पापातलं पुण्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 03:54 AM2019-04-23T03:54:16+5:302019-04-23T03:59:24+5:30
पाप म्हणजे दु:ख व पुण्य म्हणजे सुख अशा पापपुण्याच्या व्याख्या आहेत.
- बा.भो. शास्त्री
पाप म्हणजे दु:ख व पुण्य म्हणजे सुख अशा पापपुण्याच्या व्याख्या आहेत. महर्षी व्यासांनी महाभारतात म्हटलं आहे, ‘‘अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचन द्वयम् परोपकार पुण्यात पापाय परपिडणम्’’ इष्ट हे पुण्य व अनिष्ट हे पाप याचे अर्थ ठाऊक असून श्री चक्रधर म्हणतात, ‘अल्पे आनिष्टे बहुत अनिष्ट परिहरे तर परिहारिजे’ थोड्या वाईटाने जास्त वाईट नष्ट होत असेल तर तसं वाईट करायला हरकत नाही, असा सूत्राचा सरळ अर्थ आहे. ज्याला ही दृष्टी प्राप्त झाली त्यालाच गीता बुद्धिमान म्हणते.
‘‘कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्मय: स बुद्धिमान्मनुष्येषु सयुक्त: कृत्स्रकर्मकृत्’’ हीच नजर स्वामी मराठीतून आपल्याला देतात व थोडं अनिष्ट करण्याची फुल परवानगी देतात. आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो. आपल्याला वाटेल, ही पापप्रवृत्तीला उघड उघड प्रेरणाच आहे. श्रावणाच्या बापाने दशरथाला दिलेल्या शापात शापच नाही, वरही आहे. मरतेवेळी एकही मुलगा जवळ राहणार नाही. हाच तो दु:खातला आनंंद रडताना हसवतो. राजा बाप होणार हे पुत्रप्राप्तीचं सुख त्याचं मरणही सुखाचंंं करतं. असंं इष्ट करणारंं अनिष्ट पण इष्टच असतंं, हाच सूत्राचा आत्मा आहे. एका मुलाचं बापावर खूप प्रेम आहे. बापाच्या बोटाच्या नखाजवळ जखम झाली, डॉक्टर म्हणतो, गँगरिन आहे. एक कांंड तोडावं लागतं. मुलगा म्हणाला, दहा दिवसांनी येतो, तर डॉक्टर म्हणतो, मनगट तोडावंं लागेल. महिन्यानंंतर खुब्यापासून हात तोडावा लागेल आणि वर्षानंतर यांच्या अंत्यविधीला सरपण तोडावं लागेल. कारण बिमारी चरत जाते. मुलगा अनिष्ट करण्यासाठी तयार झाला. बोटाचा अर्धा इंच गेला तरी चालेल, पण बाप वाचला पाहिजे. हेच ते सुंदर अनिष्ट.