Spiritual : गीता मंदिराचा गाभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:30 PM2019-01-22T13:30:04+5:302019-01-22T13:31:13+5:30
माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे.
गगनं गगनाकारं सागर : सागरोपम:।
गीतेश्वरी महाविश्वे गीतेश्वरीव विघते।।
माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे. गीताधर्म म्हणजे विश्वधर्म असे विवेकानंद म्हणतात म. गांधीजीच्या मते -मानवाच्या साऱ्या समस्या गीतेमुळे सुटू शकतात. इमर्सन म्हणतो- गीता हा जगातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथ आहे. मारुतीने जन्मल्याबरोबर सूर्यबिंब ग्रासायला उडी मारली. त्याप्रमाणे गीतेने जन्मल्याबरोबर इतकी उंच उडी मारली की, जागतिक साहित्य सारस्वतात तेवढी उडी कोणत्याच ग्रंथाने मारली नाही. भोगजीवनाचे भावजीवनात रुपांतर करणारा हा अलौकीक ग्रंथ आहे. ज्ञान, कर्म, ध्यान भक्ती हे गीता मंदिराचे ४ स्तंभ असून, शांती हा त्या मंदिराचा सुवर्णकलश आहे आणि अहकांरनाश हा गीतेच्या तत्वज्ञानाचा खºया अर्थाने पाया आहे.
साºया वेदांचे सार महाभारतात महाभारताचे सार गीतेत आहे आणि गीतेचे सार नवव्या अध्यायात आहे. म्हणूनच चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानराज माऊलीनी संजीवन समाधी घेतली तेव्हा ९ वा अध्याय मांडीवर ठेवला होता. खºया अर्थाने गीतेचा ९ वा अध्याय म्हणजे गीता मंदिराचा गाभारा आहे.
ह्या अध्यायात भगवान गोपालकृष्णानी आपण जग व प्राणीमात्राबद्दल विवेचन केले आहे. ज्ञानोपासना, भक्ती उपासना, स्वर्ग मृत्यूबद्दल सांगितले असून जे अनन्यनिष्ठ होवून माझे चिंतन करुन मला भजतात त्यांचा योगक्षेत्र मी चालवितो असे ब्रीदच स्पष्टच केले आहे.
अन्यन्यास्थित यंतो माम ये जनाम पर्युपासते।
तेषाम नित्याभियुक्तानाम, योग क्षेमं वहाम्यहम।।
जीवनात न मिळालेली वस्तु मिळणे ह्याला योगं म्हणतात आणि मिळालेल्या वस्तूंचे रक्षण करणे ह्याला क्षेम म्हणतात. ही दोनही कामे भगवंत करतात फक्त अनन्यचित्त हा भाव भक्तांचा असावा
भगवंतानी भक्तीचा आधार घेवून, सर्वांना दिलासा दिला आहे. भक्तीने जे साधते ते ज्ञानाने किंवा कर्माने साधत नाही. समर्पणाची भावना असेल तर त्यात प्रचंड शक्ती असते सुदाम्याचे मुठभर पोहे, रुक्मिनीच्या एका तुलसीपत्राचे महत्व भावात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे.
पत्रं पुष्पं फलं तोय, यो मे भक्त्या प्रयश्र्च्छती।
तदहम भक्त्यु पºहंतम अश्वनामी प्रयतात्मन:।। (गीता ९/२६)
म्हणूनच संत मांदियाळीचा संदेश हा ध्यानी घ्यावा
काम करते रहो, नाम जपते रहो।
कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। धृ।।
सुखमे सोना नही, दु:खमे रोना नही
कर्म मार्ग मे निष्काम, बढते चलो ।। १।।
लोग कहते है भगवान आते नही
द्रोपदी की तरह तुम बुलाते नही
भक्त प्रल्हाद जैसे पुकारा करो
कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। २।।
देव हा भावाचा भुकेला आहे. द्रव्याचा नाही. भक्तीचे माहेर असणारा हा अध्याय राजविद्या गुह्य योग स्पष्ट करतो.
मन्मना भव मद्भक्तो, मधाजी मा. नमस्कुरु।
मामेवैष्यासि युक्तवैवम आत्मानं मत्परायण:।। (गिता ९/३४)
- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे