमाण नसले की कल्पकता हीच वास्तवता गृहीत धरली जाते आणि त्याचे पुढे स्तोम माजते. कुणी अनुभूतीचे मार्ग अवलंबतात तर कुणी विभूतीचे म्हणजे चमत्काराचे मार्ग अनुसरतात. या दोन्हीत खूप मोठा फरक आहे. बरेचदा ईश्वरीय सत्य समाज नाकारतो आणि मृगजळ स्वीकारतो.
अध्यात्म म्हणजे धार्मिकता नव्हे आणि धार्मिकता म्हणजे अध्यात्म नव्हे. शिर्डीच्या साईबाबांनी सर्व जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा अध्यात्माचा मोठा महामंत्र दिला, पण त्याचे अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढले. तिथे कर्मकांड जास्त आणि मंत्राच्या खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष होतेय. आयुष्यभर फाटके पण स्वच्छ कपडे घालणाºया साईबाबांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढविला आहे. खरेच हे भक्तीचे प्रतीक आहे की फक्त मूर्तीची सजावट आहे. आपल्या कर्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली तर सबुरीने सर्व काही प्राप्त होते हा मंत्र साईबाबांनी दिला. अडचणी आणि संकटे मानवाच्या कृत्यातून जन्म घेत असतात. ती संकटे त्रास देऊन जाणारीच असतात.
अशा वेळेस माणूस हतबल झाला की त्याला मानसिक आधाराची गरज वाटते. त्या वेळी मात्र धार्मिक स्थळे मनाला खरोखरच आधार देतात. परंतु त्यामुळे संकटाची तीव्रता कमी होते का, हा प्रश्न महत्त्वाचा. आपल्याच कर्मबंधनातून सुख आणि दु:ख निर्माण होत राहतात. गंभीर काळात बुद्धीचा तोल जाणे आणि बुद्धीचा समतोल राखणे हीसुद्धा एक कला आहे. ती ज्याला साध्य झाली तो स्वत:च्या कर्मावर विश्वास ठेवू लागतो आणि तीच खरी अनुभूती असते.