शिवस्वरोदय शास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:25 AM2018-09-06T04:25:31+5:302018-09-06T04:25:43+5:30
पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात असतो. वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो सुख शोधण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्याला सुख मिळते का? नाही! कारण सुख ही वस्तू नसून विचारांची एक स्थिती आहे.
- डॉ. विजय जंगम (स्वामी)
पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात असतो. वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो सुख शोधण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्याला सुख मिळते का? नाही! कारण सुख ही वस्तू नसून विचारांची एक स्थिती आहे. ती बाहेरील धडपडीत नसून आपल्या आत आहे. म्हणजेच बहिर्मुखतेत नसून अंतर्मुखतेत आहे. मनच अशांत असेल, तर मनशांती कसली? ।।विचारी मना तू शोधूनी पाहे।। या समर्थांच्या उक्तीप्रमाणे जर का सुखाचा शोध मनाच्या माध्यमाने घ्यायचा ठरविला, तर कळेल की ब्रह्मांडी जे जे वसे ते पिंडी असे। अखिल ब्रह्मांडाचा नायक जो शिवशंकर तो महायोगी असून, त्याच्यामार्फत वरील संदेश सर्व भूलोकस्थ मानवांना ऋषिमुनींद्वारे ज्ञात झाले आहे. हे ज्ञान म्हणजेच अतिप्राचीन असो वा शिवस्वरोदय शास्त्र होय. हा संस्कृत ग्रंथ असून, यामध्ये शिवाने पार्वतीला सांगितलेले पिंड ब्रह्मांडासंबंधीचे व्यवहारिक व आध्यात्मिक ज्ञान आहे. शिवस्वरोदय या ग्रंथात ३९५ श्लोक आहेत. त्या श्लोकाच्या आधारे विज्ञान, तत्त्वज्ञान, आरोग्यप्राप्ती, भविष्यज्ञान, गर्भवतीचे प्रश्न, होराशास्त्र इत्यादी गोष्टींचे अनुमान काढता येते.यक्ष, गण, किन्नर, गंधर्व इ. ईश्वरनिर्मित योनीतील देहांपेक्षा मनुष्य देह हा अनेक दृष्टीने श्रेष्ठ व कार्यक्षम आहे, म्हणून परमात्माशक्ती मानवी देहरूपातच अविर्भूत होते व त्याद्वारे जरूर ती कार्य करून दाखविते. परमात्माशक्ती म्हणजेच चिच्छक्ती ही अखंड अतूट व अमर असून, ती अवकाशातील अनेक प्रकारच्या लहरींना व संवेदनांना संक्रमित करणारी शक्ती आहे. शिवस्वरोदय शास्त्रात स्वरांचे ज्ञान जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा जास्त पंचतत्त्वाचे ज्ञान असणे जरूरीचे आहे. फक्त स्वरांचे ज्ञान असून स्वरोदयशास्त्र पूर्ण अवगत होत नाही, त्या ज्ञानाच्या जोडीला पंचतत्त्वांचे ज्ञान आवश्यक आहे. आपले शरीर पंचतत्त्वांपासून बनलेले असून, अखेरीस ते त्यातच लय पावणार असते. सृष्टीही पंचतत्त्वात लय पावते. ही पंचतत्त्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्त्वांचा उदय व अस्त निरोगी माणसांच्या प्रत्येक स्वरात एकेक तासाच्या क्रमाने होतो. आकाशतत्त्व फक्त सुषुम्नेत असते. बाकीची तत्त्वे एकामागून एक उदित होतात. थोडक्यात, शिवस्वरोदय शास्त्र हे एक असे दिव्य शास्त्र आहे. ही साधना योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली करावी.