सूक्ष्माची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:31 AM2020-01-28T03:31:19+5:302020-01-28T03:31:53+5:30

आत्मस्वरूप सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्माचे भान सुटून देणारी कर्मं परमात्म्याला अर्पण करीत आपल्या मूळ आनंद स्वरूपाशी सुसंगत आचरण राखणारी ती आत्मबुद्धी.

The sensation of microcosm | सूक्ष्माची अनुभूती

सूक्ष्माची अनुभूती

Next

- स.भ. मोहनबुवा रामदासी

समर्थांनी राघवाच्या स्वरूपाबद्दल असे म्हटले आहे की, नभासारीखे रूप या राघवाचे। मनी चिंतीता मूळतूटे भवाचे। राघव हा शब्द केवळ प्रभूरामचंद्रांच्या पुरता मर्यादित वापरलेला नसून अत्यंत व्यापकपणे राघव हा शब्द वापरला आहे. सर्व देवांच्या ठिकाणी समर्थांचा असणारा हा आदरभाव जाणून घेण्यासारखा आहे, ज्या भगवंतांचं स्वरूप अतिशय विशाल आहे. त्याला आकाशीचं सामर्थ्य उपमा देतात. पण त्या परमात्म्याची अनुभूती हा विषय अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्माची अनुभूती सूक्ष्मानेच घ्यावी लागते. आत्मस्वरूप सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्माचे भान सुटून देणारी कर्मं परमात्म्याला अर्पण करीत आपल्या मूळ आनंद स्वरूपाशी सुसंगत आचरण राखणारी ती आत्मबुद्धी. अगदी थोडक्यात सांगायचे तर स्वार्थात चिकटलेली आणि स्वार्थासाठी धडपडणारी ती देहबुद्धी. मनही जसजसे आपल्या कह्यात येत जाते तसतशी ही आत्मबुद्धी प्रकाशमान होत जाते. स्वार्थ साधना साधण्यासाठी आजवर जी शक्ती वापरली व आजही वापरली जात आहे, तीच शक्ती स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, आत्मभान जागविण्यासाठी आणि नि:स्वार्थ होण्यासाठी वळविणे हे सर्वोत्तम होईल. मन जागृत झाले तर ते सहजशक्य होते. मन जागृत करण्यासाठी स्वत:तील विवेक जागवला पाहिजे. तो प्रयत्नपूर्वक जागवता येतो. विचारांच्या मागे धावण्यापेक्षा, विचारांना मागे टाकून त्यांना ओव्हरटेक करू देऊ नका. विचार आणि विकार यात फरक आहे. तो जाणीवपूर्वक लक्षात घेतला पाहिजे. विकार ही एक आसुरी शक्ती आहे, आसुरी शक्तीचे स्मरणसुद्धा होऊ नये यासाठी भगवंताचे स्मरण करायला सांगितले आहे. विकारांवर विजय मिळवायचा आहे हासुद्धा साधनेच्या वेळी संकल्प नसावा. कारण जो संकल्प म्हणून केला जातो त्याचे अंत:करणात स्मरण राहते. म्हणून विकारांचे स्मरण हेच खरे मरण असते. हे स्मरण होऊ देता कामा नये.

Web Title: The sensation of microcosm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.