सत्य बोलणे तप करण्यापेक्षा कमी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 11:02 AM2019-10-04T11:02:44+5:302019-10-04T11:02:48+5:30
आध्यात्मिक...
सोलापूर : ‘महात्मा गांधी हे सत्य व अहिंसेचे महान उपासक होते. सत्याचे प्रयोग या नावाचे त्यांचे आत्मचरित्र अतिशय प्रसिद्ध आहे. सत्य बोलणे हे जगातील सर्वात मोठे तप आहे म्हणून सत्याचे उपासक बना’ असा सल्ला प. पू. गौतम मुनी यांनी दिला.
ईश्वराने हा सुंदर नरदेह दिला, त्या नरदेहाचे सार्थक कसे करावे हेच बºयाच लोकांना कळत नाही. कारण त्यांच्यापाशी विवेक नसतो. आपल्याला सुदैवाने नरदेह प्राप्त झालेला आहे. देवाने आपल्याला विचार करणारे मन आणि अप्रतिम अशी बुद्धी दिलेली आहे. या दोन अपूर्व अशा शक्तीच्या बळावर आपण सदैव ईश्वराचे नामस्मरण करायला हवे. या देहाचा सदुपयोगासाठी वापर करावा.
पाप कर्म करू नका. पापाचा उदय नको. पुण्यकर्म करा, पुण्योदय होऊ द्या. तुम्ही जर जीवनात परमार्थ साधला, लोककल्याणासाठी झटलात तर तुमचे जीवन सहज आणि सुंदर बनेल. दिवसाचा शेवटचा क्षण सायंकाळी येतो. आजच्या दिवसाचे सारे कर्म जर पवित्र भावनेने केलेले असेल तर रात्रीची प्रार्थना गोड होईल. तो दिवसाचा शेवटचा क्षण जर गोड झाला तर दिवसाचे सारे कर्म सफल झाले असे समजावे. एकाग्रतेसाठी अशी जीवन शुद्धी हवी.
बाह्य वस्तूचे चिंतन सुटले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य म्हणजे फारसे नाही, परंतु एवढ्याशा आयुष्यात परमेश्वराचा सुखाचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य आहे. चातुर्मासाच्या या शुभ संधीचा लाभ घ्या. उत्तम धर्म आराधना करा. जीवन सत्कार्याला जोडा आणि जीवन सार्थकी लावा. आपल्या प्रवचनात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, संतरत्न मूलचंदजी महाराज अशा महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
- प. पू. गौतम मुनी