Shravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 10:45 AM2019-08-19T10:45:59+5:302019-08-19T11:13:53+5:30
श्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत.
श्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत.
1. काशी विश्वनाथ
विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे उत्तरप्रदेशातील काशी येथे आहे. काशी शहराला सर्व धर्मस्थळांमध्ये अधिक महत्व आहे. या शहराबद्दल मानले जाते की, कितीही मोठा प्रलय आला तरी हे स्थान तसेच राहिल.
पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. १६ व्या शतकात येथेच सन्त एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रन्थ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवनूक निघाली.
कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले.
2. त्र्यंबकेश्वर
हे ज्योतिर्लिंग गोदावरी नदीजवळ महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ ब्रम्हगिरी नावाचा पर्वत आहे. या पर्वतावरूनच गोदावरी नदीचा उगम आहे. तर भगवान शिवाचे त्र्यंबकेश्वर हे नावही आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.
3. वैद्यनाथ
परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.