शारदीय नवरात्रौत्सव - 'पहिली माळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:32 AM2018-10-10T09:32:36+5:302018-10-10T09:33:09+5:30
महर्षी व्यास असे म्हणतात की, कलियुगात श्रीगणेश आणि श्री चण्डिका ही दोन दैवते शीघ्र प्रसन्न होणारी
शारदीय नवरात्र म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिगुणात्मक महादेवीची, शक्तीची उपासना. भारतात सगुण उपासनेचे पाच संप्रदाय आहेत. १) शैव, २) वैष्णव, ३) गाणपत्य, ४) शाक्त, ५) सौर.
महर्षी व्यास असे म्हणतात की, कलियुगात श्रीगणेश आणि श्री चण्डिका ही दोन दैवते शीघ्र प्रसन्न होणारी असून, इच्छित मनोकामना पूर्ण करणारी आहेत. ‘कली चण्डी विनायको’ असे ते म्हणतात. शाक्त संप्रदायानुसार आदिशक्तीने पहिले सगुण रूप धारण केले ते श्री महालक्ष्मीचे. दुर्गा सप्तशतीमध्ये प्राधानिक रहस्यात याचा उल्लेख आलेला आहे. श्लोक असा आहे-
।। सर्वस्याधा महालक्ष्मी स्त्रिगुणा परमेश्वरी । लक्ष्यालक्ष्य स्वरूपासा व्याप्य कृत्स्नं व्यवस्थिता।।’ अर्थात त्रिगुणमयी परमेश्वरी महालक्ष्मी ही आदिम आहे. ती या विश्वात, त्रैलौक्यात सनातन असून दृश्य आणि अदृश्य रूपाने या विश्वाला व्यापून असल्याने तिचीच सत्ता सर्वठायी आहे. जगाच्या आरंभी जेव्हा काहीही नव्हते तेव्हा विश्व निर्मिती करण्याच्या इच्छेने जी शक्ती सर्वात अगोदर प्रकट झाली ती श्री महालक्ष्मीच्या स्वरूपात. तिचे मूर्ती रहस्यात सुंदर वर्णन आलेले आहे. ‘कनकोत्तम कान्ति: सासुकान्ति कनकाम्बरादिवी कनकवर्णाभा कनकोत्तम भूषणा।।’ या श्लोकापासून ते वर्णन सुरू होते. पुढे याच आदिशक्ती महालक्ष्मीने स्वत:च्या तमोगुणातून महाकालीला व सत्वगुणातून महासरस्वतीला प्रकट केले आणि नंतर या दोघींना स्वत:च्या गुणांनीयुक्त अशा स्त्री-पुरुषांच्या जोड्या निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यानुसार मग १) ब्रह्मा-सरस्वती, २) विष्णू-लक्ष्मी, ३) शंकर-पार्वती अशा जोड्या निर्माण होऊन त्यांच्याकडे निर्मिती-पालन आणि संहार यांचे कार्य सोपवून दिले.
सर्वसाधारणपणे आपला समज असा आहे की, फक्त ब्रह्मा, विष्णू, महेश हेच या सृष्टीचे निर्माते, पालनकर्ते आणि संहारक आहेत, तर तसे नसून सरस्वती-लक्ष्मी-पार्वती या शक्तीरूपी देवतांशिवाय सृष्टीचक्र चालू शकत नाही आणि म्हणून आजही स्त्री-पुरुषाची जोडी कायम आहे. स्त्रीशक्तीशिवाय सृजन-पालन आणि संहार अशक्य आहे. याचे मूळ ती आदिशक्ती आहे. जी तीन रूपात प्रकटते. अशा या भगवतीपराम्बा राज राजेश्वरी जगदंबेचे नवरात्र आजपासून घरोघरी मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे केले जाते आणि अनेकांची ही जगदंबा कुलदेवताही आहे. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा कुठल्याही दैवताला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना करावी लागते. बऱ्याच वेळा मनुष्याच्या जीवनाची, आयुष्याची वाट बिकट असते; परंतु जीवन तर जगावेच लागते. दु:खी आयुष्य ही वास्तविकता असते. परिश्रम, प्रयत्न करूनही, अनेक प्रकारचे विविध उपाय करूनही जीवनातली दु:ख, ताणतणाव, व्याधी, उपव्याधी, दारिद्र्य, दैन्य, संकटे टळावीत. निदान आलेली संकटे धोकादायक होऊ नयेत म्हणून अनेक खटपटी, लटपटी मनुष्य करीत असतो; परंतु सर्व करूनही शेवटी आपल्या हाती काहीच नाही असे वाटल्यावर, पटल्यावर माणूस उपासनेकडे वळतो. अशा वेळी प्रयत्न न सोडता उपासना करणे हे सप्तशती महामंत्राचे निरूपण आहे. त्यामुळे प्रयत्नांना बळ मिळते आणि उपासनेची आत्मिक अनुभूती येऊ लागते.
उपासनेसाठी असणारे दैवत शक्तीस्वरूप आणि सत्तात्मक असते. म्हणजे दैवताला काही कार्य करण्याची जशी ताकद असते तशी सत्तासुद्धा असते. यापैकी शक्ती इच्छित परिणाम करणारी असते, तर सत्ता अधिकार चालविणारी त्या देवतेची अनाकलनीय जाणीव असते. म्हणून उपासनेमध्ये पूजाअर्चादी उपचार जसे आवश्यक असतात तसेच श्रद्धापूर्वक घेतलेली दैवताची जाणीव, ओळखसुद्धा महत्त्वाची असते. म्हणून आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रयोग जेवढे शास्त्रशुद्ध, बिनचूक, संयमाने, चिकाटीने, आत्मविश्वासपूर्वक, श्रद्धापूर्वक केले जातात आणि त्याचे योग्य व अनुकूल परिणाम येतात तसेच उपासनेतल्या दैवतासंबंधी अध्यात्मातील उपासनेचे प्रयोगही केले गेले तर ते दैवत त्या उपासकाला अनुकूल होऊन त्याच्या या कृपाप्रसादाने त्याच्या जीवनाचे मांगल्य, कल्याण होऊन तो उपासक आधीदेखील आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक अशा विविध तापातून मुक्त होतो असा दुर्गा सप्तशतीत प्रत्यक्ष जगदंबेचेच वचन ठायी-ठायी स्पष्टपणे व्यक्त झालेले आहे. सप्तशतीत वर्णित आदिमायेला महादेवीला शक्तीस्वरूप म्हणतात. कारण ती देवीशक्ती स्वरूप सत्ता आहे. ती निर्गुण, निराकार पुरुषाची सत्ता प्रकट करणारी प्रकृती आहे. ही महादेवी शिवाची अर्धांगिनी पार्वती आहे.
प्रा. अशोक झाल्टे शास्त्री