काळ्या ढगाला रुपेरी किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 06:10 AM2020-06-03T06:10:42+5:302020-06-03T06:10:46+5:30
- फा. फ्रान्सिस दिब्रिटो कोरोनाने अडीच लाखांहून अधिकांचा घास घेतला. कोरोनामुळे झालेल्या अकाली मृत्यंूमुळे कुटुंबेच्या कुटुंबे निराधार होत आहेत. ...
- फा. फ्रान्सिस दिब्रिटो
कोरोनाने अडीच लाखांहून अधिकांचा घास घेतला. कोरोनामुळे झालेल्या अकाली मृत्यंूमुळे कुटुंबेच्या कुटुंबे निराधार होत आहेत. कोरोनाचा वारू रोखण्यासाठी करावे लागलेले लॉकडाऊनसारखे उपाय भयंकर आहेत, असे वाटू लागले आहे. सारे व्यवहार थंडावल्याने स्थलांतरित मजुरांची गंभीर समस्या उभी राहिली. मिळेल त्या मार्गाने ते गाव जवळ करू लागले. माणसाच्या काळजाचं पाणी पाणी करणारी दृश्ये! औरंगाबादजवळ रेल्वेखाली पंधरा-सोळा माणसं चिरडली गेली.
कोरोनाला त्यांची दया येत असेल की नाही? असा विचार मनात येऊन गेला; पण या समस्येला रुपेरी किनार आहे, ती म्हणजे सद्भावनेला आलेला महापूर! असंख्य व्यक्ती व संस्था स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन त्यांनी केलेले रक्तदान हा माणुसकीचा गहिवर नाही का? डोक्यावर किडूकमिडूक घेऊन जाणारे, वृद्ध माता-पित्यांना खांद्यांवर घेऊन जाणारे श्रावणबाळ, धापा टाकत शेकडो किलोमीटर अंतर कापायला निघालेले मजूर पाहून सुसंस्कृत माणूस म्हणून मिरवणाऱ्यांच्या हृदयाला पाझर न फुटला तर नवल! अशा गुड सेमेरिटनची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. समीर वर्तक, जोएल दाबरे व कार्यकर्ते अशा मजुरांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करत आहेत. अमर पटेल नावाचे मुस्लिम बंधूही त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे कार्य करत आहेत.
नाशिक रोड येथील फ्रान्सिस वाघमारे यांनी उत्तर प्रदेशकडे पायी निघालेल्या पाच मजुरांच्या खाण्या-पिण्याची सोय केलीच, शिवाय नव्या सायकली विकत घेऊन त्यांना दिल्या. ही सगळी उदाहरणे केवळ वानगीदाखल आहेत. सेवाभावाची ही मानवसाखळी तो मजूर थेट त्याच्या गावाला पोहोचेपर्यंत तयार झाली आहे. कोरोनामुळे आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय रूढ होत आहे. राजकीय व्यक्तींना परदेश दौरे करण्याची आवश्यकता उरली नाही; हे एकप्रकारचे ‘वर्क फ्रॉम होम’ आहे. या नव्या बदलांमुळे संस्थांच्या गंगाजळीवरील भार कमी होईल. कोरोनाच्या वाईटातून बरे झाले ते हे! कोरोनाच्या काळ्या ढगाला लागलेली ही रुपेरी किनार आहे. असा थोडा सकारात्मक विचार करू या का?