थेंबे थेंबे महासागर बने..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:03 PM2019-10-12T23:03:11+5:302019-10-12T23:05:00+5:30

कोणतीही गोष्ट सतत करत राहून क्रमानं वाढवत गेल्यास आपल्या नकळत खूप मोठं कार्य घडून येतं.

small things makes big difference | थेंबे थेंबे महासागर बने..

थेंबे थेंबे महासागर बने..

Next

- रमेश सप्रे

तशी आपल्या मराठीत म्हण आहे ‘थेंबे थेंबे तळे साचे’. ही म्हण ज्या महाभागानं सर्वप्रथम तयार करून वापरली त्यानं बहुतेक सागर-महासागर पाहिलेला नसावा. त्याची मजल तळ्यापर्यंत गेली; पण महासागरसुद्धा थेंबाथेंबानेच बनतो. पावसाच्या पाण्यानं वाहणा-या नद्या आपलं पाणी सागराला, समर्पण करत असतील; पण अखेर पाऊस पडतो तो सुद्धा थेंबाथेंबानंच. ते काही वर्षापूर्वीचं गाजलेलं गाणं आठवतंय ना?

‘ढगाला लागली कळ। पाणी थेंब थेंब गळं।।’ इवल्याशा पण असंख्य, अक्षरश: असंख्य थेंबांमुळेच सागर बनतो.
याच चालीवर कणाकणानं जमीन किंवा वाळवंटही बनतात. श्वासाश्वासानं अख्खं आयुष्य बनतं. पैशा पैशानं रुपयाच काय अब्जाधीशसुद्धा बनता येतं. हुकुमचंद शेटजीची कथा अनेकांना माहीत असेल.

मारवाड प्रदेशातून एक युवक नशीब काढण्यासाठी मुंबईत येतो. अंगावरचे कपडे नि एक पितळेचा लोटा. एवढीच त्याची मालमत्ता असते. त्याच्याच भागातून आलेल्या एका दूरच्या ओळखीच्या व्यापा-याकडे तो आपला लोटा गहाण ठेवतो. त्याला आठ आणे मिळतात. चौपाटीवर भेळ विकण्याचा व्यवसाय अगदी लहान प्रमाणावर त्या आठ आण्यातच सुरू करतो. कमीत कमी खर्च स्वत:वर करून पैसे साठवत जातो. नवे नवे छोटे धंदे करून हळूहळू त्याची मिळकत वाढत तो सोन्याच्या व्यापारात उतरतो. पुढे एवढा श्रीमंत होतो देश विदेशात जिथं जिथं हुकूमचंद शेटजी जात तिथं तिथं सोन्याचे भाव वाढत असत. एवढी हुकूमत शेटजींनी सुवर्ण व्यापारावर स्थापन केली तरी एक खंत त्यांना होती. हजारो-लाखो रुपये देऊ करूनही त्यांचा पितळेचा लोटा ज्या व्यापा-याकडे गहाण ठेवला होता त्यानं तो परत केला नाही. तो व्यापारी म्हणत असे, ‘असेल जगातला एक मोठा श्रीमंत व्यापारी हुकूमचंद, पण त्याची शेंडी मात्र माझ्या हातात आहे. ही गोष्ट सोडली तरी जेव्हा जेव्हा हुकूमचंद शेटजींना त्यांच्या अभूतपूर्व यशाचं रहस्य विचारलं जायचं तेव्हा तेव्हा ते म्हणायचे, ‘मैने तो पैसा पैसा बचाके हिमालय जैसी दौलत जमायी’ अगदी खरं आहे हे.

एका शाळेत एके दिवशी एक शिक्षक एका वर्गात गेले नि फलकाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एक भली मोठी संख्या लिहून मुलांना ती वाचायला सांगितली. ‘एकं दहं शतं..? करत पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ती संख्या वाचली. एक लाख! काय दाखवत होती ती संख्या? रुपये? तसं लिहिलं नव्हतं.  मग गुरूजींना काय सांगायचं होतं? ते म्हणाले चातुर्मास सुरू होतोय. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यात म्हणजे सुमारे १२० दिवसांत आपण चाळीस विद्यार्थी ही संख्या पुरी करणार आहोत. उद्या पहिला दिवस. सर्वानी एक नमस्कार घालायचा. आरामात. परवा आणखी एक वाढवून दोन नमस्कार घालायचे. रोज असा एकेक नमस्कार वाढवत जायचं. चातुर्मास संपेल तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण रोज १२० नमस्कार घालू शकेल. आपला एक लक्ष नमस्कारांचा संकल्प पुरा होईलच; पण पुढे आयुष्यभर एक व्रत म्हणून घालत राहिलात तर उत्तम आरोग्याचं वरदान मिळेल नि जीवन आनंदात जाईल. त्या मुलांवर नमस्काराचा शारीरिक प्रभाव पडलाच; पण बुद्धीवर दोन संस्कार घडले. एक म्हणजे एकेका वाढत्या संख्येचा प्रभाव नि दुसरा संस्कार एकत्र येऊन सामूहिक रीतीनं कोणतंही काम केल्यास उद्दिष्टांची पूर्ती होतेच होते. कोणत्याही कामात सातत्य हवं नि अगदी थोडं थोडं क्रमानं वाढवत गेल्यावर घडून येणारा कल्पनेच्या पलीकडील परिणाम याचा अनुभव सर्वाना येतो.

एक मजेदार उदाहरण पाहू या. एका व्यापा-याकडे एक अरब व्यक्ती येते. हातात बॅग नि बॅगेत पैसे. आल्या आल्या तो अरब त्या व्यापाऱ्याला विचारतो, ‘आपण एका महिन्याचा करार करू या का?’ ‘कोणता करार?’ म्हणून विचारल्यावर तो अरब स्पष्ट करतो मी तुला रोज एक लाख रुपये देईन. त्याच्या बदल्यात तू पहिल्या दिवशी फक्त एक पैसा मला द्यायचा. दुसरे दिवशी दुप्पट म्हणजे दोन पैसे. तिसरे दिवशी दुप्पट म्हणजे चार पैसे असं महिनाभर करायचं. मी तुला रोज एक लाख रुपये म्हणजे तीस लाख रुपये देणार. त्या चतुर व्यापा-यानं एका आठवडय़ाचा तोंडी हिशेब केला. आपल्याला फक्त एक रुपया सत्तावीस पैसे द्यावे लागणार; पण आठवडय़ात अरब आपल्याला सात लाख रुपये देणार. त्यानं करार केला. दुस-या आठवडय़ानंतर हा व्यापारी अरबाला विचारतो, ‘आपण कराराची मुदत वाढवू या का?’ कारण त्या व्यापा-याला हा सौदा खूप फायद्याचा वाटला. अरब काहीच बोलला नाही; पण शेवटी शेवटी त्या व्यापाऱ्यावर पश्चातापानं रडण्याची पाळी आली. किती मोठी रक्कम त्याला त्या अरबाच्या तीस लाख रुपयांच्या बदल्यात द्यावी लागली याचा हिशेब आपला आपण करू या. खरंच करून पाहायला हरकत नाही. हल्ली सर्वाच्या मोबाइल, लॅपटॉपवर कॅलक्युलेटर असतातच.

या सर्वाच्यातला समान धागा कोणता माहितै? कोणतीही गोष्ट सतत करत राहून क्रमानं वाढवत गेल्यास आपल्या नकळत खूप मोठं कार्य घडून येतं. एकेका पावलापुरता प्रकाश पाडणारा कंदिल सुद्धा आपल्याला खूप दूर असलेल्या आपल्या मुक्कामापर्यंत घेऊन जातो. आपली प्रार्थना असली पाहिजे ‘देवा, फक्त एका पावलापुरता प्रकाश माझ्या अंधा-या वाटेवर पाड. मग बघ कितीही दूरच्या ठिकाणी मी पोचतो की नाही ते!’

 

Web Title: small things makes big difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.