श्रावण स्पेशल : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 10:29 AM2018-08-20T10:29:04+5:302018-08-20T10:44:48+5:30
आज आपण पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्त्व जाणून घेऊया. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आपण पाहिली होती.
श्रावणातील आज दुसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्त्व जाणून घेऊया. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आपण पाहिली होती.
1) ओंकारेश्वर
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध शहर इंदोरजवळ आहे. ज्या स्थानावर हे ज्योतिर्लिंग आहे, तेथून नर्मदा नदी वाहते आणि पर्वताच्या चारही बाजूस नदी वाहत असल्याने इथे ऊं असा आकार तयार झाला आहे. याने ज्योतिर्लिंगाने ओंकार म्हणजेच ऊं चा आकार घेतला आहे. त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर या नावानेही ओळखले जाते. नर्मदा भारतातली पवित्र समजली जाणारी नदी आहे. ॐकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्यप्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.
2) केदारनाथ
केदारनाथ येथील ज्योतिर्लिंग भगवान महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचे आहे. हे उत्तराखंड राज्यात आहे. बाबा केदारनाथचे मंदीर बद्रीनाथ मार्गावर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ समुद्र तळापासून ३५८४ मीटर उंचावर आहे. हे ज्योतिर्लिंग भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात. केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.
3) भीमाशंकर
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोटेश्वर महादेव या नावानेही ओळखले जाते. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.