श्रमपूजा हीच शिवपूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:11 AM2019-02-04T06:11:08+5:302019-02-04T06:11:25+5:30
अखिल भारतीय पातळीवरचे मध्ययुगीन संतांचे साहित्य म्हणजे श्रमसंस्कृतीला लाभलेले खरे कैवल्य लेणे आहे.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
अखिल भारतीय पातळीवरचे मध्ययुगीन संतांचे साहित्य म्हणजे श्रमसंस्कृतीला लाभलेले खरे कैवल्य लेणे आहे. आळशी, कामचुकार, दुराचारी व भ्रष्टाचारी माणसांच्या मनातील श्वापदे समाजजीवनास अस्वस्थ करतात म्हणून तर संतांच्या वाणीला पांडित्याचा दर्प नाही, तर आपल्या घामाचा वास आहे व मातीशी एकनिष्ठ राहण्याची इमानदारी आहे. जो-जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याने आपली उपजीविका स्वत:च्या श्रमावरच चालविली पाहिजे. कारण श्रमावाचून मिळालेले सोने माणसाच्या मनात भुतांचा नंगानाच निर्माण करतात. महात्मा गांधींनी तर स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, ‘श्रमाशिवाय मिळालेली संपत्ती हीच खरी पापाची जननी आहे.’ कार्लाईल नावाच्या पाश्चात्त्य विद्वानाने केवळ श्रममूल्याला महत्त्व देऊन ‘वर्क इज वर्शिप’ असे प्रतिपादन केलेले आहे; परंतु पाश्चात्त्यांचा हा विचार अखंड श्रमाला महत्त्व देत असला तरी या विचाराला शिवत्वाचे अधिष्ठान नाही. उलट बसवेश्वर व तत्कालीन भारतीय विचारवंतांनी ‘वर्क इज हेवन’चे प्रतिपादन करून श्रमाला शिवत्वाचे अधिष्ठान दिले. ज्याचे अनुकरण महाराष्ट्रात उदय पावलेल्या संत चळवळीनेही केले. वास्तविक पाहता जर चंदन घासलेच नाही तर त्याचा सुगंध कसा सुटणार? तसेच श्रमाच्या सहाणेवर शरीराचे चंदन घासले जाणार नाही; तोपर्यंत त्याला शिवत्वाचा सुगंध प्राप्त होणार नाही हेच तर खरे मुक्ती मूल्य आहे. अन्य भक्ती-मुक्तीचे प्रकार म्हणजे साधकाने स्वत:ची स्वत:च केलेली फसवणूक आहे. म्हणून, साधकांनो श्रमयोगी व्हा! आपली कर्मे, कुसुमे त्या शिवस्वरूपाच्या चरणी समर्पित करा अन् मुक्तीच्या पाऊलवाटा स्वत:च्याच पावलांनी निर्माण करा.