मस्तक ठेंगणा।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:22 PM2020-03-16T16:22:16+5:302020-03-16T16:23:52+5:30

मस्तक ठेंगणा। करी संतांच्या चरणा।। सामान्य मानवी जीवन जगताना आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारात कितीतरी वेळा झुकावं लागतं. वेगवेगळ्या व्यक्ती, ...

 Shook his head | मस्तक ठेंगणा।

मस्तक ठेंगणा।

Next
ठळक मुद्देजीवनाची बिघडलेली सूत्रे व्यवस्थित करतात.

मस्तक ठेंगणा। करी संतांच्या चरणा।।
सामान्य मानवी जीवन जगताना आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारात कितीतरी वेळा झुकावं लागतं. वेगवेगळ्या व्यक्ती, परिस्थिती आणि घटना यांना शरण जावं लागतं किंवा त्यांच्यासमोर आपला माथा झुकवावा लागतो. तुकोबारायांच्या मते जर मस्तक झुकवणं अपरिहार्यच असेल तर संतांच्या किंवा सज्जनांच्या चरणी ते झुकवावं. याचं कारण असं की, इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या झुकण्याचा अर्थ वेगवेगळा काढला जाईल. कधी कधी त्याचं भांडवलही केलं जातं; पण संतांच्या चरणी लीन झालं, की संत आपल्या झुकण्याला सार्थता आणि सार्थकता प्राप्त करून देतात. जीवनाचे हरवलेले सूर शोधून देतात. जीवनाची बिघडलेली सूत्रे व्यवस्थित करतात. याचसाठी आमचे तुकोबाराय म्हणतात की,
‘भाग्याचा उदय। ते हे जोडी संतपाय।।’
आमच्या जीवनातील आम्ही भाग्य म्हणून समजत असलेल्या सर्वच गोष्टींना भाग्य समजता येईल असं नाही, पण
‘भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा।
निकट वास बरा संतापायी।।
या न्यायाने सज्जनांच्या पायांची उपासना आपल्याला करता येणं हेच आपलं खरं भाग्य. आम्ही या भाग्याच्या अधीन झालो, की होणारा आणखीन एक फायदा म्हणजे आम्ही सुखी होतो आणि खूप सुखी होतो. सज्जनांच्या पायी प्राप्त होणारं सुख खूप खूप अनमोल असून, ते अद्वितीय आहे; मात्र आपण जर दुर्जनांच्या पायांची उपासना करू लागलो किंवा त्याची संगत करू लागलो, तर त्याची फळंही आपल्याला तशीच मिळत राहतील, म्हणूनच सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, हे आपण आचरणात आणलं, तर सज्जनांच्या पायांची उपासना आपोआपच घडेल आणि सुख मिळेल. आपण ते अनुभवावं एवढीच अपेक्षा.

Web Title:  Shook his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.