नरकाचे दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 05:00 AM2019-09-23T05:00:37+5:302019-09-23T05:01:06+5:30
आयुष्य काशीत व्यतित करणारे कबीर आयुष्याच्या सायंकाळी मगहरला गेले आणि येथे मृत्यू आल्यानंतर नरकाची प्राप्ती कशी होते, याचा मला अनुभव घ्यायचा आहे, अशी गर्जनाच कबीरांनी केली.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत ज्यांचा आत-बाहेर परंपरेविषयी विद्रोह ठासून भरलेला होता. जे वेशधारी संतांना आपल्या शब्दांच्या काठीने सडकून काढत होते आणि सत्यशोधनाचा खरा राजमार्ग जनता जनार्दनासमोर मांडत होते, ते संत कबीर यांच्या जन्माला येण्यात, काही काळ इथे राहण्यात आणि आयुष्याचा निरोप घेण्यातही बंडखोरीचा पीळ होता. कबीरांचा ज्या काशी क्षेत्रासी जन्मजात ऋणानुबंध होता त्या काशी क्षेत्राच्या बाबतीत हजारो लोकांची अशी अंधश्रद्धा होती की येथे ज्याचा मृत्यू होतो त्याला स्वर्गप्राप्ती होते आणि येथून अगदी पाच-सहा मैलांवरच्या मगहरमध्ये ज्याचा मृत्यू होतो तो नरकाला जातो. आयुष्य काशीत व्यतित करणारे कबीर आयुष्याच्या सायंकाळी मगहरला गेले आणि येथे मृत्यू आल्यानंतर नरकाची प्राप्ती कशी होते, याचा मला अनुभव घ्यायचा आहे, अशी गर्जनाच कबीरांनी केली. मगहरमध्ये कबीरांचे देहावसान झाल्यानंतर म्हणे त्यांच्या पार्थिवाची फुले झाली आणि जिवंतपणी जो कबीर आमचा नाही, असे म्हणणाऱ्या हिंंदू व मुस्लिमांनी ती वाटून घेतली आणि आपआपल्या धर्माप्रमाणे विधी केले? कबीर स्वर्गाला गेले की नरकाला याबाबतीत वाद सुरू राहतील; पण साºया भारतवर्षास विचारांची फुले देणाºया कबीराने स्वर्ग आणि नरकाचे अस्तित्वच नाकारले होते. ईश्वरी शक्ती एक अक्षय पुरुष आहे बाकी सारे स्वर्ग-नरकांच्या काल्पनिक येरझाºया मारणारे आहेत, असा निर्वाणीचा इशारा देताना कबीर म्हणतात,
अक्षय पुरुष एक पेड हैं
निरंजन बाकी यार
त्रिदेवा शाखा भयें, पात भया संसार ॥
संसाराच्या रहाटगाडग्यात पुण्याची पाऊटी सरल्यानंतर देवाधिदेवसुद्धा स्वर्ग आणि पृथ्वीच्या येरझाºया मारतात आणि आमच्यासमोर मात्र नरकाचे भयावह चित्र निर्माण करतात.