समस्येची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:39 AM2019-08-27T05:39:23+5:302019-08-27T05:39:26+5:30
सद्गुण असलेल्या व्यक्ती मान्य करून त्यांना आदर द्यावाच. त्या गुणांना मान द्यावा हा श्रीचक्रधरांचा उपदेश आहे. ही गुणांची पूजा ...
सद्गुण असलेल्या व्यक्ती मान्य करून त्यांना आदर द्यावाच. त्या गुणांना मान द्यावा हा श्रीचक्रधरांचा उपदेश आहे. ही गुणांची पूजा आहे. हे पूजास्थल आहे. जातपात धर्म व देशांच्या सीमा पार करून ही पूजा केली जाते. कलागुणांचा हा प्रवास समुद्र ओलांडून येतो-जातो. शतकानुशतके टिकून राहतो. हा व्यवहार स्वामीसुद्धा सांभाळत होते. प्रकाशा देव, परमाणुभव या सत्पुरुषांचा त्यांनी सन्मान राखला.
उपाधीत सामर्थ्य असतं, एक अंतर, एक बाह्य, तिसरं उभय सामर्थ्य असतं. काही दृश्य, काही अदृश्य असतं. ते खरंच असेल तर स्वत:ची अहंता बाजूला सारून ते मानावं. विरोध नको. त्याचं वलय दुखावलं जाईल व त्याचा उपद्रव होऊ शकतो. सामर्थ्यासोबत जे जे लढले ते पराजित झाले. लुईपुईच्या कथेतला राजा हरल्याची कथा स्वामींनी सांगितली आहे. म्हणून ऋषींनी भारतीयांच्या मनात सर्वच जडचेतन वस्तूंविषयी आपल्या मनात आदराचं बीज पेरलं आहे. भारतमाता, धरणीमाता असं कुठल्याच देशात म्हटलं जात नाही. जे भव्य, दिव्य, उदात्त आहे तिथं भारतीय नतमस्तक होतो. गंगामय्या, जमुनामय्या केवढी ही ममता, इथे सापांचा सण, बैलांचा सण साजरा होतो. आमच्या पूर्वजांनी तर कोकिळेत सूर शोधला, मोरात नृत्य व सुगरणीत घर शोधलं. हिमालयाची उंची, पाताळाखाली खोली आम्हाला अतिशय आवडते. सूत्र किती छोटं, दोनच शब्दांचं व सहा अक्षरांचं, पण ते धारदारी तलवारीसारखं अहंकाराच्या पोटात घुसतं व दंभाला नम्र करतं.
आशीर्वाद व नमनाचं मिलन घडवतं. उपाधीचं दडपण व दंभाचं मीपण विलया जातं, खाली उरतो तो फक्त आनंद. अहंतेचं मूळ कंदासह उपटून फेकावं लागतं. कारण त्याशिवाय शांती मिळत नाही. समस्येच्या मुळाशी गेलं की तिची उकल होऊन होते. मच्छरांचं मूळ घाण जागेत असतं. भांडणाचं कारण भांडणात नाही. ते अहंतेत असतं. अहंकार हा उपाधवंत, संत, महंतात नसतो.
-बा.भो. शास्त्री