‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:27 PM2019-08-07T12:27:42+5:302019-08-07T12:28:00+5:30

श्रीमंत श्रावण

'Shravan Maasi Harsh Mansi | ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..’

‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..’

googlenewsNext

‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..’ या प्रसिद्ध काव्यपंक्ती मनात येतात त्या या महिन्यातील सृष्टी सौंदर्य पाहूऩ कमी-जास्त पाऊस झाला तरी जमिनीतून वेगवेगळ्या जातीच्या मुळ्या हिरवळून हिरवा गालिचा जमिनीवर अंथरल्यागत होऊन गर्भ श्रीमंताच्या दिवाणखान्यासारखा शोभायमान होतो. निसर्ग त्या हिरवाईच्या किती तरी छटा डोळ्याला सुखावतात.

आम्हा सर्वसामान्यांना एक दुर्वा किंवा हराळी तेवढीच माहीत तीदेखील संकष्टी किंवा गणेशचतुर्थी, गौरी पूजनाच्या वेळी, परंपरेने रीत-रिवाज आहे म्हणून ! त्या काळात बागेत, घराच्या परसदारी जाऊन चवड्यावर पाय मुडपून बसून हराळीची पाने मन लावून तोडत असे. पण त्यांच्या ठायी असणाºया औषधी गुणांची आम्हाला कल्पना असत नाही. या महिन्यात कुठे कुठे आघाडा हिरवळून थोराड झाला की डोळ्यात भरतो आणि हा गणेश पूजनाबरोबर गौरी पूजनास आवर्जून लागतो. गौरी गणेशाला लागतो म्हटल्यानंतर घरच्या यजमान-यजमानीला निसर्गाच्या सान्निध्यात जावे लागते.

आजूबाजूच्या हिरव्या गवतावर वाºयाची झुळूक आली की, उडणाºया लहरी डोळ्याला, अंत:करणाला सुखावून जातात.बी न पेरताही सहज पडलेल्या भोपळ्या, गोसाळ्याच्या बिया अंकरून त्याची वेल जमिनीवर छतावर चढून त्याला पिवळी जाई अत्यंत तलम नाजूक कर्ण्यासारखी डौलदार फुलं त्या परिसराला श्रीमंत करून देत असतो. आणि त्या फुलावर भ्रमर रुंजी घालत असतात. त्या नाजूक तनुंवर मोठाले काशी भोपळे, लांबलचक दुधीभोपळे, गोसाळे, दोडके, कारले, पडवळ लटकताना दिसतात. आता आम्ही शहरी साहेब झालोत म्हणून आणि आमची गावाशी असलेली नाळ तुटली म्हणून या फळभाज्या बाजारातून विकत आणतो. अन्यथा घरच्या परसात सहजच आलेल्या या वेली आणि रोपांवर लगडलेल्या हिरव्या मिरच्या, गवार, वांगी ही जमीन चुलीतल्या राखेसोबत तरारून आमचंच आम्हाला कितीतरी पट करून परत करीत असते. ते घेण्यासाठी आमचा पदर कमी पडत असतो.

केवळ घरच्यांना नव्हे शेजाºया-पाजाºयांना आपल्या बांधवांकडे ही गोसाळी, दोडके, भोपळे, वांगी, मिरच्या जायच्या. आम्ही आता एवढे शहरी झालो आहोत की, इतरांना द्यायचो विसरुन गेलो आहोत. काही कष्ट न करता परसातल्या या वेली, रोपं आपल्याला देता म्हटल्यावर आपण देखील सहज शेजाºया-पाजाºयांना का बरे देऊ नये? हा विचार श्रावणातील निसर्ग आपल्याला शिकवतो.

- डॉ. इरेश स्वामी

Web Title: 'Shravan Maasi Harsh Mansi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.