आत्मा माउली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:58 PM2018-07-13T23:58:41+5:302018-07-13T23:59:12+5:30

पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी अखंड माउलीचा जयघोष करीत असतो. तो फक्त जयघोषच करीत नसतो, तर पालखीतल्या प्रत्येकाला तो माउली म्हणूनच बोलावत असतो.

. Soul mauli - Dindi walking | आत्मा माउली

आत्मा माउली

Next

इंद्रजित देशमुख
पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी अखंड माउलीचा जयघोष करीत असतो. तो फक्त जयघोषच करीत नसतो, तर पालखीतल्या प्रत्येकाला तो माउली म्हणूनच बोलावत असतो. माउली ही आईला मारलेली अत्यंत प्रेमळ अशी हाक आहे. सकल संत प्रत्येक जिवामध्ये ईश्वराचा अंश पाहत असतात. आई, माउली हे प्रेम जगातले सर्वांत निरपेक्ष आणि व्यापक असे प्रेम आहे. पायी चालत असताना सात्त्विकता जी दाटून येते. विशाल हृदय जी प्रेमाने हाक मारते त्यातले मार्दव वारीमध्ये काही ओढ लावणारे असते. सर्व संतांनी विठुरायाला माउली म्हटलंय, तर साधकांनी संतांना माउली म्हटलंय, तर अवघा पालखी सोहळा एकमेकांना माउलीमय संबोधून लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या प्रेम मायेचा प्रत्यय करून देतात.कित्येकजण आपल्या उपास्याला पिता मानतात, पती मानतात, कोणी स्वामी मानतात, कोणी सखा मानतात, कोणी प्रियकर मानतात. भागवत धर्माला ज्ञानाची बैठक प्राप्त करून देणारे ज्ञानदेव मात्र प्रियतेची अखेरची सीमा असलेली ‘आत्मा’ माउली असे म्हणतात.
‘तेथ प्रियाची पैैल सीमा । तो भेटे माउली आत्मा ।।
तियें क्षेवी आटे डिंडिमा । संसारिक हे ।।
संतांना माउली हा शब्द अतिशय प्रिय आहे. कारण माउली ही ‘निष्कपट माय’ असते. ती लेकरांच्यात भेद करीत नाही. ‘जाने-ताने’ म्हणजे जाणते-नेणते असा भेद करत नाही. सर्वांवर समान प्रेम करते. संसारिकांनासुद्धा जवळीक देऊन खांद्यावर घेऊन चालणारे संत आणि विठ्ठल असतात कसे तर माउली म्हणतात, ‘तू संसार श्रोतांची साउली अन् अनाथांची माउली’ असून खरोखर तुझीच कृपा आम्हावर प्रसवली आहे. संत आणि विठ्ठल आपल्या लेकराला पोसण्यासाठी ‘जिव्हारीची गाठी’ सोडून आपल्या हृदयीचे अमृत पाजत असतात. जेणेकरून लेकरू पुष्ट होईल आणि आनंदाने तृप्त होऊन नाचू लागेल.
संत नामदेवरायांचे अभंग तर बालभावाने ओतप्रेत भरलेले आहेत. त्यांच्या वाणीने पांडुरंगाला प्रभावित केले आहे. पांडुरंग नामदेवरायांची आई बनून सारा कठोरपणा सोडून आई बनून भक्ताकडे झेपावते आहे.
तू माझी माउली, मी तो तुझा तान्हा ।
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ।।
इतक्या आर्ततेने संत नामदेवरायांनी त्या विठाईला हाक दिल्यावर तिचे अतृप्त वात्सल्य या लेकरावर मायेचा वर्षाव करता राहील काय? नामदेव महाराज माय लेकराची अनेक रूपके आम्हासमोर उभी करतात. माउली आणि तिचा तान्हा, हरिणी अन् तिचे पाडस, पक्षिणी आणि तिचे पिलू, गोठ्यात बांधलेल्या वासराची माउलीच्या भेटीसाठी सैरभैर झालेली दृष्टी. घरट्यात पक्षिणीच्या पंखाच्या उबेसाठी अन् तिच्या चोचीतल्या चाऱ्यासाठी आसुसलेल्या पिलांची ती आर्त चिवचिव आणि वनात चुकलेल्या हरिणीचा माग काढत निघालेल्या पाडसाची आगतिक तडफड ही वात्सल्याच्या नात्याची आर्तता भक्त आणि उपास्य पांडुरंग यांच्यामध्ये आणून भक्तीला परमप्रेमरूपाचे आयाम बहाल केले आहेत.
या वारीमध्ये चालताना एकच आस आहे ती विठाई दर्शनाची. या आईच्या भेटीची ओढ पसरत राहावी म्हणून माउली माउलीचा जप करत हा थवा विठाईच्या घरट्याकडे रवाना होतो आहे. संत नामदेवराय म्हणतात -
‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये।
पिलू वाट पाहे उपवासी।।
तैसे माझे मन करी वो तुझी आस।
चरण रात्रंदिवस चिंतीतसे।।’
पक्षिणी सकाळीच चारा आणण्यासाठी गेलीय. आणि पिलू दिवसभर इकडे वाट पाहत आहे. पक्षिणीला तिचे पंख आहेत. त्याच्यात बळ आहे. ती समर्थ आहे; पण तिचे पिलू दुबळे आहे. तिच्या पंखात ताकद नाही. त्यामुळे ते अवघडलेले आहे. ते तिला शोधू शकत नाही. तिने त्याच्या ओढीने परतायला हवे. ती चाºयासाठी गेलीय आणि ते उपवासी आहे. त्याची भूक तिनेच जाणायला हवी. घरट्यात दिवसभर वाट पाहणाºया या उपवासी पिलाच्या आगतिकतेचे स्मरण तिला असायला हवे. असे संबोधन करून विठाई माउलीचे लक्ष खेचण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
संत एकनाथ महाराजांना तर वैष्णवजन हेच आईच्या रूपात दिसतात. त्यांच्या साहित्यातली आई तर अशी आहे की, मत्स्य असेल तर मत्स्याई, कच्छ असेल तर कच्छाई, वराह असेल तर वराही. श्रीकृष्ण असेल तर कृष्णाई या हाकेने हाकारतात.
तुकोबाराय आपल्या वत्सल विठाईला संबोधताना म्हणतात -
‘पदियंते आम्ही तुजपाशी मागावे।
जिवीचे सांगावे हितगुज।।
पाळशील लळे दीन वो वत्सले ।
विठ्ठले कृपावे जननिये ।।
अशा तºहेने मराठी संत परंपरा विठ्ठलाला मातृरूपाने आळवित आहे आणि या वत्सल माउलीचे स्तन्य पिऊन पुष्टी अनुभवित राहिली आहे आणि या पुष्टीच्या बळावर कळीकाळाला आव्हान देत जीवन आनंदी आणि निर्भयतेने जगत आहे.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Web Title: . Soul mauli - Dindi walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.